बलुतं आणि आपण.

दया पवारांच्या बलुतं या आत्मकथनाचे आणि माझे जन्म वर्ष एकच, यंदा बलुतंला चाळीस वर्ष पूर्ण होतायेत. मी यत्ता नववीत असताना पहिल्यांदा बलुतं वाचायला हाती घेतलं. वडील महानगर पालिकेत गटार साफ करणारे बिगारी या हुद्द्यावर काम करणारे, पण जागृत कार्यकर्ता आणि जागृत वाचक असणारे. त्यामुळे आमच्या घरात उचल्या, उपरा,  बलुतं, शुद्र मुळचे कोण होते, बुद्ध आणि त्याचा धम्म ही पुस्तके सहज उपलब्ध होती. बलुतंची दहा पंधरा पाने वाचून झाली असतील नसतील वडील कामावरून आले आणि त्यांनी पाहिले बलुतं वाचन चालू आहे, त्यांनी हातातले पुस्तक काढून घेतले आणि शांतपणे म्हणाले, “घरातली सगळी पुस्तके तुझ्याचसाठी आहेत , काही पुस्तके जरा मोठा झाला कि वाच. हे ही पुस्तक मोठे झाल्यावर वाचायचं.” 

मग त्यांनी बलुतं बाजूला ठेऊन श्री म माटेंचे उपेक्षितांचे अंतरंग वाचायला दिले, ते मी तेंव्हा फक्त त्यांच्यासमोर(च) वाचले आणि ते कामावर गेले का बलुतं वाचन चालू असा कार्यक्रम ठेवला. पाच सहा दिवसात बलुतं वाचून संपले, आणि नंतर डोक्यात फक्त हे काहीतरी भयानक आहे एवढे मला जाणवले, तेंव्हा हैदोस वगैरे हातात न आल्यामुळे बलुत्यातला केवळ वीस टक्के अश्लील असणारा भाग मला शंभर टक्के पुस्तकात हेच आहे अश्या पक्क्या धारणेने डोक्यात बसला आणि बरेच दिवस थ्रील अनुभवून देणारा ठरला. कालांतराने ते विसरून गेलो. पुन्हा बारावीत असताना उन्हाळी सुट्टीत बलुतं असेच हाती लागले आणि वाचू लागलो. गावाकडे आईच्या आणि बहिण्याच्या खाण्याची आबाळ होतेय म्हणून दगडू आई आणि बहिणीला वसतिगृहावर घेऊन येतो आणि मेसमध्ये दगडूची आई भाकरी बडवू लागते. तीन माय लेकरं थोडा सुखाचा घास खाऊ लागतात तर आईला आलेल्या मासिकपाळीमुळे दलित बंधूच विटाळ पाळून चार दिवसांचा बहिष्कार टाकत पचका झाला रं या आरोळ्या देत, दया पवारांच्या आणि त्यांच्या आईच्या मनाला असंख्य इंगळ्या ढसवतात, त्यांच्या बहिणीला चारचौघे मिळून नाचवतात हे वाचून हालून गेलो. धरणीने आपल्याला पोटात घ्यावे अशी भावना दया पवारांच्या मनात निर्माण व्हायला भाग पाडणाऱ्या गर्दीचा त्यादिवशी प्रचंड द्वेष केला. दगडूच्या मनात ठसठसणारी जखम आणि तिची वेदना याची किंचित सल त्यादिवशी जाणवली. 

पुस्तकाच्या पहिल्या पानावर असलेले ज्याक लंडनचे “हा दगड इमारतीच्या बांधकामातून निकामी केलेला.” हे वाक्य कळले नाही पण दुसऱ्या पानावरचे “आई तुझ्यामुळेच दलितांच्या विराट दुःखाचं दर्शन झालं.” हे वाक्य मात्र त्यादिवशी थोडं कळलं आणि बलुतं मनात घर करून गेलं. ९७, साली कोंडवाडा हा काव्यसंग्रह अभ्यासाला लागला आणि पुन्हा दया पवारांची पुस्तकातून गाठ पडली. कवितासंग्रहातल्या कविता आणि पूर्वी वाचलेले बलुतं यातला आशय जवळ जवळ सारखाच वाटल्याने पुन्हा कुतूहलाने बलुतं वाचायला सुरुवात केली. आणि नेमक्या याच वर्षी घाटकोपरमधल्या रमाबाई आंबेडकर नगरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबना प्रकरण आणि नंतरच्या घडामोडी यात अकरा दलितांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली गेली आणि मी त्या दिवशी कॉलेज बंद म्हणून घरी आलो तेंव्हा वडिलांनी माझा निषेध केलेला आणि त्याकडे मी टोटल दुर्लक्ष करून स्वतःला बलुतं वाचनात गुंतवलेले.

