बाळासाहेब अण्णा हजारेंना वाकड्या तोंडाचा गांधी असं का म्हणाले होते??

गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली. राज्यात शिवसेना आणि भाजप यांचे युतीचे सरकार होते. मनोहर जोशी मुख्यमंत्री आणि गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते. अनेक वर्षांच्या प्रयत्नांनी विधानभवनावर भगवा झेंडा फडकवण्यात युतीला यश आलं होतं.

मुख्यमंत्री मनोहर जोशी हे जरी असले तरी सत्तेचा रिमोट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे होता.

साधारण याच काळात चर्चेत आलेलं आणखी एक नाव म्हणजे जेष्ठ समाजसुधारक अण्णा हजारे. एकेकाळी आर्मीत असलेले अण्णा राष्ट्रपिता महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी भारावून जाऊन गावी परत आले.

जवळजवळ कायमच्या दुष्काळी प्रदेशात असलेल्या आपल्या राळेगणसिद्धी या दुर्लक्षित गावात त्यांनी ग्रामस्थांसह अनेक दशके अथक प्रयत्‍न करून कायापालट केला. दारूबंदी, वनीकरण, स्वच्छता अभियान, कुर्‍हाडबंदी, पारदर्शी प्रशासन, आर्थिक स्वावलंबन इ. उपक्रमांनी त्यांनी राळेगणसिद्धीला महाराष्ट्रातील आदर्श गाव बनवलं.

सामाजिक परिवर्तनाबरोबरच भ्रष्ट राजकारणी आणि प्रशासन यांविरुद्ध अण्णांनी जनआंदोलन छेडले.

त्यांनी भ्रष्टाचारविरोधी पहिली चळवळ शरद पवार हे मुख्यमंत्री असताना सुरू केली होती. महात्मा गांधींच्या सत्याग्रह व उपोषण या मार्गाचा वापर करून अण्णा हजारे लढत होते.

त्यांचं सर्वात गाजलेलं आंदोलन होतं शिवसेनेच्या मंत्र्याविरोधात.

खरंतर अण्णा हजारे व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संबंध पूर्वी चांगले होते. युतीच्या मंत्र्यांविरुद्ध काही तक्रार असेल तर अण्णा मातोश्रीवर जाऊन भेटत होते. एकदा तर पत्रकार परिषदेमध्ये अण्णा म्हणाले होते की,

शिवसेनाप्रमुख हाच आता आशेचा किरण आहे. केवळ तेच हा सर्वव्यापी भ्रष्टाचार मोडून काढण्याचे धाडस दाखवू शकतात. अन्य कोणातही हिंमत नाही.

पण या दोघांच्यातला समन्वय फार काळ टिकला नाही. युती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात २० नोव्हेंबर १९९६ रोजी अण्णांनी सुरू केलेले उपोषण सुरू केलं. हे उपोषण १२ दिवस चालले.

३ डिसेंबर १९९६ रोजी युती सरकारमधील महादेव शिवणकर व शशिकांत सुतार या दोन मंत्र्यांचा राजीनामा घेऊनच अण्णांचे उपोषण संपले.

मंत्र्यांनी राजीनामा द्यावा म्हणून अण्णांनी केलेलं उपोषण शिवसेनाप्रमुखांना पसंत पडले नव्हते. हा एकप्रकारे टाकलेला दबाव होता व बाळासाहेबांना दबाव झुगारून देण्याची सवय होती.

शिवसेना व अण्णा हजारे यांच्यातील संबंध विकोपाला जाण्यास सुरवात झाली.

अशातच अण्णा हजारे यांनी सेनेच्याच समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्या विरुद्ध आंदोलन छेडले. बबनराव घोलप यांनी सत्तेत आल्यावर आपल्या बायकोच्या नावे नाशिक येथे मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केली होती असा आरोप अण्णा हजारेंनी केला.

मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याजवळ बबनराव घोलप यांना मंत्रीपदावरून हटवा अशी मागणी केली.

अण्णा पुन्हा उपोषणाला बसले. घोलप यांना राजीनामा द्यावा लागला.

याकाळात बाळासाहेबांची धारणा झाली की अण्णा हजारे हे शिवसेनेच्या मंत्र्यांना मुद्दामहून टार्गेट करत आहेत. बाळासाहेब व्यंगचित्रकार होते. प्रबोधनकारांच्या वक्तृत्वाचा ठाकरी शैलीचा वारसा त्यांना मिळाला होता. औरंगाबाद जवळील करंजखेडा या सभेत त्यांनी अण्णा हजारेंवर तुफान टोलेबाजी केली.

याच सभेत ते अण्णा हजारेंना पहिल्यांदा वाकड्या तोंडाचा गांधी म्हणाले.

पुढे शिवसेनाप्रमुखांनी असे म्हटल्याचा इन्कार केला. मात्र पेटलेल्या शिवसैनिकांनी हेच विशेषण उचलून धरले. सामनाच्या अग्रलेखात देखील अप्रत्यक्षरित्या अण्णा हजारेंना वाकड्या तोंडाचा गांधी म्हणून अनेकदा टर उडवण्यात आली.

पुढे बबनराव घोलप भ्रष्टाचार प्रकरणात कोर्टात गेले.

त्यांनी आपल्यावरील आरोप अमान्य करत उलट अण्णा हजारेंच्या विरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा केला.

अण्णा हजारेंना बबनराव घोलप यांच्या विरोधातील आरोप सिद्ध करता आले नाहीत. अण्णांना कोर्टाने तीन महिन्याचा कारावास सुनावला.

याच्याही विरोधात अण्णांनी ९ ते १८ आगस्ट १९९९ दरम्यान १० दिवसाचे उपोषण केले. त्याच वेळी पाच हजार रुपयांच्या बॉंडवर सोडून देण्याची अटही कोर्टाने घातली होती. ती सवलत नाकारून हजारे यांनी तुरुंगात जाणे पसंत केले होते.

सप्टेंबर १९९९ साली अण्णा हजारेंना अटक झाली व त्यांना पुण्याच्या येरवडा तुरुंगात टाकण्यात आले.

मात्र जनरेट्याच्या वाढत्या प्रभावामुळे राज्य सरकारला झुकावे लागले. मुख्यमंत्र्यांनी अण्णा हजारेंना स्वतःच्या अधिकारात तुरुंगातून मुक्त केले. पुढे अपिलात सेशन्स कोर्टाने अण्णांना निर्दोष ठरवले.

या भ्रष्टाचाराचा आरोपामुळे जनतेचा युती सरकार बद्दलचा अपेक्षाभंग झाला. तेव्हाच्या निवडणुकीत शिवसेना सरकार पुन्हा सत्तेत येऊ शकले नाही मात्र यासाठी बाळासाहेबांनी काही प्रमाणात अण्णा हजारेंना कारणीभूत ठरवले. त्यांचे संबंध पुन्हा कधी सुधारले नाहीत.

वेळोवेळी बाळासाहेबांनी अण्णा हजारेंवर टीका करण्याचेच धोरण स्वीकारले होते.

मात्र २०११ च्या उपोषणावेळी मात्र शिवसेनाप्रमुखांनी आपल्यातले सर्व वाद बाजूला ठेवून अण्णा हजारे यांना प्रकृतीची काळजी घेण्याबद्दल हृदयस्पर्शी पत्र पाठवले व सर्व वादावर पडदा टाकला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.