म्हणूनच मोदीजी पाकीस्तानचे दोन तुकडे करतील हा आशावाद बोलून दाखवला जातो…

काल-परवा पाकिस्तानच्या संसदेत बलुचिस्तान आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जयघोष केल्याच्या बातम्या काही माध्यमांनी चालवल्या. तर काही माध्यमांनी या घोषणा खरचं दिल्या की नाही यावर चर्चा केली. पण खरं नक्की काय हे वादातीत.

पण आपण त्या वादात न पडता मागील कित्येक वर्षापासून बलुचिस्तान पाकिस्तानकडून स्वातंत्र्य होण्याची मागणी करत आहे. वेगवेगळ्या जागतिक व्यासपीठावर मिळेल त्या पद्धतीने आंदोलन करत आहे.

तर तो बलुचिस्तान नेमका काय विषय आहे ते समजून घेवू.

काय आहे बलुचिस्तानचा इतिहास..?

मकरान, खारान, लसाबेला आणि कलाट या चार रियासतांना मिळून बलुचिस्ताला ओळख मिळाली.

१९४७ मध्ये स्वातंत्र्यानंतर तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान क्लेमेंट एटली यांनी संस्थान आणि राज्यांना स्वतंत्र राहण्याची परवानगी दिली होती. बलुचिस्तानाच्या संविधानामध्ये संसदेच्या दोन सदनांची तरतूद होती. आपल्याला काय करायचे आहे याविषयीचा निर्णय कलातच्या खान पदावर असणाऱ्यांनी त्या दोन सदनांवर सोडला.

पाकिस्तानासोबत आपला देश विलीन करण्याची बाब दोन्ही सदनांनी नामंजूर केली.

म्हणूनच, कलाटचा राजा अहमद यार खान यांनी स्वातंत्र्य निवडलेले आणि पाकिस्तानमध्ये विलीन करण्यास नकार दिला. पाकिस्ताननेही ही गोष्ट कबूल केली होती.

यानुसार पाकिस्तानच्या स्वातंत्र्याच्या तीन महिने अगोदर महंमद अली जिन्ना यांच्या मध्यस्थीने ब्रिटिश राणीचा दूत या नात्याने ब्रिटिश व्हॉइसरॉय, जिन्ना व खान ऑफ कलात यांच्यात ११ ऑगस्ट १९४७ या दिवशी एक करार केला गेला.

त्यातली महत्त्वाची कलमे खालीलप्रमाणे आहेत.

(कराराची कलमे मूळातून समजावीत यासाठी मुद्दाम त्यांचे भाषांतर केलेले नाही)
  • The Government of Pakistan recognizes Kalat as an independent sovereign state in treaty relations with the British Government with a status different from that of Indian States.
  • Legal opinion will be sought as to whether or not agreements of leases will be inherited by the Pakistan Government.
  • Meanwhile, a Standstill Agreement has been made between Pakistan and Kalat.
  • Discussions will take place between Pakistan and Kalat at Karachi at an early date with a view to reaching decisions on Defence, External Affairs and Communications.

या करारातील वकिलीची फी म्हणून जिन्नांनी कलातच्या खानाकडे स्वतःच्या वजनाइतके सोने मागितले होते व खानाने ते दिले. तब्बल ४० किलो सोने कलातने त्यांना दिले होते. पुढे जिन्ना यांनी ते पाकिस्तानला दान केल्याचे संदर्भ आहेत.

म्हणजे भारत आणि पाकिस्तानच्या ही आधी ११ ऑगस्ट १९४७ ला बलुचिस्तान स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्र बनला होता.

पण यानंतर पाकिस्तानने अवघ्या २२७ दिवसांमध्ये आपले म्हणणं फिरवले.

मार्च १९४८ मध्ये पाकिस्तानी सेना तिथे आली आणि खान यांचे अपहरण करून त्यांना कराचीला नेण्यात आले. त्यांच्यावर दबाव टाकून पाकिस्तानात विलीन होण्यासाठी त्यांच्याकडून सही घेण्यात आली. आणि येथून स्वातंत्र्याची पहिली ठिणगी पेटली. बलुच लोक सुरुवातीपासूनच स्वातंत्र्याची मागणी करीत आहेत.

