मराठी संगीत रंगभूमीला समृद्ध करणाऱ्या बालगंधर्वांना अखेरचा निरोप द्यायला अवघे ५ ते ६ जण होते

नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व या नावाने अधिक लोकप्रिय असलेले विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील अभिनेते, गायक आणि नाट्यनिर्माते. रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करीत नसतानाच्या काळात आपल्या हुबेहुब रंगवलेल्या स्त्री-भूमिकांमुळे बालगंधर्वांनी मोठी लोकप्रियता मिळवली.

नाट्यगीतांसह ख्याल, ठुमरी, गझल, दादरा, भक्तिगीते यांसारख्या गायन प्रकारांवरही त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. मराठी संगीत रंगभूमीला लोकप्रिय आणि समृद्ध करण्यात बाल गंधर्वांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

एवढ्या मोठ्या कलाकाराला शेवटच्या काळात मोठे हाल झाले. त्यांच्या अंत्ययात्रेला फक्त ५ ते ७ लोकं होती. लेखक वसंत शा. वैद्य यांनी जुलै १९८५ मध्ये विचित्र विश्वच्या अंकात बालगंधर्व यांच्या अंत्ययात्रे विषयी लिहल आहे.

वसंत वैद्य लिहतात

१४ ते १५ वर्षांपूर्वी स्वत: पाहिलेली विलक्षण घटना! त्या दिवशी नेमका मी पुण्यात होतो. दुपारची जेवणवेळ. मी नारायण गेटाजवळच्या माझ्या घरून पान खाण्यासाठी बाहेर आलो होतो. गेटजवळच्या पानाच्या दुकानाकडे वळणार इतक्यात माझ्या अगदी समोर चार-सहा फुटांच्या अंतरावर एक प्रेतयात्रा येताना दिसली. मी त्वरेने मागे धावलो. 

रस्त्याच्या कडेला उभे राहून बघू लागलो, तो त्या प्रेतयात्रेत मोजकीच माणसे सामील झालेली! चौघांनी प्रेताची ताटी खांद्यावर घेतलेली, एकजण पुढे विस्तव धरलेला आणि बाकीची शेलकीच माणसे भरधाव वेगात जात असलेली. ती जवळजवळ सर्वच माणसे परिचित चेहर्‍यांची. 

पुण्याच्या नाट्यक्षेत्रात प्रत्यही दिसत असलेली. नाट्यक्षेत्रातील सभा-संमेलनात माझे नेहमी जाणे-येणे असायचे. त्यावेळी तेथे दिसणारी प्रमुख माणसे त्या प्रेतयात्रेत दिसली. मी तशा स्थितीतही शेवटून जाणाऱ्या एका परिचितांना हळूच विचारून घेतले.

‘कोण?’

न थांबता त्यांनी कुजबुजत्या स्वरात सांगितले.. ‘अहो… गंधर्व… बालगंधर्व…’

बालगंधर्वाची प्रेतयात्रा अणि ती अवघ्या इतक्या थोड्या माणसांच्या उपस्थितीत!

बालगंधर्व…सौभद्र…स्वयंवर…मृच्छकटिक…एकच प्याला…जोहार मायबाप जोहार…अन्नदाते मायबाप हो..

हे सारे क्षणात डोळ्यांपुढे उभे राहिले. पान खाण्याची इच्छा पार मावळून गेली.

ओंकारेश्वराच्या समोरील नदीच्या किनाऱ्यावरल्या बंदिस्त आवारात प्रेत खाली ठेवण्यात आले. कुणीतरी त्वरेने पुढे झाले. लाकडे रचण्यात आली. प्रेत नदीच्या पाण्यात भिजवून आणले. प्रेताचा गोरापान चेहरा तशा अचेतन अवस्थेतही देखणा दिसत होत. प्रेत ठेवल्यावर सरणाच्या फटी सगळीकडून बंद करण्यात आल्या. मडके धरून आणणार्‍याने अग्नीचे चार निखारे सरणावर टाकले.

