गटारीच्या घाणीतून वाट काढत शिवसेनाप्रमुख त्या झोपडपट्टीत पोहचले

आज कालच्या राजकारणात बाळासाहेब ठाकरे हे नावच दंतकथा बनलं आहे. करोडो लोक त्यांच्यावर इतकं प्रेम करायचे, त्यांच्या शब्दावर अख्खी मुंबई बंद पडायची. अगदी विरोधकदेखील त्यांच्याबद्दल आदरानेच बोलायचे हे सगळं आज अनेकांना कोडंच वाटते.

एखादी लाट वगैरे नाही तर तब्बल शिवसेनेची पन्नास वर्षे हा वाघ जनतेच्या मनावर राज्य करतच राहिला.

ते प्रचलित अर्थाने राजकारणी नव्हते. उमदा स्वभाव, दोन द्यावे व दोन घ्यावे ही बाळासाहेबांची वैशिष्ट्य. त्यांची मुख्य ताकद होती त्यांचे शिवसैनिक. बाळासाहेब या शिवसैनिकांचे उर्जास्थान होते. त्यांच्यासाठी आपले जीव ओवाळून टाकण्यासाठी देखील ते तयार असायचे. या कट्टर शिवसैनिकांनी मुंबईत मराठी टिकवली. राजकारणाचा आवाज बनवली.

बाळासाहेबांचा शिवसैनिकांवर इतका करिष्मा कसा होता याच उत्तर रमेश देव यांनी सांगितलेल्या एका किस्स्यात कळते.

सत्तरच्या दशकातली गोष्ट. शिवसेना अजून जम बसवत होती. ठिकठिकाणी सेनेच्या शाखा उभ्या राहत होत्या. अशीच एक शाखा मुंबईच्या सांताक्रूझच्या झोपड्पट्टीतळे तरुण सुद्धा सुरु करणार होते.

सुप्रसिद्ध अभिनेते रमेश देव देखील याच भागात राहायचे. त्यांच्या घरापासून ही झोपडपट्टी जवळ होती. तेव्हा तिथली मुलं रमेश देव यांच्याकडे आली. त्यांना शिवसेनेची शाखा सुरु करतोय असं सांगितलं. रमेश देव म्हणाले उदघाटनासाठी थेट बाळासाहेबांना बोलावू. हे ऐकून ते तरुण हरखून गेले. त्यांनी जोरदार तयारी केली.

रमेश देव यांचं नाव मराठी सोबतच हिंदी सिनेमातही गाजत होतं. बाळासाहेबांशी त्यांची चांगली ओळख होती. रमेश देव यांनी जेव्हा या झोपडपट्टीतल्या शाखे बद्दल त्यांच्या कानावर घातलं तेव्हा बाळासाहेब खुश झाले. त्यांनी लगेच उदघाटनासाठी येतो म्हणून कळवलं.

तो दिवस उजाडला. सांताक्रूझ मधली ती झोपडपट्टी दिवाळी प्रमाणे सजली होती. शिवसेनाप्रमुखांची गाडी आली. लोक गर्दी करून उभे होते. रमेश देव त्यांच्यासोबत होते.  बाळासाहेब गाडीतून उतरले आणि कार्यक्रमाच्या ठिकाणच्या दिशेने निघाले.

पण तिथे नेमकी एक गटार फुटली होती. त्या गटारीतून गलिच्छ असा वास येत होता. बाळासाहेब पांढराशुभ्र झब्बा पायजमा घालून आले होते. त्यांचे कपडे खराब होतील म्हणून रमेश देव त्यांना म्हणाले,

“साहेब आपण थोडंसं फिरून जाऊ. ”

यावर बाळासाहेब म्हणाले,

“का ? माझे लोक, माझे शिवसैनिक ज्यांनी शाखा निर्माण करण्यासाठी मला बोलावलंय, ते  जर या घाणीतून जाऊ शकत असतील तर मी का नाही ? मी त्यांचा आहे आणि ते माझे आहेत. ते जातात तर मलाही येथून जायलाच पाहिजे.” 

अगदी त्या गटारीच्या घाणीतून बाळासाहेब शिवसेनेची शाखा उदघाटन करण्यासाठी पोहचले. तिथं जमलेल्या सगळ्या गर्दीला त्यांनी आपल्या एका छोट्याशा कृतीतून जिंकून घेतलं. त्यांनी त्या शिवसेना शाखेचा नारळ तर फोडलाच पण शाखेचं पहिलं काम म्हणून तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांना खडसावलं आणि ती गटार बांधायला लावली.

रमेश देव म्हणतात,

“त्या दिवशी मला कळालं लोक बाळासाहेबांवर इतकं प्रेम का करतात.”

महाराष्ट्राने व देशाने कित्येक राजकारणी पहिले. त्यांनी प्रचंड लोकप्रियता देखील कमावली मात्र बाळासाहेबांसारखी जादू ते कमावू नाही शकले ते याच कारणामुळे.

हे ही वाच भिडू.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.