इराणी वंशाच्या बलूच जमातीतील लोकांमुळेच या प्रांताला बलुचिस्तानला हे नाव इथे पडले.

कलात यांनी पाकिस्तानात जाण्यासाठी काही अटी घालून दिल्या होत्या. संरक्षण, चलन, परराष्ट्र धोरण आणि आर्थिक बाबी संघराज्य सरकार हाताळेल पण इतर प्रकरणांमध्ये निर्णय फक्त बलूचिस्तानच घेईल. या अटींचे पुर्ततेचे आश्वासन पाकिस्तानकडून दिले गेले.

परंतु खान यांचा पाकिस्तानमध्ये कलातला विलीन करण्याचा निर्णय त्याच्या भावाला मान्य झाला नाही. परिणामी पाकिस्तानी लष्कराविरोधात कलात मध्ये संघर्ष सुरू झाला. आणि विविध कारणांमुळे तो चिघळत गेला.

आणि जीवघेण्या प्रवासाची सुरुवात झाली….

स्वतंत्र बलुचिस्तान चळवळीचे प्रतीक असलेले नवाब नवरोज खान.

कलाट खान यांच्या बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याविरोधात नवरोज खान यांनी शस्त्रे हाती घेतली आणि पाकिस्तानविरूद्ध गनिमी युद्धाला सुरुवात केली. सरकारने त्यांना त्वरित अटक केली. खटला चालवला. कुटुंबातील पाच सदस्यांना फाशी देण्यात आली.

तर नवाब नवरोज खान यांचे पाकिस्तानात तुरूंगात निधन झाले.

१९५४ मध्ये पाकिस्तानने “वन युनिट पॉलिसी” जाहीर केली. त्यानुसार पश्चिम पाकिस्तानचे चारही प्रांत एकत्र करण्यात आले. त्यामुळे बलुचिस्तानचे स्वतंत्र अतित्व निर्माण होण्याची शक्यताच संपुष्टात आली. या धोरणाअंतर्गत पाकिस्तानने बलुचिस्तानमध्ये लष्करी तळ स्थापन केले. त्यामुळे प्रांतिक स्वायत्तता पूर्णपणे संपली.

१९६० च्या दशकात बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याच्या मागणीमुळे बलुच आणि पाकिस्तानी लष्कर यांच्यातील संघर्ष चालूच राहिले. १९६९ मध्ये “वन युनिट पॉलिसी” रद्द करण्यात आली. त्या बदल्यात १९६९ मध्ये बलुच नेता नौरोज खान यांनी शस्त्र समर्पण करण्याची अट ठेवली.

ती मान्य केली. पण त्यांनी शस्त्रं समर्पण केल्यानंतर पाकिस्तान सरकारने त्यांच्या मुलग्यांसह अनेक समर्थकांना फाशी दिली.

“वन युनिट पॉलिसी” रद्द करण्यातर आल्यानंतर १ जुलै १९७१ या दिवशी बलुचिस्तानला पश्चिम पाकिस्तानचा चौथा प्रांत म्हणून मान्यता देण्यात आली. पण

बुलचिस्तानची स्वातंत्र्याची मागणी चालूच राहिली.

बुलचच्या मागणीला इराक आणि अफगाणिस्तानकडून मिळत असलेल्या लष्करी मदतीमुळे १९७३ मध्ये बलुचिस्तानमध्ये परत पाकिस्तानविरोधात उठाव केला गेला. यामुळे तत्कालीन पाकिस्तानचे राष्ट्रपती जुल्फीकार अली भुत्तो यांनी १९७३ मध्ये बलुचिस्तानचे प्रांतिक सरकार बरखास्त केले व बलुचिस्तानमध्ये लष्करी कायदा लावण्यात आला.

१९७४ मध्ये जनरल टिक्का खान यांच्या नेतृत्त्वाखाली पाकिस्तानी सैन्याने मिराज आणि एफ 86 लढाऊ विमानांनी बलुचिस्तानातल्या अनेक भागांवर बॉम्ब टाकले. अगदी इराणच्या शाहनेही आपली कोब्रा हेलिकॉप्टर्स पाठवून बलुच बंडखोरांच्या भागांवर बॉम्ब हल्ला घडवून आणला यात त्यांनी बलुचिस्तानातल्या अबालवृद्धांना मारून टाकले.