दुसर्‍या बाजूने रॉकेल ओतण्यात आले. कुणीतरी काडी ओढून ती सरणावर टाकली. आग भडकली. पाहता पाहता आगीच्या ज्वाळा गगनाला भिडल्या. आतून तडतड असे आवाज येऊ लागले. पाहता पाहता जळून गेलेली धगधगती लाकडे चोहीकडून राखेच्या स्वरूपात खाली गळून पडू लागली. एक भलामोठा आवाज झाला. त्यावर कुणीतरी उदासपणे म्हणाले, ‘संपलं! चला आता.’

घरी आलो. चार वाजून गेले होते…बालगंधर्वांची प्रेतयात्रा अशा घाईगडबडीने व पुण्यासारख्या त्यांच्या कर्मभूमीत गाजावाजा न करता गुपचूपपणे का उरकून घेण्यात आली?

त्याचे कारण दुसरेतिसरे काही नसून स्वत: बालगंधर्व नारायणराव राजहंस यांचा लहरीपणा आणि त्यातून उद्भवलेले त्यांचे दुर्दैव हेच आहे!

गोहरबाईसारख्या एका रूपवती नटीशी त्यांनी आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात विवाह केला व तिच्या पायावर तन-मन-धन सर्वस्व वाहून टाकले. तिच्यासाठी नारायणरावांनी मुसलमान धर्म स्वीकारला. मुंबईला माहीम भागातील तिच्या वसतिस्थानात नारायणराव राजीखुषीने राहायला गेले. गोहरबाईने महाराष्ट्राच्या या लाडक्या गंधर्वाला जवळ केले त्यावेळी वास्तविक पाहता या गंधर्वाची सारी पिसे गळून गेलेली होती. त्याची गंधर्व नाटक मंडळी कधीच भूतकाळात जमा झाली होती. 

सारी नटमंडळी त्याला सोडून आपापल्या वाटेने उडून गेली होती. उरला होता तो एक म्हातारा-पिसे गळालेला राजहंस!

कुणीही केली नसती अशी सेवा या गोहरबाई नावाच्या वेश्येने केली. त्याचे लुळेपण तिने भक्तिभावाने जोपासले. कसल्याही सुखाची अपेक्षा न करता! कारण एकच… त्याच्या गळ्यावरील तिचे भक्तियुक्त प्रेम. जे प्रेम राधेने कृष्णावर केले… अहिल्येने रामावर केले… ते प्रेम गोहरने या सुरेल राजहंसावर केले. त्याला त्याच्या अखेरच्या लुळ्यापांगळ्या अवस्थेत सांभाळले. मायेची पाखर दिली आणि स्वत: ही मुसलमान साध्वी अगोदर

अहेवपणाचे लेणे कपाळावर मिरवत दिक्कालापलीकडे निघून गेली. उरला तो आणखीनच विदीर्ण झालेला राजहंस. त्यावेळी त्याच्या रसिकजनांनी व भगतगणांनी त्याच्याकडे पाठ फिरवली होती. त्याने गोहरबाईसारख्या एका मुसलमान बाईचा घरोबा स्वीकारला. त्यासंबंधी टीकेची हत्यारे त्याच्यावर परजीत पुण्याचे सर्व नाटकी सज्जन त्याला विसरून जाण्याच्या तयारीत होते.

असा हा एकेकाळचा नटसम्राट बालगंधर्व…मुसलमान झालेला.

 आपल्या पूर्वीच्या साऱ्या प्रेमिकांना अव्हेरून त्याने आपण होऊन माहीमचा रस्ता धरलेला होता. अर्थांतर तर झालेच होते, धर्मांतरही झाले! त्यानंतर पहिले काही दिवस, अंगात त्राण होते तोपर्यंत गावोगावच्या जुन्या भगतगणांना बोलावून त्यांच्याकडून सत्कार करवून घ्यायचे, थैल्या घ्यायच्या. एका हाताने घ्यायच्या व दुसऱ्या हाताने देणेकऱ्याच्या स्वाधीन करायच्या असलेही उद्योग या राजहंसाने केले.