बानू बरोबर दगडू जेंव्हा अगस्तीच्या यात्रेत भटकत असतो तेंव्हा त्याला दिसलेला चारपाचशे लोकांचा निळा झेंडा हाती घेतलेला आणि निळ्या टोप्या घातलेला समूह. आणि त्यात आपण नाही ही दगडूच्या मनात जन्म पावलेली लाज, आणि तेंव्हा त्याला बैचेन करून गेलेली त्याची आत्मवंचना हा प्रसंग वाचून मला माझी लाज वाटली आणि मी सायकलवर टांग टाकून मित्रांसोबत विद्यापीठ बंद करायला बाहेर पडलो. बलुतंने एक नवे भान दिले . पहिल्यांदा मनात तिळभर का असेना पण क्रांतिकारी जाणीव पेरली. तो ही विषय झाला आणि पुढे वर्षे लोटली काळ सरला आणि मी प्राध्यापक झालो. दलित साहित्य शिकविताना बलुतं पुन्हा समोर आलं. काय सांगावे ? कसे सांगावे या पोरांना बलुतं काय आहे ? दया पवार काय आहेत ?

बलुतं या चार टप्प्यावर मला नव्याने भेटले. आमचा प्रवास सोबतच चालू होता. काय आहे बलुतंमध्ये वाड्मयीन भाषिक समाजशास्त्रीय अंगाने ? त्याचे हे वेगळेपण चारही टप्प्यावर मला प्रत्येक वेळी नव्याने कळत गेले. भारतीय समाजव्यवस्थेने दगडूच्या पदरात बांधलेले हे बलुतं आहे, हे बलुतं त्याच्या एकट्याचे नाही ते त्याच्या दुःखी, दरिद्री, अपमानित, शोषित, वंचित समाजाचेही आहे. कावाखाण्यासारख्या मुंबईतील गलिच्छ वस्तीत दगडूला वाढावे लागले इथे एका बाजूला चोरबाजार दुसरीकडे गोलपिठा वेश्यांची वस्ती. या दोन्हींच्या मध्ये महारांची घरे. पत्रा शेडची छोटी छोटी खुराडी या खुराड्यात रात्र झाली कि झोपण्यापुरत्या जुनेरांच्या भिंती उभारल्या जात आणि त्यातच शृंगार फुले. गिरण्या कारखाने गोदी इथे ढोरासारखी राबणारी माणसे आणि दिवसभर कागदकाचपत्रा वेचीत उकिरडे चाळीत, वेश्यालयातील वेश्यांची लुगडी धुत, त्यांना भाकर बरबाट पुरविणाऱ्या फिरणाऱ्या स्त्रिया. अशा अनेक स्त्रियांपैकीच एक दमून भागून जाणारी दगडूची आई. तिच्या सहवासातच दगडूच्या आयुष्यातील बहुसंख्य घटना घडतात. आणि या बऱ्याचशा घटनांमुळे दुभंगलेल्या व्यक्तिमत्वाचा दगडू आपल्याला भेटतो.  गावातून शहरात येतानाच थोडे शिक्षणाचे संस्कार झालेला, आणि म्हणून वस्तीतील पशुपातळीवरील जगणे जगणाऱ्या स्वकीयांचा त्रास करून घेणारा तसेच ज्यांचे जगणे आवडते ते जातीमुळे तिरस्कार करतात हे कडवे वास्तव जाणून त्याची खंत बाळगणारा असा दुहेरी त्रास सोसणारा, दिवसेंदिवस पुस्तकी जगामुळे वस्तीपासून जाणीवेच्या पातळीवर दूर जाऊ लागलेला, आतल्या आत उसवत चाललेला, फाटत चाललेला दगडू .

आणि या दगडूची कहाणी सांगणारे मध्यमवर्गात स्थिर झालेले जातीच्या पल्याड गेलेले दया पवार. पूर्वाश्रमीचा दगडू पवार हा लेखक झालेल्या, मध्यमवर्गात स्थिरावलेल्या दया पवारला आपली जीवनकहाणी सांगतो असं स्वरूप . बलुतंमध्ये समाजव्यवस्थेने नाकारलेली काळाच्या पडद्याआड त्यांचे नायकत्व कायम हरवून बसलेली कैक माणसांची ओळख दगडू पवार दया पवारला करून देतो आणि ती माणसे त्यांच्या बरोबर झालेल्या अन्यायाच्या शोषणाच्या गाथा गात आपल्या समोर आपल्याला अस्वस्थ करीत उभी राहतात. ती उभी करताना दया पवारांची लेखणी आपोआप काव्यात्मक, हळवी, शैलीदार आणि वाचनीय होत जाते.  बलदंड शरीराचे परंतु नंतर व्यसनाने वाया गेलेले दादा, गबा गबा खा लेका म्हणणारी आजी, मायेचा ओलावा देणारी विठाबाई, राजकारणाला बळी पडलेला सदाशिव, सट्टा बेटिंग खेळणारा चंदू, नकला करणारा अंबू, बकुळा, रोकडे, मंजुळा, म्हादबा, सलमा आणि बानू, रांडपण सांभाळीत निर्धाराने जगणारी काकू, सुंदर हंसा, गऊ वडारीन, यल्लमाला वाहिलेली व नंतर वेश्या झालेली प्रेमळ जमना मावशी आणि चळवळीमधली कितीतरी भोंदू माणसे हे सगळे यापूर्वी मराठी साहित्यात न आलेले दलितांचे वंचितांचे एक अपरिचित जग आपल्या समोर ते उभे करतात. भरपूर कलाकार असलेला एक वास्तवदर्शी सिनेमा पाहत असल्याचा फील देणारी दया पवारांची शैली.

