ज्यामुळे स्मिथ, वॉर्नर रडलेले… तोच बॉल टॅम्परींगचा आरोप सर रविंद्र जडेजावर होतोय….

भारतीय ऑल राऊंडर रविंद्र जडेजा. रविंद्र जडेजा तरी कशाला सर रविंद्र जडेजा असंच म्हणावं लागेल. जडेजा सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळताना दिसतोय. जडेजाने जवळपास ५ महिन्यांनंतर कमबॅक केलंय. मधल्या काळात तो त्याच्या पत्नीच्या राजकीय प्रचारात पाहायला मिळाला होता.

गुडघेदुखीनंतर आता त्यानं कमबॅक केलंय ते सुद्धा भारी ताकदीनं केलंय. म्हणजे, पहिल्याच कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी गड्यानं एकट्यानं ५ विकेट घेतल्या आणि कांगारूंचा पार बाजार उठवलाय.

मिडल ऑर्डरच्या बत्त्या गूल करण्यात जडेजाचा मोठा वाटा होता. स्टीव्ह स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, मार्नस लाबुशेन आणि टॉड मर्फी यांची विकेट जडेजाने घेतली. या सगळ्यामुळे पहिल्या दिवसातला स्टार म्हणून जडेजाचं नाव आपोआपच पुढं आलं. तसं त्यांची कामगिरी बघता स्टार तोच असला पाहिजे हे लक्षात येतंच.

आता विषय असा झालाय की, त्याने ५ विकेट घेतल्या याची चर्चा तर झालीच. शिवाय, आणखी एका गोष्टीची चर्चा झाली ती म्हणजे जडेजानं बॉल टॅम्परींग केलंय का? याची.

चर्चेला सुरूवात झाली ते सोशल मीडियावर. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ फिरतोय. तो व्हिडीओ आता सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या दिवशीचाच आहे. या व्हिडीओमध्ये रविंद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज हे दोघं जण दिसतायत. जडेजा सिराजच्या हातातून काहीतरी घेताना दिसतोय आणि त्यानंतर त्याने बॉलला हाताने रगडलेलंही दिसतंय.

यामुळेच मग बॉ टॅम्परींगचे आरोप होतायत. आता हे बॉल टॅम्परींग हा शब्द क्रिकेटमध्ये इंटरेस्ट असणाऱ्यांनी बऱ्याचदा ऐकला असेल. पण बॉल टॅम्परींग म्हणजे नेमकं काय? कोणती कृती केली तर, ती बॉल टॅम्परींगमध्ये गणली जाते? बॉल टॅम्परींग सिद्ध झालं तर काय कारवाई केली जाते? हे फार लोकांना माहित नसतं…

पहिला मुद्दा म्हणजे बॉल टॅम्परींग नेमकं काय असतं?

सगळ्यात पहिलं म्हणजे टॅम्परींग या शब्दाचा अर्थ आहे, एखाद्या गोष्टीमध्ये, वस्तूमध्ये ती वस्तू खराब करण्याच्या उद्दिष्टाने किंवा परवानगी शिवाय बदल करणे. बॉल टॅम्परींगचा अर्थ आता तुमच्या बऱ्यापैकी लक्षात आलाच असेल.

एखाद्या खेळाडूने बॉलच्या कंडीशनमध्ये बदल करण्यासाठी म्हणून काही बदल केले… बॉलची फीजिकल स्टेट बदलण्याचा प्रयत्न केला तर त्याला बॉल टॅम्परींग असं म्हणतात. बॉल टेम्परींग करण्यामागचं प्रमुख कारण असतं ते म्हणजे आपल्याला हवा तसा बॉल तयार करणं. म्हणजे, मूळ कंडीशन्समध्ये बदल करून आपल्यासाठी फेव्हरेबल कंडीशन तयार करण्यासाठी बॉलसोबत छेडछाड करणं म्हणजे बॉल टॅम्परींग.

असं करण्यासाठी बॉलला लिप बाम किंवा साधारण त्याप्रकारचं एखादं जेल लाऊन बॉलला टॅम्पर केलं जाऊ शकतं. त्यामुळे होतं असं की बॉलची शाईन वाढते आणि बॉलची स्पीड वाढते, बॉल जास्त स्वींग होतो. अर्थातच याचा फायदा हा बॉलिंग टीमला होतो.

यात सांगण्यासारखा एक मुद्दा म्हणजे, मागच्या काळात तुम्ही बॉल क्लीन करण्यासाठी थुंकी किंवा घामाचा वापर करताना खेळाडूंना बघितलं असेल… पण आता तसं करताना कुणीच दिसत नाही कारण, कोरोना आल्यापासून या कृतीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो म्हणून ही पद्धत बंद करण्यात आली.

आयसीसीचे नियम काय सांगतात?