एक प्रसंग मी प्रत्यक्ष पाहिलेला आहे. सोलापूरचा. याच सोलापूरने पूर्वी बालगंधर्वांना भरभरून लोकप्रियता दिली.

पैशांच्या राशी त्यांच्या पावलावर ओतल्या. मेकॉनकी थिएटर म्हणजे बालगंधर्वांचे जणू माहेर! तिथं नाटक करताना जणू इंद्रपुरीत नाटक करतो असे वाटते असं बालगंधर्व नेहमीच म्हणायचे. पण आयुष्याच्या शेवटच्या प्रहरी जुन्या गिरणीच्या पाठीमागे बांधलेल्या तमाशाच्या थिएटरात या राजहंसाला कबुतराच्या खुराड्यात राहिल्याप्रमाणे रहावे लागले.

नाटके लावता येत नव्हती. पण सोलापूरचे वेडे भक्त रुंजी घालायला तयारच होते. एका भोळ्याभाबड्या बाईने पुढाकार घेऊन गंधर्वाला थैली देण्याचा घाट घातला. तिच्या एकटीच्या पायपिटीने हजार अकराशेची रास जमा झाली. त्याच तमाशाच्या थिएटरात थैली अर्पण करण्याचा समारंभ झाला. राजहंसाला दोन माणसांनी उचलून रंगमंचावरील खुर्चीत आणून बसवले.

भाषणे झाली. उजवीकडच्या विंगेत एक परिचित चेहऱ्याचा व्यापारी आशाळभूत मुद्रेने चुळबूळ करीत उभा दिसला. थैली अर्पण करण्यात आली… तो चुळबुळ्या व्यापारी चक्क रंगमंचावर येऊन थैली घेऊन गेला…!

गंधर्वाचे भाषण सुरू झाले. ‘अन्नदाते! मायबाप हो! तुम्हीच मला मोठे केलेत. तुम्हीच मला जगवा… तुमच्या उष्ट्याचा मी महार.’

असे अनेक थैली समारंभ सोलापूरपासून जळगाव भुसावळपर्यंत. चौकोनी कोडी असतात त्याप्रमाणे उभी आडवी तिरपी कशीही बेरीज केली तरी उत्तर येईल शून्य! गंधर्वांना मिळालेल्या अनेक थैल्यांची बेरीज होती शून्य! जमेला होते ते एक गोहरबाईचे नितांत प्रेम. तिने आपल्या ‘गळ्याचा’ व्यवसाय सोडून पतीची वार्धक्यातली सेवा करण्याचा पतिव्रताधर्म स्वीकारला.

परंतु बिचारीचे नशीब खोटे! ती तरी त्याला काय करणार? बालगंधर्वाभोवती त्यांच्या चलतीच्या काळात रुंजी घालणारे कपोतपक्षी त्याच्याजवळून उडून गेले व साऱ्या महाराष्ट्रात गोहरबाईने गंधर्वाचा सत्यानाश केला अशी हाकाटी करीत राहिले.

वास्तविक पाहता, सत्यानाश तिने करून घेतला होता तो स्वत:च्या कलाजीवनाचा मृच्छकटिकातल्या वसंतसेनेची तिने केलेली एक भूमिका मी पाहिली होती. ‘माडीवरी चल ग सये’ हे गाणे ती अशा ढंगात म्हणायची की त्याचे वर्णन करणे मुष्किल आहे.

