संघाची हाफ चड्डी आणि गणवेषामागे या माणसाचं डोकं होतं..

राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना म्हणजेच आरएसएस. भारतात हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर उचलून धरलेली शिस्तबद्ध स्वयंसेवकांची संघटना. भाजप या त्यांच्याशी संलग्न विचारांच्या राजकीय पक्षाच्या प्रसारासाठी स्वयंसेवक तळागाळात जाऊन प्रामाणिकपणे काम करत असतात. भाजपचे बलस्थान काय तर आरएसएसचे सदैव दक्ष असणारे केडर अस सांगितल जाते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दुसऱ्या एका कारणासाठी ओळखला जातो तो म्हणजे त्यांच्या वैशिट्यपूर्ण गणवेश.

सध्या त्यांच्या गणवेशात पॅन्टचा समावेश झाला असला तरीही, गेली अनेक वर्षे संघाचा गणवेश पांढरा शर्ट आणि खाकी चड्डी असा होता. त्यांचे मोठमोठे नेतेही या गणवेश परिधान करायला लाजायचे नाहीत. यामुळेच त्यांचे कॉंग्रेसवाले विरोधक या संघटनेला चड्डीवाल्यांची संघटना असे म्हणतात.

तर या गणवेशाला देखील मोठा इतिहास आहे. अगदी संघाच्या स्थापनेच्या देखील आधी संघाचा गणवेश डॉ. लक्ष्मण परांजपे, डॉ. बाळकृष्ण मुंजे आणि डॉ. केशव हेडगेवार यांच्या चर्चेतून ठरला होता. विशेषतः ती संकल्पना होती डॉ. बाळकृष्ण मुंजे यांची. त्यावेळी हे सगळे नेते काँग्रेसमध्ये होते.

डॉ. मुंजे यांच्याबद्दल सांगायच झालं तर त्यांचा जन्म १९७२ मध्ये केंद्रीय प्रांतातील बिलासपुरचा. १८९८ ला त्यांनी मुंबईमधील ग्रँट मेडिकल कॉलेजमधून मेडिकलची पदवी घेतली. पुढे बॉम्बे नगर निगममध्ये तपासणी अधिकारी म्हणून रुजू झाले.

सैन्याबद्दल त्यांना प्रचंड ओढ होती. त्यातुनच सेनेमध्ये कमिशन अधिकारी बनले. सैन्यांच्या मेडिकल विंग मधून त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या बोअर युद्धात देखील सहभाग घेतला.

बाळकृष्ण मुंजे हे डॉ. हेडगेवार यांच्यापेक्षा वयाने १७ वर्षाने मोठे. त्यामुळे हेडगेवार त्यांना गुरु मानत. त्यांनीच हेडगेवार यांना १९१० मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर मेडिकलचे शिक्षण घेण्यासाठी कोलकत्याला पाठवले. शिक्षण पुर्ण करुन हेडगेवार देखील मुंजेसमवेत कॉंग्रेसमध्ये सक्रिय झाले.

तर गणवेशाचा किस्सा असा की, 

बरोबर शंभर वर्षापूर्वी म्हणजे १९२० साली नागपूर येथे भरलेल्या कॉंग्रेस अधिवेशनाच्या आयोजनाची जबाबदारी डॉ. नारायण सुब्बाराव हर्डीकर, डॉ. हेडगेवार या नेत्यांनी उचलली. या अधिवेशनाच्या सुयोग्य व्यवस्थापनासाठी डॉ. लक्ष्मण परांजपे यांनी शिस्तबद्ध कार्यकर्त्यांची एक टीम म्हणजेच स्वयंसेवक दल तयार केले. त्याचे नाव होते,

‘भारत स्वयंसेवक मंडळ’.

जुलैपर्यंत अधिवेशनासाठी १ हजार ते दिड हजार स्वयंसेवकांना तयार केलं जाव असं निश्चित करण्यात आलं. डॉ. हेडगेवार यांनी खूप मनापासून या कामात स्वतःला झोकून दिले.

त्याच वेळी हेडगेवार यांचे दुसरे मार्गदर्शक डॉ. बाळकृष्ण मुंजे यांची इच्छा होती की, काँग्रेसच्या या अधिवेशनात आपल्या मंडळाचे कार्यकर्ते लांबूनच ओळखले जावेत, त्यांचं वेगळेपण उठून दिसावं. त्यामुळेच डॉ. मुंजे यांच्या संकल्पनेतुन,

खाकी गांधी टोपी, खाकी शर्ट, खाकी चड्डी, लांब पायमोजे आणि बूट असा ड्रेस कोड तयार केला गेला.