आयसीसीच्या नियमांनुसार बॉल स्वच्छ करण्यासाठी कोणत्याही पदार्थाचा वापर केला जाऊ नये. बॉल ओला झाला असल्यास तो कोरडा करण्यासाठी टॉवेलचा वापर करावा. बॉलवर माती किंवा चिखल लागला असेल तर, तो चिखल किंवा माती काढताना अंपायर किंवा एखाद्या ऑथोराईज्ड व्यक्तीच्या निरीक्षणाखाली तो काढावा किंवा काढण्याची विनंती ही अंपायरलाच करावी.

या प्रकारांशिवाय कोणत्याही प्रकारे बॉलची फीजिकल कंडीशन बदलण्याचा प्रयत्न केला तर ते बॉल टॅम्परींग मानलं जातं.

उदाहरण द्यायचं झालं तर ग्राऊंडवर बॉल रगडणे, नखाने बॉलवर ओरखडे मारणं, एखाद्या टोकेरी वस्तुने बॉलशी छेडछाड करणं, शूजच्या खाली असलेल्या स्पाईक्स म्हणजे टोकेरी भागाने बॉलशी छेडछाड करणं हे सगळं काही बॉल टॉम्परींग समजलं जातं.

बॉल टॅम्परींग सिद्ध झालं तर, शिक्षा काय असते?

वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळी शिक्षा दिली जाते. त्या शिक्षा काय असू शकतात ते बघुया.

  • मॅच सुरू असताना एखादा प्लेयर बॉल टॅम्परींग करत असल्याचं अंपायरच्या लक्षात आलं तर, विरोधी टीमला ५ रन्स एक्स्ट्रा दिले जातात.
  • विरोधी टीमच्या कॅप्टनने मागणी केली तर, तो बॉल ताबडतोब बदलला जातो. दुसरा बॉल कोणता असावा हे मात्र अंपायर ठरवतात. साधारण आधीच्या बॉलशी जास्तीत जास्त मिळत्या-जुळत्या कंडीशन्सचा बॉल निवडला जातो.
  • त्या प्लेयरच्या त्या मॅचच्या मानधनातून ठराविक रक्कम काढून घेतली जाऊ शकते.
  • पुन्हा पुन्हा एखादा बॉलर जर बॉल टॅम्परींग करताना निदर्शनात आला तर, त्या इनिंगमध्ये बॉल टाकण्यापासून त्या बॉलरवर बंदी घातली जाऊ शकते.
  • या प्रकरणातली चौकशी संपल्यानंतर बॉल टॅम्परींग करणाऱ्यावर आणखी निर्बंध आणले जाऊ शकतात. कारण, हा क्रिकेट विश्वातील एक गंभीर गुन्हा मानला जातो.
  • ज्या टीममधल्या प्लेयरने बॉल टॅम्परींग केलंय या टीमच्या कॅप्टनवरही कारवाई होऊ शकते.

बॉल टॅम्परींगमुळे अनेक बड्या प्लेयर्सवर कारवाई झालीये.

बॉल टॅम्परींग केल्यामुळे कारवाई झालेला पहिला खेळाडू म्हणून पाकिस्तानचा माजी खेळाडू वकार युनुसला ओळखलं जातं. त्यानंतर मग राहूल द्रविडला २००४ साली बॉल टॅम्परींगमुळे त्याच्या मानधनाची ५०% रक्कम ही द्यावी लागली होती. २०१० मध्ये शाहीद आफ्रिदीवर या अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्याला २ टी-२० सामने खेळण्यापासून बंदी घातली होती. अशी बरीच नावं या यादीत आहेत.

एक प्रकरण असं आहे की, जे कोणत्याही क्रिकेटप्रेमीला विसरणं शक्य नाहीये.

२०१८ मध्ये ऑस्ट्रेलिया विरूद्ध साऊथ आफ्रिका अशी टेस्ट मॅच सिरीज होती. या सिरीजच्या तिसऱ्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाजडू कॅमेरॉन बॅनक्राफ्ट हातात काहीतरी धरून बॉलवर रगडतानाचा व्हिडीओ समोर आला.

नंतर मग तो सँडपेपर असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर कॅमेरॉन बॅनक्राफ्ट सह कॅप्टन स्टीव्ह स्मिथ आणि वाईस कॅप्टन डेविड वॉर्नर वरही कारवाई करण्यात आली. स्मिथ आणि वॉर्नर वर तब्बल १ वर्षासाठी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅट्समध्ये खेळण्यापासून बंदी घालण्यात आली. त्यावेळी वार्नर आणि स्मिथ या दोघांच्या डोळ्यात आलेलं पाणी बघुन क्रिकेटवर प्रेम करणारा प्रत्येक जण हळवा झाला होता.

आता, असेच आरोप रविंद्र जडेजा वर होतायत. दरम्यान, यासंदर्भात बीसीसीआयने प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार सिराजने जडेजाला जे दिलं ते जडेजाच्या दुखणाऱ्या बोटाला आराम मिळावा म्हणून दिलेलं मलम होतं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.