ज्या काळात मराठी रंगभूमीवर अद्यापही पुरुष नट स्त्रीभूमिका करायचे व त्यांचे ‘कसेही’ दिसणे प्रेक्षक गोड करून घ्यायचे त्या काळात मराठी रंगभूमीवर गोहर नावाच्या गोड गळ्याच्या व भावपूर्ण डोळ्यांच्या एका जातिवंत नटीने गाननृत्यही करून एक आगळा साक्षात्कार घडविला होता तो काळ दृष्टीसमोर आणा म्हणजे माझ्या म्हणण्याची सत्यता पटेल. त्या काळात ज्योत्स्ना भोळे अद्याप चमकायच्या होत्या. हिराबाई बडोदेकर एखाद्या नाटकात काम करायच्या. परंतु हिराबाई म्हणजे केवळ श्रुतिमाधुर्य. त्यांचे गाणे ऐकावे ते डोळे मिटून!

हिराबाईंच्या गानमाधुर्याबद्दल आणि त्यांच्या सालस स्वभावाबद्दल संपूर्णपणे आदर बाळगून मला असे बिनदिक्कत म्हणावेसे वाटते की हिराबाई या गायिका आहेत, नटी नाहीत. मराठी रंगभूमीवरील पहिली अभिनयकुशल आणि नृत्यगानकुशल अशी स्त्री म्हणजे गोहरच होय!

जातिधर्माच्या अभिमानापलीकडे न जाणाऱ्या आपल्या मध्यमवर्गीय नाट्य समीक्षकांनी आजपर्यंत गोहरला न्याय दिलाच नाही असे खेदाने म्हणावे लागते. नारायणराव राजहंसानी तिच्यातले नाट्यगुण जाणले होते आणि त्यामुळेच ते तिच्याशी एकरूप झाले.

दोन जातिवंत कलावंतांचे हे त्यांच्या जीवनाच्या उत्तर काळातले मीलन गंधर्वांच्या हिंदू चाहत्यांना रुचणारे नव्हते. पृथ्वीच्या पोटातून निघणारे सुवर्ण किंवा लोह हे केवळ आपल्याच उपभोगासाठी आहे असे मानून त्याचे कोडकौतुक करणार्‍या मानवजातीप्रमाणेच गंधर्व हे फक्त आमचेच आहेत, आमच्यासाठी आहेत असा भ्रामक समज त्यांच्या अवतीभवती वावरणाऱ्या हिंदू रसिकांनी करून घेतला होता. पृथ्वीच्या गर्भात लोहभस्म आणि सुवर्णभस्म जे दडलेले असते त्यामुळे जमिनीचा कस वाढत असतो व पृथ्वीच्या अंतर्भागात होणारे प्रचंड उत्पात त्यामुळे टळत असतात.

सोने किंवा लोखंड हे माणसांसाठी निर्माण करून दिलेले पदार्थ नाहीत. माणसाने आपली बुद्धी वापरून ते स्वत:च्या वैभवासाठी व उन्नतीसाठी वापरले ही गोष्ट वेगळी! त्याचप्रमाणे नारायणराव बालगंधर्व यांचे दैवी गायन हे काही फक्त चार हिंदू रसिकांपुरतेच नव्हते. त्यांच्या आवाजात जी आर्तता होती ती साऱ्या मानवजातीकरता होती. परधर्मातील गोहर उगीच नाही त्या आर्ततेवर भुलून स्वत:चे सर्वस्व राजहंसाच्या पायावर वाहायला तयार झाली!

तिचे व बालगंधर्वांचे मीलन हिंदू रसिकांना न रुचल्याने त्यांच्यावर जी हीन पातळीवरील टीका व निंदानालस्ती झाली त्यामुळे ती गोहर नावाची ‘अस्मानी परी’ मनोमन कष्टी असे. ती कुरूप होती, हिडीस होती, चेटकीण होती असे नाना प्रकारचे आरोप तिच्यावर गंधर्वांचे संगतीत काही काळ राहिल्याचे भूषण मिरविणारे अद्याप करीत असतात.

