गांधी टोपीवाल्या विखेंना पाहून त्यांना वाटायचं, अटलजींनी हा कसला अर्थमंत्री दिलाय…

डोक्यावर गांधी टोपी अंगात तसाच साधा अंगरखा व पायजमा. प्रथमदर्शनी पाहिलं तर हा गावाकडचा दहावी पास पाटील गावचा सरपंच जास्तीतजास्त एखाद्या साखर कारखान्याचा चेअरमन असेल असं वाटायचं. ते होतेच तसे. गावंचे पाटील होते, साखर कारखान्याचे चेअरमन होते, पण इतकंच नव्हे तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आणि देशाचे मंत्रीसुद्धा राहिले.

ते होते पद्मभूषण एकनाथराव विठ्ठलराव विखे उर्फ बाळासाहेब विखे पाटील

बाळासाहेबांची वेशभूषा पहिली तर अनेकांना त्यांच्या बद्दल गैरसमज होणे साहजिकच आहे, विशेषतः दिल्लीत त्यांच्या बद्दल अनेक वदंता असायची. असाच एक अनुभव खुद्द सुषमा स्वराज यांनी आपल्या आठवणींमध्ये सांगितला आहे.

सुषमा स्वराज आणि बाळासाहेब विखे यांचा परिचय संसदेतच झाला. 

नव्वदच्या दशकातील गोष्ट. अटलबिहारी वाजपेयी तेव्हा देशाचे पंतप्रधान होते. त्यांच्या राष्ट्रीय लोकशाही दल म्हणजेच एनडीएमध्ये शिवसेना व इतर अनेक मित्रपक्ष होते. सुषमा स्वराज तेव्हा अटलजींच्या मंत्रिमंडळात माहिती व प्रसारण मंत्री होत्या. 

भाजपच्या दुसऱ्या फळीतल्या तेजतर्रार नेत्या म्हणून सुषमा स्वराज यांना ओळखलं जायचं. त्या नुकताच दिल्लीच्या मुख्यमंत्री देखील राहिल्या होत्या. अटलजींच्या लाडक्या मंत्र्यांमध्ये त्यांचा समावेश व्हायचा.

 बाळासाहेब विखे पाटील तेव्हा शिवसेनेत होते आणि एनडीएच्या सरकारमध्ये विखे पाटलांना केंद्रीय अर्थराज्यमंत्रिपद दिल होतं.

अर्थमंत्रालय म्हणजे मोठी अवघड जबादारी. बाळासाहेबांच्या सोबत मंत्रिमंडळात असणाऱ्या सुषमा स्वराज आपल्या एका लेखात सांगतात  

विखे पाटलांच्या पेहेरावाकडे बघितल्यावर वाटत नाही ते इतके अनुभवी व मुरब्बी राजकारणी आहेत. राजकारणातील जटिल समस्यांवरही त्यांच्याकडे तोडगा असतो.बाळासाहेबांबद्दल प्रारंभी माझ्या मनात काही शंका होत्या. प्रसंगी अर्थमंत्र्यांकडे या व्यक्तही केल्या होत्या. 

तेव्हा केंद्रीय अर्थमंत्री होते यशवंत सिन्हा. यशवंत सिन्हा प्रचंड अनुभवी व एक अर्थतज्ज्ञ म्हणून ओळखले जायचे. एकदा सुषमा स्वराज आणि त्यांच्या गप्पा सुरु होत्या. त्यावेळी बोलताना बाळासाहेब विखे पाटलांचा विषय निघाला. सुषमाजी यशवंत सिन्हा यांना म्हणाल्या,

 ‘अटलजींनी तुम्हाला असा राज्यमंत्री दिला आहे की, अर्थ खात्याचे सर्व काम तुम्हालाच करावे लागेल. तुमच्या सहकाऱ्यावर तुम्हाला बिलकूल अवलंबून राहता येणार नाही.’

 यावर यशवंत सिन्हा म्हणाले,

‘सुषमाजी, आपण त्यांना ओळखत नाही. ते अनुभवसंपन्न आहेत. सहकारी क्षेत्रातील कामाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. आतापर्यंतच्या सर्व सहकाऱ्यांत सर्वांत जास्त कार्यक्षम असे ते आहेत. त्यामुळे त्यांच्यावर मी विश्वास टाक शकतो.’

 त्या काळात सिन्हा यांचे हे उत्तर ऐकून सुषमा स्वराज यांना जरा आश्चर्यच वाटले. गावाकडचा राजकारणी अर्थमंत्रालयाच्या जटिल समस्या कसा सोडवू शकेल हा त्यांना विश्वास बसत नव्हता. त्या सांगतात एकेदिवशी लोकसभेत सिन्हा यांच्या या उत्तराचा प्रत्यय मला आला. 

विरोधकांनी अर्थ खात्याशी संदर्भात कुठल्या तरी अवघड विषयावर प्रश्न विचारला होता आणि अर्थराज्यमंत्री म्हणून बाळासाहेब विखे पाटील या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी उभे राहिले. 

सुषमा स्वराज म्हणतात,

विखे पाटील वित्त मंत्रालयाच्या प्रश्नांना उत्तर देताना ज्या धीरगंभीरपणे बोलत होते, ते ऐकल्यावर मला माझी चूक उमगली, त्यांच्याबद्दल माझे अज्ञानच होते ते दूर झाले. ज्या आत्मविश्वासाने विखे लोकसभेत उत्ते देत होते. त्यावरून सिन्हा यांच्या विधानाला पुष्टीच मिळाली.

त्या सांगतात, विखे यांची साधी राहणी पाहून त्यांच्याबद्दल मी चुकीचा अंदाज केला होता. लोकसभेतील त्यांच्या उत्तरामागे त्यांचा प्रदीर्घ अनुभव ठायीठायी जाणवत होता. त्या दिवसापासून मी त्यांची स्तुतिपाठकच बनले. संसदेत आम्ही एकत्रच काम केले. त्यानंतर त्यांचा व आमचा स्नेहबंध वृद्धिगत होत गेला. 

पुढे बाळासाहेब विखे पाटील पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. पण तरी त्यांचा व सुषमा स्वराज यांच्यातील स्नेह तसाच कायम राहिला.  दिल्लीला आले की संसदेत त्यांची सुषमा स्वराज यांच्याशी भेट होत असे. सुषमाजी सांगतात त्यांच्या बद्दलचा आदर कायम राहिला.  

हे हि वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.