राष्ट्रपतींच्या निवडणुकीत असणारी मतपेटी ‘भारताची नागरिक’ असते !
राष्ट्रपती पद हे देशाचं सर्वाच्च घटनात्मक पद. या पदासाठी नेमकं कोण मतदान करतं हा आपल्यासाठी राज्यशास्त्रातला सर्वात अवघड टप्पा होता. लोकसंख्येला आमदारांनी भागायच की खासदारांनी. त्यानंतर कशाने कशाला गुणायचं हे राज्यशास्त्रातलं एकमेवं गणित आजही आपलं अस्तित्व टिकवून आहे. महामहिम राष्ट्रपती पदासोबत किस्से पुष्कळ आहेत. जितके राष्ट्रपती पदाचे किस्से आहेत तितकेच किस्से राष्ट्रपती पदाच्या संबधीत असणाऱ्या गोष्टींचे आहेत.
त्यातील एक किस्सा राष्ट्रपती पदाच्या मतपत्रिकांचा.
राज्यातील विधानसभा व विधानपरिषद सदस्यांना राष्ट्रपती पदासाठी मतदान करण्याचा अधिकार आहे. राज्याच्या संबधीत ठिकाणी हि मतदानाची प्रक्रिया पार पडते व त्यानंतर या मतपत्रिका देशाच्या राजधानीकडे रवाना केल्या जातात. मतदानासाठी असणारे बॅलेट बॉक्स जेव्हा घेवून जाण्याची वेळ येते तेव्हाच या किस्साची चर्चा रंगते.
बॅलेट बॉक्स म्हणजे काय तर मतदानपत्रिका ज्यामध्ये असतात असा बॉक्स. देशाच्या सर्वोच्च पदासाठी झालेल्या निवडणुकांचा हा बॉक्स असल्यानं त्याची सुरक्षा देखील तितकीच जिकरीची गोष्ट असते. असे बॉक्स दिल्लीला घेवून जाण्याची जबाबदारी खास अधिकाऱ्यांना देण्यात आलेली असते.
असे अधिकारी जेव्हा विमानतळावर आपल्या बॅलेट बॉक्स सोबत येतात तेव्हा त्यांच्या हातात विमान कंपन्या दोन तिकीटे देतात. एक तिकीट असतं त्या अधिकाऱ्यांच आणि दूसरं तिकीट असत “मिस्टर बॅलेट बॉक्स म्हणून”. अर्थात ज्या प्रमाणे एखाद्या नागरिकाचं तिकीट काढलं जातं तसच तिकीट या बॅलेट बॉक्सचं काढलं जातं. थोडक्यात सांगायचं झालं तर या बॉक्सचा उल्लेख कुठेही सामान अथवा कार्गो म्हणून न करता एखाद्या व्यक्तीप्रमाणे मिस्टर बॅलेट बॉक्स असाच केला जातो.
आत्ता दूसरी गोष्ट म्हणजे, हे प्रकरण इतक्यावरच थांबत नाही तर बॅलेट बॉक्स घेवून जात असताना त्याला खास सिटबेल्ट बांधण्याची देखील काळजी घेतली जाते. शेजारचा अधिकारी मित्रांच्या खांद्यावर हात टाकावा त्याप्रमाणे अगदी सुखासुखी बॅलेट बॉक्सवर हात टाकून बसलेला असतो.
Members of Legislative Councils in the state can not participate in election of president.