गंधर्वांच्या नाट्यकंपनीत पोट फुटेपर्यंत खाल्लेली पंचपक्वान्ने अद्यापही या तथाकथित गंधर्वभक्ताच्या अंगावर उठून बाहेर येत आहेत. गंधर्व कंपनीत म्हणे, ‘काळी साळ’ नावाचा सुवासिक तांदूळ आणि शुभ्र लोणकढे तूप खायला मिळायचे! ती काळी साळी आणि तुपाची लोणकढी आता चेहऱ्यावर येऊन बसली आहे व रात्री-अपरात्री अश्‍वत्थाम्यासारखी भ्रमंती करायला लावीत आहे.

गोहरला चेटकीण म्हणणारे हे महाभाग कदाचित गोहरच्या तारुण्यात तिचा उपभोग घ्यायलाही गेले असतील व नकार घेऊन परत आले असतील, कुणी सांगावे? कारण बालगंधर्वांची नि तिची प्रेमभेट होण्यापूर्वी ती जर विजापूरची कलावंतीणच होती!

ते काहीही असो. मला मात्र राहून राहून एका गोष्टीची रुखरुख वाटते ती म्हणजे गोहरच्या आणि गंधर्वांच्या शरीरसंबंधातून एखादा अंकुर निर्माण झाला असता तर तो गायनाची पताका दिगंत घेऊन जाणारा झाला असता! दोन अस्सल कलावंतांच्या मीलनातून परमेश्वराने का नाही तिसरा जीव निर्माण केला?

या रुखरुखीबरोबर पुण्याच्या जहांगीर नर्सिंग होममध्ये अखेरचे क्षण मोजीत पडलेला गंधर्वांचा म्लान चेहरा माझ्या डोळ्यांसमोर येत आहे. गंधर्व अत्यवस्थ… अशी सिंगल बातमी ‘सकाळ’च्या कोपऱ्यात आली होती ती वाचून मी आणि माझा एक मित्र वसंत जोशी दुपारचे जहांगीर नर्सिंग होममध्ये गेलो होतो.

एका खोलीत स्वच्छ पांढऱ्या चादरीवर अर्ध्या चड्डीतला गंधर्वांचा गोरापान कमनीय देह पडला होता. जवळपास कुणीही नव्हते. फक्त एक बगळ्याच्या रंगाच्या पोषाखातली परिचारिका डोळ्यांतली कबुतरे उडवीत उभी होती. त्या क्षणी माझ्या मनात आलेली कल्पना अद्याप मी विसरू शकत नाही. परी गेली नि परिचारिका उरली. ही ती कल्पना! आणि प्रारंभी वर्णन केलेली ती सहा माणसांची भेसूर स्मशानयात्रा आठवली की आजही अंगावर शहारे येतात.

आयुष्यभर ज्याने कला, नाट्य वैभव, मित्रपरिवार याशिवाय दुसरे काही नाही केले त्याच्या अंत्ययात्रेला एखादाही श्रीमंत उल्लू रसिक नव्हता! गंधर्वांशी आज मैत्री सांगणारा एखादाही मित्र नव्हता.

होते ते एका हौशी नाट्यसंस्थेचे पदाधिकारी आणि माझ्यासारखा एक कलंदर!

कलाकाराची अंत्ययात्रा अशीच असायची असा विधिलिखित संकेतच असतो की काय कुणास ठाऊक! मानवजातीला तृप्त करणाऱ्याला मात्र अखेरीस ‘प्यासा’ रहावे लागते. एक शापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा यांचे हाल आणि दैना आम्ही पाहिली. 

गंधर्वांचे भाग्य थोर! त्याच्यावर पुस्तके लिहिली जात आहेत. पण अप्सरेचा मानवी अवतार तिच्या अखेरच्या श्‍वासाबरोबरच संपला…

वसंत शा. वैद्य यांनी हा लेख विचित्र विश्वच्या जुलै १९८५ च्या अंकात लिहला आहे  

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.