बाबसाहेब आंबेडकर यांच्यानंतर विकलांग झालेल्या चळवळीचे चित्र बलुतं मध्ये दिसून येते, सत्तेकडे जाण्यासाठी मुठभर पुढार्यांनी दलितांचा आणि दलितांच्या चळवळीचा केलेला शिडीसारखा वापर आणि दलित चळवळीचं स्लो पॉयझनिंग होऊन तिचं हळू हळू दुर्बल होणं यावर दया पवारांनी केलेलं भाष्य, बलुतं आज चाळीस वर्षानंतर वाचताना यातले काही प्रसंग वाचून आजच्या काळातल्या राजकीय सामाजिक गोष्टींना ते भाष्य तसेच्या तसे लागू होते  आणि या काळाशी ते तंतोतंत फिट बसते याची दुखद जाणीव होते.

राजकारणाला बळी झालेला सदाशिव एक गोष्ट सांगत असतो उपल्याची, “अरे वानरांच्या टोळीत एक उपल्या  असतो . तो जन्माला आलेला नर खातो आणि माद्या जिवंत ठेवतो. आपल्याला कुणी प्रतिस्पर्धी होऊ नये म्हणून तो ही काळजी घेतो. असंच असतं राजकारण. “सदाशिव खेड्यातून मुंबईत आलेला एक कुशाग्र बुद्धीचा चळवळ्या तरुण. सुरुवातीला हौशीनाटक मंडळ काढून नाटकं बसविनं, तालुक्याच्या राजकारणात भाग घेऊन कुणाला तगाई काढायला मदत कर तर कचेरीवर मोर्चा काढ, नवरा बायकोची भांडणे मिटव असे अव्याहत कार्य चालू पुढे तो मुंबईत येऊन बेस्ट मध्ये नोकरीला लागतो स्वभाव धडपड्या. बीएसटीच्या संपात नोकरी जाते. पुन्हा गावी परत जातो. चळवळ समाजकारण याला वाहून घेतल्याने स्वस्थता नाही गावात त्याला आमदार आमदार हे नाव मिळते.  सदाशिव रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता. काही काळानंतर झेडपीच्या निवडणूक वेळी कॉंग्रेस रिपब्लिकन युती घडते. कॉंग्रेस मंडळी सदाशिवची मागणी करतात आणि स्थानिक रिपब्लिकन नेतृत्वाला मान्य होत नाही. सदाशिवला धक्का बसतो आणि तो तमाशात म्यानेजर म्हणून काम करू लागतो म्यानेजर म्हणजे पडेल तो काम करणारा. दादू मारुती इंदुरीकरांच्या तमाशात काम करत असताना ‘गाढवाच्या लग्नाचे’ खास निमंत्रण दया पवारांना देतो, ते गेल्यावर तिथे त्यांना घाईघाईत भेटून त्यांची पहिल्या रांगेत सोय करतो आणि निघून जातो. वग रंगत आलेला असतो स्टेजवर काही गाढवं आणली जातात, माणसं ओणवी होऊन गाढवाचे पार्ट करीत असतात, त्यात एका गाढवाचे काम सदाशिव करीत असतो. साऱ्या नाटकभर ओणवा उभा संवाद नाही. हे पाहून लेखक हादरून जातो. तलवारीच्या पात्यासारखी चालणारी ज्याची जीभ त्याची वाचाच बंद ! 

हे कार्यकर्त्यांचे वापरून फेकून देणे आजही सगळीकडे आहे. आंबेडकरी चळवळही त्याला अपवाद नाही.