सर्व स्वयंसेवकांना लष्करी पद्धतीचा हा गणवेश स्वखर्चाने करवून घेण्यास सांगण्यात आला. असा ड्रेस तयार करण्यामागचे कारण म्हणजे डॉ. मुंजे यांचे सैन्य प्रेम. मंडळाच्या स्वयंसेवकांकडून देखील शारिरीक कवायती करुन घेता याव्यात, त्यांना सैन्य प्रशिक्षण देता याव. असा उद्देश मुंजे यांचा त्या पाठीमागे होता.

अधिवेशन पार पडले. पुढे त्यांनी १९२१च्या असहकार आंदोलनमध्ये, १९२३ मध्ये झेंडा सत्याग्रहास सहभाग घेतला. त्यामुळे एक वर्ष जेलमध्ये देखील गेले. पण महात्मा गांधी यांच्या खिलाफत चळवळीला विरोध करत मुस्लिमांच लांगुलचालना करत असल्याचा आरोप केला आणि डॉ. परांजपे, डॉ. मुंजे, डॉ. हेडगेवार हे काँग्रेसपासून वेगळे झाले. 

डॉ. मुंजे हिंदू महासभेत आले. तिथे देखील ते मोठे नेते बनले.

१९३०-१९३१ च्या गोलमेज परिषदेत हिंदू महासभेच्या प्रतिनीधीच्या रुपात गेले होते. त्यांनी पुढे सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या सोसायटीच्या माध्यमातून वयाच्या चौसष्टाव्या वर्षी १९३७ मध्ये नाशिकजवळ एकशे पंचवीस एकर जागेवर भोसला सैनिकी शाळा (भोसला मिलिटरी स्कूल) सुरू केले. 

तर डॉ. परांजपे, डॉ. हेडगेवार यांनी १९२५ साली विजयादशमीच्या दिवशी ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ ही संघटना उभारली. हिंदूंचे ऐक्य व संघटन हे त्यांचे उद्देश होते. या संघटनेच्या निर्मितीत हेडगेवार यांचे प्रमुख सल्लागार मुंजे हेच होते आणि गणवेश देखील मुंजेंनी सुचवलेला तोच होता.

नागपूर मध्ये स्थापन झालेली आरएसएस पुढे हळूहळू देशभर पसरू लागली. पुढे पाच वर्षानंतर १९३० मध्ये गणवेशात पहिल्यांदा मोजका बदल करण्यात आला. खाकी टोपी जावून काळी टोपी आली.

१९३९ मध्ये संघाच्या सदस्यांना पुर्ण खाकी ड्रेसमध्ये बघितल्यानंतर त्यांना ब्रिटीश सैनिक आणि स्वयंसेवक यांच्यात गोंधळ तयार होवू लागला. त्यामुळे इंग्रज सैन्याकडून संघाच्या ड्रेसवर आणि शारीरिक कवायतींवर बंदी आणली. यानंतर संघाने खाकी शर्टाऐवजी सफेद शर्टाचा अवलंब केला.

यानंतर १९७३ मध्ये सैन्यासारखा जाड चमड्याचे बूट आणि लांब पायमोज्यांऐवजी सामान्य बुटांचा समावेश केला.

यानंतर २०१० मध्ये जैन मुनी तरुण सागर यांनी,

‘संघ जर अहिंसेचा संदेश देत असाल तर चमड्याचा बेल्ट वापरु नका’

असा सल्ला दिला आणि यानंतर संघाने चमड्याच्या बेल्टऐवजी कॅनवॉसच्या बेल्टचा वापर करायला सुरुवात केली गेली.

संघाच्या प्रवासात त्यांच्या गणवेशातुन हळू हळू खाकी रंग पुर्णपणे गायब झाला. चड्डी जाऊन डार्क चॉकलेटी रंगाची पँन्ट आली. बदलत्या वेळेनुसार हा बदल केला असल्याचे सांगितले. मात्र कितीही बदल झाले तरी याच्या स्थापनेवेळी हेडगेवार, मुंजे यांनी जे हिंदुत्वाचं स्वप्न आणि मार्ग दाखवला होता त्याच मार्गावर आजही संघ व त्याचे स्वयंसेवक मार्गक्रमण करत आहेत असा आरएसएसचा दावा आहे.

हे हि वाच भिडू. 

1 Comment
  1. vighnesh says

    africe che boar yudha kay hote??

Leave A Reply

Your email address will not be published.