भाजपच्या प्रचारसभेत शेतकऱ्यांना दिलेला शब्द शिवसेनाप्रमुखांनी पूर्ण करून दाखवला…

१९९५ सालच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरु होता. राज्यातील शरद पवारांच्या सत्तेला धक्का बसणार याची चिन्हे दिसत होती. प्रचारावेळीपासूनच शिवसेना आणि भाजपच्या युतीने आघाडी घेतली होती. दोन्ही पक्षांचे नेते महाराष्ट्र पिंजून काढत होते. सर्वसामान्य लोकांचाही त्यांना प्रतिसाद मिळत होता.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भाषणे विशेष गाजत होती. त्यांच्या आक्रमकतेने अख्ख्या महाराष्ट्राला मोहिनी घातली होती. 

या प्रचाराच्या वेळी एकदा बाळासाहेब विदर्भाच्या दौऱ्यावर आले. तेव्हा त्यांच्या सोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष पांडुरंग फुंडकर देखील होते. अकोला येथे सभा होणार होती. पांडुरंग फुंडकर तिथले खासदार होते. अकोला त्यांचा बालेकिल्ला मानला जायचा. त्याचं मतदारसंघातील युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बाळासाहेबांची सभा घेतली जाणार होती.

शिवसेनाप्रमुख पांडुरंग फुंडकरांना म्हणाले,

“तुझ्या मतदारसंघात माझी सभा आहे. पण, मला सभा शहरात नाही तर ग्रामीण भागात घ्यायची आहे.”

त्यांच्या आग्रहास्तव फुंडकरांनी बाळासाहेबांची चोहट्टा बाजार येथे सभेचे आयोजन केली. या सभेसाठी अभूतपूर्व गर्दी झाली होती. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून लोक फक्त बाळासाहेबांना ऐकण्यासाठी आले होते. सभेजवळची पाच किमी जागा केवळ पार्किंगसाठीच भरली होती.

या सभेत व्यासपीठावर बसल्यावर बाळासाहेबांनी फुंडकरांना विचारले,  ‘येथे काय पिकतं?”

खासदार म्हणाले,

इथे कापूस पिकतो. त्याला आम्ही पांढरे सोनं म्हणतो.

बाळासाहेबांनी फुंडकरांना कापसाचा सध्याचा भाव विचारला. त्यांनी सांगितलं, १४०० रुपये. यावर बाळासाहेबांनी चौकशी केली की तेवढा भाव पुरेसा आहे का? फुंडकरांनी म्हणाले,

नाही किमान २१०० रुपये भाव मिळायला हवा.

त्यानंतर बाळासाहेब भाषणासाठी उठले, त्यांनी पहिलेच उद्गार काढले की,

येथे जमलेल्या तमाम माझ्या बंधू आणि भगिनींनो. माझं भगव्याचं राज्य येऊ द्या, तुमच्या कापसाला मी २१०० रुपयांचा भाव देईन.

हे शब्द ऐकल्यावर सर्व शेतकऱ्यांनी टाळ्या वाजवल्या. पहिल्या वाक्यातच बाळासाहेबांनी सभा जिंकली. विदर्भ हा एकेकाळी काँग्रेसचा गड मानला जायचा. पण बाळासाहेबांच्या झंझावती प्रचारामुळे तो गड कोसळला. ग्रामीण भागात यापूर्वी कधीही न दिसणारे शिवसेनेचे उमेदवार विदर्भ मराठवाड्यातूनही निवडून आले. फक्त शिवसेनाच नाही तर भाजपच्या उमेदवारांना देखील बाळासाहेबांच्या प्रचाराचा फायदा झाला.

१९९५ सालची विधानसभा निवडणूक युतीने जिंकली. पहिल्यांदाच मंत्रालयावर भगवा झेंडा फडकला. 

युतीच्या वाटणीत शिवसेनेकडे मुख्यमंत्री पद आणि भाजपकडे उपमुख्यमंत्रीपद आले. बाळासाहेबांनी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री बनवलं. पण सत्तेचा रिमोट कंट्रोल त्यांच्याच हातात होता. पांडुरंग फुंडकर यांना कापूस पणन महामंडळाचा अध्यक्ष करण्यात आलं होतं.

युतीचं शासन आल्यावर आपल्याला न्याय मिळेल अशी विदर्भातल्या शेतकऱ्यांना आशा होती. मात्र जेव्हा कापसाचा भाव जाहीर करायची वेळ आली तेव्हा मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी फक्त १०० रुपयांची भाववाढ देत कापसाला १५०० रुपये जाहीर केले. 

हा निर्णय ऐकल्यावर पांडुरंग फुंडकर यांना धक्का बसला. ते सरळ उठले आणि मातोश्रीवर जाऊन पोहचले. बाळासाहेबांनी त्यांना विचारलं काय झालं? फुंडकर यांनी मनोहर जोशींच्या निर्णयाबद्दल त्यांना सगळं सांगितलं आणि म्हणाले,

“साहेब, तुम्ही शब्द दिला होता पण, काहीतरी विपरित घडलंय. शेतक-यांवर अन्याय करणारा निर्णय होत असेल तर मी पणन महासंघाचा अध्यक्ष राहणार नाही.”

बाळासाहेब त्यांना शांत करत म्हणाले काही काळजी करू नकोस. मी बघतो काय झालय ते.

तिथल्या तिथे त्यांनी मुख्यमंत्र्याना फोन फिरवला आणि त्यांना कापसाला २१०० रुपयांचा भाव देण्यासाठी सांगितले. लगेच मनोहर जोशी यांनी २१०० रुपयांचा भाव जाहीर केला. बाळासाहेब ठाकरेंचा रिमोट म्हणजे काय आणि त्याची ताकद पांडुरंग फुंडकर याना अनुभवायला मिळाली होती.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.