बाळासाहेब विखे पाटलांना पहिल्याच निवडणुकीत पाडण्यासाठी मोठी सेटिंग लागली होती.

बाळासाहेब विखे पाटील म्हणजे राजकारणातील भीष्मपितामह. तब्बल ८ वेळचे खासदार, त्याही आधी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि सहकारच्या माध्यमातून नगर जिल्ह्यात विकासाची गंगा आणणारे नेते म्हणून त्यांना ओळखलं जात.

अशा या नेत्याच्या पहिल्या लोकसभेच्या विजयाची कहाणी मात्र मोठी रंजक आहे. नगर जिल्ह्याचं राजकारण म्हणजे संपूर्ण राज्यात पहिल्यापासूनच चर्चिला जाणारा विषय. इथे विठ्ठलराव विखे पाटील, आण्णासाहेब शिंदे, बाळासाहेब विखे पाटील, बी. जी खताळ, यशवंतराव गडाख, प्रसादराव तनपुरे असे अनेक दिग्गज होऊन गेले. त्यामुळेच या जिल्ह्यात इच्छाशक्तीच राजकारण असल्याचं सांगितलं जात.

याच राजकारणातून १९७१ च्या निवडणुकीत ऐन वेळी आणि जबरदस्तीने बाळासाहेब विखेंना लोकसभेची उमेदवारी मिळाली. १९६२ साली ते पहिल्यांदा जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकले आणि तिथून त्यांचा राजकीय प्रवास चालू झाला होता.

त्यावेळी कोपरगाव (अहमदनगर उत्तर) मतदारसंघातुन खासदार म्हणून राज्यातील मोठे काँग्रेस नेते आणि त्यावेळचे केंद्रीय मंत्री राहिलेले अण्णासाहेब शिंदे सलग २ वेळा निवडून गेले होते. पण १९७१ च्या निवडणुकीमध्ये त्यांनी मतदारसंघ बदलून शेजारचा नगर दक्षिण मतदारसंघ देण्याचा आग्रह धरला. त्यासाठी यशवंतराव चव्हाण यांच्याकडून त्यांनी तो हट्टाने मागून देखील घेतला.

याला कारण होत कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. पी.बी.कडू पाटील यांनी १९६२ च्या तुलनेत १९६७ च्या निवडणुकीत कोपरगावमध्ये शिंदेंचे मताधिक्य ६७ हजारांवरून थेट १५ हजारांवर आणले होते. त्यामुळे पुढचा पराभवाची भीती मनात घेऊन शिंदे यांनी अहमदनगर दक्षिण या मतदारसंघातून उभं राहण्याचा निर्णय घेतला.

आण्णासाहेब शिंदेंसारख्याच मोठ्या नेत्याने मतदारसंघ बदलल्यामुळे पर्यायी उमेदवाराचा शोध सुरु झाला. कम्युनिस्ट पक्षाचे कडू पाटील यांच्या वाढलेल्या प्रभावामुळे काँग्रेसचा कोणताही उमेदवार इथून उभा राहायला तयार होत नव्हता.

अशावेळी माजी मंत्री बी. जे. खताळ आणि जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष शंकरराव काळे या काँग्रेसच्या पुढाऱ्यांची नाव पुढं आली. पण यशवंतराव चव्हाण म्हणाले खताळ मला राज्याच्या मंत्रिमंडळात हवे आहेत. काळे यांनी देखील मला कारखाण्याच्या राजकारणात आणि आमदार होऊन राज्याच्या राजकारणात राहायचं म्हणत लोकसभेला नकार दिला.

अखेरीस यशवंतराव चव्हाण वैतागून विठ्ठलराव विखे पाटील यांना म्हणाले, काय करायचं विखे पाटील? कोणाला उभं करायचं? जिल्ह्यातील एकही काँग्रेसचा उमेदवार उत्तरमधून उभं राहायला तयार नाही. तुम्ही उभं राहणार का? त्यावेळी विट्ठलरावांनी प्रांजळपणे नकार दिला. ते कधीही निवडणुकीच्या राजकारणात उतरले नाहीत.

त्याच दरम्यान चंद्रभान पाटील आठरे कम्युनिस्ट पक्षातून काँग्रेसमध्ये आले. विठ्ठलराव विखे यांनी त्यांच्याशी बोलून उमेदवारी संबंधित विचारणा केली. पुढे काकासाहेब मस्के आणि शंकरराव कोल्हे यांनी आठरे पाटील यांना काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यास तयार देखील केलं.

आठरे यांनी देखील ती स्वीकारल्याच जाहीर केलं. यशवंतराव देखील अगदी योग्य उमेदवार दिला म्हणून खुश झाले.

यानंतर शंकरराव काळे हे आठरे पाटलांना “तुम्ही उभं राहिलाच आहेत तर देवदर्शन घेऊन येऊ”, असं म्हणत आळंदीला घेऊन गेले. जाताना त्यांच्या मनात कसलीही चलबिचल नव्हती.

आल्याच्या दुसऱ्याच दिवशी मात्र त्यांनी निवडणूकीतुन माघार घेत असल्याचं जाहीर केलं. 