दादासाहेब गायकवाड संचालक असेलेल एक दलित विद्यार्थ्यांचे वस्तीगृह पुन्हा त्यांच्या संस्थेनी पंधरा वीस वसतिगृहे काढली. त्यांची नावं क्रांतिप्रवण, सिद्धार्थ, शंभूक वसतिगृह, रमायशोधरा वगैरे. संस्थेची चालक मंडळी भाऊराव पाटलांचा आदर्श उरी जपून संस्था जगविण्यासाठी जीवाचे रान करीत, ग्रांट नसण्याच्या काळात आपापल्या बायकांच्या अंगावरचे दागिने गहान ठेऊन मुलांच्या चंदीची व्यवस्था करत. बलुतंमधला हा प्रसंग वाचून आठवले आंबेडकर गायकवाड गांगुर्डे यांच्यातली पिपल एज्युकेशन सोसायटीवरून चाललेली कोंबड झुंबड न आठवेल तरच नवल. आठवले आज सत्तेत आहेत आधीही ते मंत्री होते, बाळासाहेब आंबेडकरांना आडनावाचा इतका भक्कम आधार आहे परंतु या नेत्यांनी सत्ता असताना नव्या संस्था निर्माण केलेल्या नाहीत. आरक्षण आणि एट्रोसिटी या दोनच मुद्द्यावर कार्यकर्ते किती काळ झुलवायचे हा प्रश्न बलुतं वाचताना पडतो.

हमीद दलवाई किडनी विकाराने ग्रस्त असतात तेंव्हा दया पवार एका मंत्र्यासोबत भेटायला जातात, तेंव्हा दलवाई म्हणतात “आपण मानतो बुवा याला हा सर्वत्र असतो, पण कुठच नसतो. ह्याला आपण गुरु मानलं.” या कॉम्प्लिमेंटमुळे लेखकाला मनातून वाईट वाटते, ठोस भूमिकेसाठी आवश्यक पर्यावरण नसल्याने न्युनगंड आणि सोशिकता अपमान अवहेलना झेलत वाढलेल्या माणसाच्या मानसिकतेमागे इथली समाजव्यवस्था जात वास्तव हे घटक फार ताकदीने काम करत असतात. तळातल्या माणसाला केंद्रबिंदू मानून भोवतालच्या सामजिक शोषणाची प्रखर जाणीव बाळगत समविचारी समप्रश्नावर उभ्या राहणाऱ्या आणि तळाच्या माणसाच्या सोबत राहणाऱ्या लोकांबरोबर असणे गैर नाही. हा दया पवारांचा दृष्टीकोन आजच्या काळाला लागू आहे. 

मध्यंतरी सोशल मिडीयावर कन्हैय्या कुमारची एबीपी माझा वरील मुलाखत गाजली आणि सोशल मिडीयावरचे आंबेडकरी तरुण संतापले, त्याचे मुद्दे कितीही बरोबर असू द्यात पण तो भूमिहार ब्राह्मण आहे हे विसरता कामा नये असा सूर दिसू लागला. जातीय कडव्या अभिमानातूनच व्यक्तीचे मोजमाप करणे म्हणून आठवले आंबेडकर यांच्या पंगतीत इथे कांशीराम मायावती बळ धरू शकले नाहीत. बलुतं लिहिल्यानंतर खूप वादळ उठल. त्यावरच्या पत्रांचे बलुतं एक वादळ म्हणून पुस्तकही प्रसिद्ध आहे. बलुतं.फुले आंबेडकरांच्या तात्विक आधीष्ठानाची प्रेरणा घेऊन, मानव्याची प्रतिष्ठापना करू पाहणारे महत्वाचे पुस्तक आहे. एकाचवेळी आत्मदर्शन व समाजदर्शन, आत्मबोध व समाजबोध, एकाचवेळी आत्मसंघर्ष व समाजसंघर्ष अशा सृजनशील द्वंद्वातून आकारास आलेली महत्वाची कलाकृती. वेगवेगळ्या टप्प्यावर नव्याने कळत जाणारी आणि कालच्या इतकी आजदेखील तितकीच विचारप्रवण अस्वस्थ करणारी.

चाळीस वर्षानंतर आज मागे वळून पाहताना इतर दलित आत्मकथने लक्षात घेता बलुतंने नंतर येणाऱ्या सर्व आत्मकथनांना एक वाट मोकळी करून दिली त्यांना स्वतःचा असा व्यक्त होण्यातला आत्मविश्वास दिला हे लक्षात येते. साहित्यनिर्मितीच्या दृष्टीने मला जे सांगायचे ते मी माझ्या भाषेत सांगणार, माझ्या पद्धतीने सांगणार असा आत्मविश्वास बलुतंने नंतर येणाऱ्या दलित लेखकांमध्ये रुजवला.

प्रा. सतीश वाघमारे (sbwaghmare03@gmail.com)

1 Comment
  1. अप्रतिम शब्दांकन. आपले कौतुक व आभार.

Leave A Reply

Your email address will not be published.