ज्याचा प्रचारासाठी आले त्याची उमेदवारीच बाळासाहेबांनी भर प्रचारसभेत बदलली…

१९९५ सालच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरु होता. राज्यातील शरद पवारांच्या सत्तेला धक्का बसणार याची चिन्हे दिसत होती. प्रचारावेळीपासूनच शिवसेना आणि भाजपच्या युतीने आघाडी घेतली होती. दोन्ही पक्षांचे नेते महाराष्ट्र पिंजून काढत होते. सर्वसामान्य लोकांचाही त्यांना प्रतिसाद मिळत होता.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भाषणे विशेष गाजत होती. त्यांच्या आक्रमकतेने अख्ख्या महाराष्ट्राला मोहिनी घातली होती. अशीच त्यांची एक आक्रमक सभा भुसावळला झाली होती. पण या सभेत उपस्थितांना बाळासाहेबांच्या आक्रमकतेसोबतच त्यांचं निर्णय घेण्याचं धक्कातंत्र देखील प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं होतं.

हा धक्का देणारा निर्णय म्हणजे बाळासाहेब ज्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आले होते, त्याच उमेदवाराला बाळासाहेबांनी प्रचारसभेतच बदलले होते.

त्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने भुसावळ मतदारसंघातुन जळगावचे तत्कालिन जिल्हाप्रमुख राजेंद्र दायमा यांचे नाव निश्चित केले होते. तशी त्यांची उमेदवारी देखील जाहिर झाली होती. त्यानुसार दायमांच्या प्रचारासाठी बाळासाहेब ठाकरेंची सभा आयोजित करण्याच पक्क झालं.

तारीख मिळाली १७ नोव्हेंबर १९९५. दायमा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सभेची तयारी सुरु केली. शहरातील आताचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यावेळच्या डी. एस. मैदानावर सभा निश्चित झाली. शिवसैनिकांनी वखारीतून लाकडी पाट्या आणून १२ फूट उंचीचे व्यासपीठ स्वत: उभारले होते. १२ फूट उंच व १० फूट रुंद मोठे शिवधनुष्य तयार करून व्यासपीठामागे लावले होते.

१७ नोव्हेंबर रोजी ठरल्याप्रमाणे बाळासाहेब आले, सभा सुरु झाली. बाळासाहेबांनी आपल्या आक्रमक भाषणाने वातावरणाचा माहोल बदलून गेला होता. त्यांच्या भाषणाची मोहिनी एव्हाना सगळ्यांनाच पडली होती. आणि अचानक सभेत बाळासाहेबांनी दायमा आणि तत्कालीन जि. प. सदस्य दिलीप भोळे यांना व्यासपीठावर बोलावून घेतले.

राजेंद्र दायमा व भोळे या दोघांचे हात हातात धरून म्हणाले,

‘बघा हा दायमा किती दिलदार आहे, हा म्हणतोय माझी उमेदवारी कापून भोळेंना द्या, या भोळेंना तुम्ही निवडून द्याल का?

उपस्थितांना एक – दोन मिनीटांसाठी हा धक्का होता. पण निर्णय झाला होता. बाळासाहेबांनी उमेदवारी बदलून दिलीप भोळेंना जाहिर केली होती. कारण विचारण्याचे धाडस कोणाच्यातही नव्हते. खुद्द दायमा यांनी देखील कारण विचारले नाही. मात्र उपस्थितांनी आवेशपुर्ण आवाजात ‘हो’ म्हणत बाळासाहेबांच्या या धक्क्याला प्रतिसाद दिला. त्यानंतर बाळासाहेबांनी भोळेंना एक कोपरखळी देखील मारली. म्हणाले,

‘भाेळे आता इतका साधाभाेळा राहू नकाे, आमदार हाे’

भर प्रचारसभेतच आपली उमेदवारी कापली गेली तरी नाराज न हाेता, केवळ बाळासाहेबांच्या शब्दांचा मान राखत राजेंद्र दायमा यांनी भोळेंचा जोमाने प्रचार केला. भोळेंच्या विजयासोबत शिवसेना राज्याच्या सत्तेत आली. यानंतर मुंबईतील एका कार्यक्रमात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवसैनिक कसा असावा, याचे उदाहरण म्हणून राजेंद्र दायमांचा उल्लेख केला. पुढे दायमांना प्रदूषण नियंत्रण मंडळावर सदस्य म्हणून संधी देण्यात आली होती.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.