“उद्धव, आदित्यला सांभाळा, इमान सांभाळा”…बाळासाहेबांचं दसरा मेळाव्यातलं शेवटचं भाषण…

आज कोणता मेळावा गाजणार, कुणाचं भाषण गाजणार हे सगळं थोड्याच वेळात कळेल…३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा पार पडला. १९६६ पासून ते २०१२ पर्यंत बाळासाहेबांनी प्रत्येक दसरा मेळावे गाजवले.  पण २०१२ मधील त्यांचा शेवटचा दसरा मेळावा प्रत्येक शिवसैनिकांच्या मनात घर करून असेल.

पण आजच्या मेळाव्यात शिवसेनेत पडलेले दोन गट पाहून कोणत्याही शिवसैनिकाला मनातून दुःखच होत असणारमग तो शिवसैनिक ठाकरेंच्या गटात असो वा शिंदेंच्या गटात असो…

२०१२ मध्ये आजारपणामुळे बाळासाहेब ठाकरेंनी शिवाजी पार्कवर त्यांचे शेवटचं भाषण व्हर्चुअली दिले होते. बाळासाहेबांचं रेकॉर्ड केलेलं भाषण मेळाव्यात मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात आलं होतं. 

तेच भाषण काय होतं सविस्तर बघूया….

“मी थकलोय, शारीरिकदृष्ट्या कोसळलोय, मला बोलतानाही धाप लागतेय, मला चालता येत नाही, दिवसभर पडून असतो, कसला हा आजार मला? तुम्हाला भेटण्याची तीव्र इच्छा होती; पण जाऊ द्या. मी ४५ वर्ष शिवसेना सांभाळली, तुम्हांला सांभाळलं. आता उद्धव, आदित्यला सांभाळा…. इमानाला महत्त्व द्या. मी घराणेशाही लादली नाही, ती तुम्ही स्वीकारली, आता तुम्हीच सांभाळून घ्या.

“माझी तीव्र इच्छा होती आपल्या सगळ्यांना भेटायची; पण काय करू, माझी दुखणी सुरूच आहेत. नऊ दिवसांचा आजार हा असा कसा? डॉक्टरांनी मला क्षमा करावी. डॉक्टर जणू रुग्णांची प्रयोगशाळा करून टाकतात. रिऍक्शन झाली की, पुन्हा त्यावरही गोळ्या.. याला काही अर्थ नाही. उद्धव काम करत राहिला, दुखणं अंगावर घेतलं नशीब… कुठे परदेश दौऱ्यावर नव्हता, वेळेवर आला बरं झालं. त्याची अँजिओप्लॅस्टी झाली. तो घरी आला आणि आमची रवानगी हॉस्पिटलमध्ये झाली. सगळे रिपोर्ट आले. पण माझं हृदय ठीक होतं आणि असणारही; कारण ते तुमच्याकडे आहे, ते मी कोणालाही देणार नाही. आता शारीरिकदृष्ट्या कोसळलोय. मला बोलताना धाप लागतेय… मला चालता येत नाही. दिवसभर बेडवर पडलेला असतो. ४५ वर्षं मी शिवसेना सांभाळली. अनेक दौरे केले, मैदानं गाजवली आणि आज असं काही होतंय”. 

पंचकडी उखडून फेकून द्या, शरद पवार, सुशीलकुमार बेताल माणसं असं म्हणत बाळासाहेबांनी टीका केली होती.

“काय देशाचा कारभार चालला आहे. सगळा भिकारचोट पद्धतीनं सुरू आहे. मी कधी सुशीलकुमारांवर बोललो नाही, पण आज हेच सुशीलकुमार म्हणतात, घोटाळे विसरून जाणार, अरे काय बोलतोय काय तू? उद्या वडरांच्या बाबतही बोलशील का? मुळात ते (गांधी) घराणंच लोक विसरले पाहिजेत. ते नष्ट होऊ दे, अशी मी प्रार्थना करतो. ही पंचकडी म्हणजे सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, अहमद पटेल, रॉबर्ट वडरा ही देशावर लादली गेलेली आहे. यांनी देशाची वाट लावली आहे. तुम्ही मुर्दाड हिंदू ही भयंकर गोष्ट कशी चालवून घेता? भयंकर चाललंय सगळं… ही पंचकडी उखडून फेकून द्या, नुसते बोंबलत बसू नका. आता कसं बोंबलायचं हेही मी सांगू का? उलटा हात घ्यायचा की सोईचा हात घ्यायचा, हेही सांगायचंय का?

