या वर्तमानपत्राचे संपादक, उपसंपादक, वार्ताहर हे फुटपाथवर राहणारी मुलं आहेत.

तुम्ही म्हणाल असं कुठं असतंय का? असं कुणाला भी एखाद्या वृत्तपत्राचं संपादक, रिपोर्टर होता येत का? त्यासाठी लई वाचावं, लिहावं, अन् अभ्यास करावा लागतोय. मोठ्या मोठ्या लोकांशी ओळखी लागत्यात तेव्हा कुठं तुम्हाला एखाद्या पेपरचं संपादक करतात.बरं तुम्ही म्हणाल ओळखीनं संपादक केलं इथंपर्यंत ठीक. पण ते फुटपाथवरच्या पोरा पोरी कसे होऊ शकतात. काय भी फेकता तुम्ही.

पण कार्यकर्त्यांनो हे अगदी खरंय. दिल्लीत “बालकनामा” नावाचा पेपर आहे. त्याचे संपादक आणि रिपोर्टर फुटपाथावरील आहेत. नेमका काय आहे हा पेपर? अन् कसा सुरू झाला हे आम्ही तुम्हाला सांगतो.

बालकनामाची सुरूवात.

फुटपाथावरील राहणाऱ्या पोरा- पोरींचे असख्य़ प्रश्न असतात. मात्र त्य़ांच्याकडं कोणी लक्ष देत नाही. माध्यमांनाही त्यातून जास्त टीआरपी भेटत नाही म्हणून ते काही हे दाखवत नाही. मग आता आपले प्रश्न कोणी दाखवत नाहीत, लोकांसमोर मांडत नाही म्हणल्यावर दिल्लीतील फुटपाथावरील काही पोरं पोरी एकत्र आले.

सालं होतं 2003. या पोरा- पोरींना एका संस्थेनं मदत केली. आपले प्रश्न कोणी मांडत नाही, माध्यम या गोष्टी दाखवत नाही म्हणल्यावर त्यांनी आपले प्रश्न मांडण्यासाठी पेपर काढण्याचा निर्णय घेतला. निर्णय धाडसी होता. पेपर काढणं जिकीरीचं होतं. मात्र त्यांनी हे आव्हान पेलेलं आणि यातून बालकनामा नावाच्या पेपरचा जन्म झाला.

बालकनामाचं काम. 

नेमकं या पेपरचं काम कसं चालतं हे थोडक्यात सांगतो. सुरूवातीला बालकनामा तीन महिन्याला प्रकाशीत व्हायचा मात्र सध्या प्रत्येकी दोन महिन्याला प्रकाशीत होतो. हा पेपर आठपानाचा असतो. जवळपास ५ हजाराच्या वर या पेपरच्या प्रती निघतात. या पेपरमध्य़े काम करणारे सगळ्या मुलाचं वय १४ ते १८ वर्षा दरम्यान असतं. संपादकपण या वयातलाच असतो. जर 18 वर्षाच्यावर वय झालं तर संपादक आणि रिपोर्टर होता येत नाही. मात्र तुम्ही मदत करू शकता.

बालकनामात काम करणारे प्रत्येकजण बातमी शोधतो. त्या बातमीची विश्वासार्हता तपासतो. ज्यांना लिहिता येत नाही अशी मुलं बातमी सांगतात आणि लिहिणारे ते लिहून घेतात. सध्या बालकनामाचे रिपोर्टर सगळ्या जिल्ह्यात पोहचलेले आहेत. ते त्या भागातील मुलांच्या समस्या जाणून घेतात. त्यावर चर्चा करतात आणि त्या पेपरमध्ये मांडतात.

बालकनामाची संपादक राहिलेली शानू सांगते,

“बालकनामाच्या माध्यमातून आम्ही फुटपाथवर राहणाऱ्या मुला-मु्लीचें प्रश्न लोकासमोर मांडतोत. जेव्हा मी ११ वर्षाची होते तेव्हा मला शिक्षण सोडून कारखान्यात काम करावं लागलं होतं. मात्र बालकनामाच्य़ा संपर्कात आल्यानंतर मला पाठबळ मिळालं. या मार्फत शिकले. तसंच माझ्यासारख्या अनेकांच्या जिवनात बदल झालाय”.

सध्या बालकनामासोबत देशातील जवळपास १० हजाराच्या वर मुलं मुली जोडले गेलेले आहेत. अजूनही यामध्ये मुलं जो़डली जात आहेत. या सगळ्याचं फलित म्हणून २०१५ साली या वृत्तपत्राचा इंग्रजी अनुवाद व्हायला लागला आणि विदेशातही पोहचला जावू लागला.

“ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले लो. भले छीन लो मुझसे मेरी जवानी, मगर मुझको लौटा दो बचपन का सावन. वो काग़ज़ की कश्ती, वो बारिश का पानी”

या सुदर्शन फाकिरींनी लिहिलेल्या ओळीतून लहानपण नक्की काय असतं ते समजू शकतं. लहानपण म्हणजे लहान मुलाचं आपलं वेगळं आयुष्य असतं. त्यांच्या नजरेत कोणतं चागलं कोणतं वाईट यांचा अंदाज आपण बांधू शकत नाहीत. त्यांनाही खुप काही बोलायचं असंत, सांगायचं असतं. पण ते आपल्या भाषेत पद्धतीनं सांगू इच्छितात आणि हे सगळं सांगण्यासाठीच बालकनामाचा जन्म झालेलाय.

हे ही वाच भि़डू.

Leave A Reply

Your email address will not be published.