बाळासाहेब विखे पाटील त्यावेळी जिल्हा काँग्रेस समितीचे चिटणीस होते. सोबतच १० वर्ष जिल्हा परिषद सदस्य म्हणून सक्रिय राजकारणात होते. आणि प्रवरा कारखान्याचे अध्यक्षपद देखील होत.

अशावेळी यशवंतराव चव्हाण यांनी विठ्ठलराव विखे यांच्याशी संपर्क करून “तुम्ही दिलेल्या उमेदवाराने फसवलं, आता निदान तुमच्या मुलाला तरी उभं राहायला सांगा” असा आदेश वजा निरोप दिला. विठ्ठलरावांनी घरी येऊन बाळासाहेब निवडणुकीला उभं राहत असल्याचे जाहीर केले. त्यावर तो कसा काय उभं राहणार असे सवाल विचारले जावू लागले.

त्यावर विठ्ठलराव विखे पाटील म्हणाले,

“तो नाही उभा राहील तर त्याचा बाप उभा राहील”

अशा पद्धतीने बाळासाहेब विखे पाटील यांच्या गळ्यात बळे-बळे लोकसभेची उमेदवारी आली. यशवंतरावांना तसं कळवण्यात आलं. या उमेदवारीच्या मागचं राजकारण सांगताना बाळासाहेब आपल्या आत्मचरित्रात म्हणतात,

त्यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असलेले शंकरराव काळे यांच्या अगदी मनासारखी गोष्ट झाली होती. त्यासाठीच त्यांनी आठरेंना उमेदवारी मागे घेण्यासाठी आळंदीला नेले. यामागे कडू पाटील निवडून यावेत अशी त्यांची इच्छा होती.

यामुळे कडू पाटील आणि विखे पाटील यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होईल. काँग्रेसच्या ढासळत चालेल्या बालेकिल्ल्यात विखे पाटील यांचा मुलगा पडला, तर त्याची इभ्रत जाईल, दुसरी गोष्ट तो जर आमदारकीला उभं राहिला; तर विखे पाटील यांचा मुलगा म्हणून यशवंतराव त्यालाच राज्यात मंत्री करतील, मग आपल्याला संधी नाहीच. असं सगळं काळे यांचं यामागे राजकारण होत.

हा राजकारणाचा पहिला भाग, दुसरा भाग असा कि,

बाळासाहेब विखे यांचं नाव यशवंतरावांना मान्य होत पण, अद्याप अधिकृत उमेदवारी जाहीर झाली नव्हती. तेव्हा त्यांच्या पराभवाचे खापर काँग्रेस पक्षाचे सदस्य म्हणून आपल्या डोक्यावर नको म्हणून हीच सगळी मंडळी यशवंरावांकडे जाऊन सांगू लागली, कि बाळासाहेब निवडून येण्याची शक्यता नाही. त्यामुळे त्याला तिकीट देऊ नका.

त्यावर यशवंतराव म्हणाले, निवडून येऊ शकेल असं दुसरं नाव सुचवा आणि निवडून आणायची जबाबदारी घ्या. त्यावर कोणीच नाव सुचवले नाही. मग मात्र यशवंतरावांनी ठामपणे सांगितलं, बाळासाहेबांनाच उभं करू बघूया काय निकाल होतो ते!

अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यावर बाळासाहेबांनी सगळा मतदारसंघ पिंजून काढला. गावा-गावात प्रचार सुरु केला. जिल्हा परिषदेच्या एका मतदारसंघाच्या प्रचाराच्या अनुभवावर त्यांनी अर्धा जिल्हा म्हणजे जवळपास ६५० गाव फिरायला चालू केली. यशवंतरावांनी देखील राज्यभरातील प्रचारामधून वेळ काढून २ प्रचारसभा घेतल्या.

इकडे संगमनेर, अकोला,  राहुरी  हे तालुके तर कट्टर कम्युनिस्ट म्हणून परिचित होते. कडू पाटील यांनी देखील मागील ५ वर्षात चांगला जनसंपर्क वाढवला होता. त्यामुळे ते निवडणूक येण्याची शक्यता होती. त्यामुळे भागातील पत्रकार देखील कशाला तुम्ही लोकसभेला उभं राहिलात असा प्रश्न विचारायचे. शिवाय काँग्रेसचे स्थानिक पातळीवरचे अंतर्गत राजकारण वेगळेच.  

मात्र या सगळ्या प्रयत्नानंतर देखील नवखा उमेदवार म्हणून शिक्का पडलेले बाळासाहेब विखे पाटील आपल्या पहिल्याच निवडणुकीत तब्बल ६९ हजार ४४२ मतांनी निवडून आले.

राहुरी सोडून सगळ्याच तालुक्यांमधून त्यांना आघाडी मिळाली होती. राहुरीत कडू पाटील यांना २ हजार ७६३ मतांची आघाडी मिळाली.

स्वतःच्या जिल्हा परिषदेच्या कामाच्या जोरावर आणि वडील विट्ठलरावांच्या कामाच्या पुण्याईने बाळासाहेबांनी लोकसभेच मैदान मारलं. पुढे १९७१ ते १९९१ व १९९८ ते २००९ असे आठ वेळा विखे-पाटील लोकसभेवर निवडून आले.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.