नांदेड पालिकेत एमआयएम पक्षाचे ११ नगरसेवक निवडून कसे आले? असं म्हणत बाळासाहेबांनी MIM वर टीकास्त्र सोडलं.

“त्या नांदेड पालिकेत आंध्राच्या एमआयएम पक्षाचे ११ नगरसेवक कसे निवडून आले? भयंकर चाललंय सगळं… बरं, यात त्या अशोकरावांचा उदो-उदो झाला आणि त्या मुंबई हिंसाचारात मुंब्य्रातील मुसलमानांचा काय संबंध? सगळी वाट लावून टाकली आहे. इंदिरा गांधींनी जो निर्णय घेतला होता, त्याची पुनरावृत्ती व्हावी.. आसाममध्ये सैन्य घुसवा, आणि साफ करा… संख्या कमी करा. शिवसेना सत्तेवर होती तेव्हा एकही दंगल झाली नाही. आजही दणका देण्याची तयारी फक्त शिवसेनेत आहे. मला सीमाप्रश्नाचं काय सांगता.. वडरा, तुझ्या घरातला एक तरी गेला का रे सीमाप्रश्नावर बोलायला?

‘मराठी माणसानं तरी सेनेच्या विरोधात उभं राहू नये. ‘

आज मी ८६ वर्षांचा आहे. गेली ४५ वर्ष शिवसेना सांभाळली, उभारली. हे दादर सांभाळलं. पण आज ह्याच दादरचे दोन तुकडे झाले. ज्या दादरमध्ये मी शिवसेनेचं भवन उभं केलं, त्या दादरमध्ये शिवसेनेचे दोन तुकडे पाडले गेले. ते करायला नको होतं. एकत्र या, आणि काँग्रेसला धूळ चारा.

शरद पवारांना शरम वाटत नाही का? – बाळासाहेब ठाकरे

“मुंबई म्हणे बहुभाषिकांची, असं शरद पवार म्हणतात. त्यांना हे म्हणायला शरम नाही वाटली का? मुंबई ही माझ्या मराठी बांधवांची आहे, त्यांनी ही मुंबई मोठी केली. तुम्ही अजित गुलाबचंदला ओळखता का? मुख्यमंत्र्यांच्या मांडीखाली ठेवलंय. गुपचूप जाऊन भेटी घेतात. कसं काही वाटत नाही तुम्हांला. त्या मंत्रालयाला आग लागली. फाइली जाळल्यात त्यांना बरं झालं. आणि म्हणे श्वेतपत्रिका काढणार, शी…

‘अवर नेशन इज द नेशन ऑफ क्लीन चिट ॲण्ड चीटर्स’

कोणत्याही घोटाळ्यात कोर्टानं याला दिलासा दिला, त्याला दिलासा दिला; अरे पण कशासाठी दिला. त्याला आठ दिवस जुळवाजुळव करण्यासाठी दिले? आणि तेही तो करणारच, आणि नंतर का आलं पुन्हा ते क्लीन चिट… भयंकर चाललं आहे सगळं…. हे क्लीन चिट नाही, हे तर अवर नेशन इज द नेशन ऑफ क्लीन चिट आणि चीटर्स असं झालंय.

‘उद्धव, आदित्यला सांभाळून घ्या’ कृपा करा आणि उठा, आवाज करा. तिकडे छोटे-छोटे देश आंदोलनं करत आहेत. तुमच्या अंगात रक्त आहे का नाही? तुमच्या रक्तात धमक असेल, तर उठा! माझ्यावर कृपा करा. शिवसेना काय करतेय म्हणे, आजवर खूप काही केलं. पण बाबांनो, आता मी थकलोय. मी मैदान गाजवणारा माणूस. आता बिछान्यावर पडून आहे. उद्धव म्हणतो, व्यंगचित्रांचं पुस्तक काढणार… शिवतीर्थावर आजही येण्यासाठी आतुर आहे. पण आज अंगात ताकद नाही. ४५ वर्षं मी शिवसेना सांभाळली. आता झेपत नाही. मी तुम्हांला सांभाळलं… इमान सांभाळून ठेवा.

शिवसेनेला कोणी हरवू शकणार नाही. शरद पवारांचं ठीक आहे.. पण मी घराणेशाही लादली असेल तर विसरून जा.. मी लादली नाही, आणि तुम्हीही ती स्वीकारली.. सांभाळून घ्या… उद्धव, आदित्यला सांभाळा आणि इमानाला महत्त्व द्या. तमाम महाराष्ट्राला माझी ही नतमस्तक विनंती….

– शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे 

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.