बाळासाहेबांची फार इच्छा होती की उद्धव ठाकरेंनी क्रिकेटर बनावं.

बाळासाहेबांचे क्रिकेट प्रेम जगजाहीर आहे.

त्यांच्या अगदी तरुणपणापासूनच त्यांचा क्रिकेट हा आवडता खेळ होता तो त्यांच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत..  ते जरी स्वतः क्रिकेट खेळत नव्हते तरी त्यांचे या क्रिकेटच्या क्षेत्रात अनेक मित्रही होते जसे कि, बापू नाडकर्णी, पॉली उम्रीगर. यांच्यासोबत बाळासाहेबांची मैत्री खूप घनिष्ट होती. त्यांच्या गप्पा म्हणजे कायम क्रिकेट आणि क्रिकेट बस्स …

राजकारण आणि समाजकारणात व्यस्त झालेले बाळासाहेब अनेकदा आपली क्रिकेट खेळण्याची हौस लोणावळ्याला जाऊन पूर्ण करीत असत. क्रिकेट कीट घेऊन ते मुंबईहून थेट लोणावळा गाठायचे आणि तिथे ३-४ मित्रांना घेऊन क्रिकेटचा सामना रंगवायचे.

पाकिस्तानशी हाडवैर असलेल्या बाळासाहेबांना पाकिस्तानचा जावेद मियांदाद हा आवडता फलंदाज होता.

एकदा त्यांनी जावेद यांना मातोश्रीला गप्पा मारायला बोलावलं तेंव्हा फक्त क्रिकेटच्या गप्पा मारत बसले त्यात मात्र कुठेही भारत-पाकिस्तानचा राजकीय  मुद्दा येऊ दिला नाही. असे हे बाळासाहेबांचे क्रिकेट प्रेम !

आपल्या देशाच्या खेळांडूंनीही नाव कमवावे, चांगले खेळावे म्हणून त्यांना मातोश्रीला बोलावून मानसन्मान देत, कौतुक करीत. सचिनला भारतरत्न मिळावा म्हणून प्रयत्न करणारे बाळासाहेबच होते.

वानखेडे स्टेडीयमच्या उभारणीच्या वेळेसही त्यांनी आपली पूर्ण ताकद वापरली होती हा संपूर्ण देश जाणून आहे.

क्रिकेट खेळत नसले तरीही ते त्या क्षेत्रासाठी नेहेमीच प्रयत्न करणाऱ्या एका क्रिकेटर सारखे आयुष्य जगले. वडिलांचे क्रिकेट प्रेम ओघानेच उद्धव ठाकरेंमधेही उतरले. उद्धव ठाकरे यांनाही क्रिकेट जाम आवडायचे. त्यांनीच बाळासाहेबांच्या बद्दल सांगितलेल्या आठवणींमध्ये हा किस्सा सांगितलेला आहे. ते म्हणतात,

बाळासाहेबांची फार इच्छा होती कि मी क्रिकेटर बनावं.

बरेच वर्ष त्यांचं पहिलं घर मुंबईत दादरला शिवाजी पार्कच्या जवळ होतं. आजही अनेक मुले या शिवाजी पार्कवर क्रिकेट शिकायला येतात. सचिन विनोद कांबळी सारखे कित्येक आंतरराष्ट्रीय स्तरावरचे स्टार क्रिकेटर याच शिवाजीपार्कवर घडले. शिवाजी पार्क म्हणजे शिवसेनेची जन्म भूमी.

शिवाजी पार्कवर बाळासाहेबांनी उद्धव यांना राजकारणाबरोबरच क्रिकेटचे देखील धडे शिकवले.  सायंकाळच्या निवांत वेळी मातोश्री बंगल्यावर बापलेकाचा क्रिकेटचा सामना कित्येकदा रंगात यायचा.  भेटायला आलेले शिवसैनिक ही खेळात सामील व्हायचे. अशा मोकळ्या आणि खेळीमेळीच्या वातावरणात बाळासाहेब मुलांसोबत असायचे. मात्र तितकाच त्यांचा दरारा ही असायचा. पण कधीच त्यांनी उद्धव यांना किंवा इतर मुलांना साधी चापट सुद्धा मारली नव्हती.

वडिलांचा मार कधी न खाल्लेले उद्धव यांनी शाळेत मात्र एकदा चांगलाच मार खाल्ला होता. शालेय जीवनात असतांना एका दिवशी,

 उद्धव त्यांच्या क्रिकेट प्रेमामुळे त्यांना मार हि खावा लागला होता.

सकाळी सकाळी क्रिकेट सामना रंगला आणि त्यांना कळलेच नाही कि, शाळेची वेळ कधी निघून गेलीय. कसेबसे धावत-पळत ते शाळेत पोहचले आणि उशिरा आल्यामुळे त्यांना मुख्याध्यापकांचे रट्टे खावे लागले होते. असं बऱ्याचदा व्हायचं ते खेळात इतके रमून जायचे कि त्यांना वेळेचं भान नसायचं.

पुढे थोडस मोठं झाल्यावर उद्धव ठाकरेंच क्रिकेटवरच लक्ष कमी झालं. आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचण्याएवढी क्रिकेटमधील प्रतिभा आपल्याकडे नाही याची त्यांना जाणीव झाली असावी. त्यांनी बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकून व्यंग चित्रकार होण्याचा प्रयत्न केला.

बाळासाहेबांना देखील उद्धव ठाकरे व्यंगचित्रकार होणार म्हटल्यावर कौतुक वाटलं होत. ते स्वतः जागतिक पातळीवर गाजलेले व्यंगचित्रकार होते. त्यातूनच खरं तर त्यांचा राजकारणी घडला होता. उद्धव ठाकरे मात्र व्यंगचित्रांमध्ये देखील जास्त काळ रमू शकले नाहीत.

त्यांनी आपलं लक्ष फोटोग्राफीत वळवल. त्यात मात्र उद्धव ठाकरेंनी त्यात गती घेतली. वाईल्ड लाईफ फोटोग्राफी पासून महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यांच्या फोटोग्राफी पर्यंत त्यानीं काढलेली छायाचित्रे आजही एक बेंचमार्क म्हणून फेमस आहेत.

मधल्या काळात मात्र उद्धव ठाकरेंनी फोटोग्राफी प्रेम असूनही राजकारणात उडी घेतली. अनेक चढ उत्तर पहिले. बाळासाहेबांच्या नंतर शिवसेनेची जबाबदारी उचलली आणि आज ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राच्या विधिमंडळात शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवला. त्यांनी मुख्यमंत्री होऊन  बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं मात्र या दरम्यान क्रिकेटर होण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न मात्र ते पूर्ण करू शकले नाहीत.

हे हि वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.