असे म्हणतात की सैन्य आणि बलोच सेनानींच्या या हिंसाचारात पाकमधील सुमारे ४०० आणि सुमारे बलुच मधील सुमारे ८ हजार नागरिक-सैनिक मारले गेले.

त्यावेळी निर्माण झालेल्या असंतोषातून या निर्णयाचा निषेध आणि पाकिस्तान सरकारविरूद्ध एकजूट म्हणून,

बलुचिस्तानचे नेते खैर बख्श मर्री यांनी १९७६मध्ये “बलुचिस्तान पीपल्स लिबरेशन फ्रंट” ची स्थापना केली.

बलुचिस्तानमधील तरुण वर्ग या चळवळीकडे आकर्षित झाला आणि पाकिस्तानी लष्कराविरोधात गनिमी युद्धाला सुरवात झाली. या युद्धात ४०० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक आणि ८ हजार बलुची नागरिक आणि फ्रंटचे जवान मारले गेले.

स्थानिक जनतेची इतक्या प्रचंड प्रमाणात हानी झाल्यानंतर १९७७ मध्ये युद्ध थंडावले पण बलुचिस्तानमध्ये १९८५ पर्यंत मार्शल लॉ कायम होता.

या दरम्यान १९७९ मध्ये तत्कालीन सोव्हिएत संघ आणि अफगाणिस्तान यांच्यात युद्ध सुरु झाले. अर्थात बलाढ्य सोव्हितसाठी हे एकतर्फीच युद्ध होते. पण यानंतर अफगाणिस्तानातून बलुचिस्तानमध्ये निर्वासित म्हणून दाखल होण्यास सुरुवात झाली. त्यांच्यासाठी छावण्या उभारल्या गेल्या.

सोव्हिएत संघ अफगाणिस्तानातून निघून गेल्यानंतर अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवरती तालिबानी गट सक्रीय झाले. या गटांनी बलुचिस्तानाला आपले घर बनवले. यातुन बलुच आणि पश्तून असा संघर्ष सुरू झाला. आधीच अशक्त असलेल्या बलुचिस्तानची आर्थिक स्थिती त्यामुळे आणखीनच ढासळली.

राजकीय अस्थिरतेच्या जोडीला आर्थिक अस्थिरता निर्माण झाली.

काही कालावधी नंतर तर खुद्द पाकिस्तान सरकारनेच तालिबान गटांना बलुचिस्तानात आश्रय द्यायला सुरवात केली. अल कायदा, क्वेट्टा शूरा ए तालिबान, तेहेरिक ए तालिबान या संघटनांनी बलुचिस्तानात प्रांतातून आपल्या कारवाया चालू केल्या.

बलुचिस्तानमधील शिया लोकांवर हल्ले सुरु झाले. ज्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसात कोण तरी व्यक्ती आपला जीव गमावत आहे. आणि सोबतच शिया-सुन्नी असा धार्मिक संघर्ष देखील सुरु आहे.

२००५ मध्ये परत बलुच लिबरेशन आर्मी आणि पाकिस्तानी लष्कर यांच्यात संघर्ष सुरू झाला. त्या संघर्षाला अजूनही चालूच आहे. नवाब अकबर बुगती हे बलुच आंदोलनातलं मोठं नाव होतं. गर्व्हनर आणि केंद्र सरकारमध्ये मंत्रीपद त्यांनी भूषवलेलं होतं. १६ ऑगस्ट २००६ ला जनरल परवेझ मुर्शरफ यांच्या शासनकाळात बुग्ती यांना सैन्याने त्यांच्या गुंफेला वेढा टाकून ठार मारले.

महत्वाचा पण दुर्लक्षित…

पंजाब, सिंध, फाटा, अफगाणिस्तान आणि इराण यांच्याशी बलुचिस्तानच्या सीमा जोडलेल्या आहेत. आणि पाकिस्तानच्यादृष्टीने सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे

ग्वादार बंदर बलुचिस्तानमध्ये आहे. चीनचा शेंजेन प्रांत ग्वादार बंदराला जोडणारा चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग हा चीनचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे प्रकल्पाची सुरक्षा हा मुद्दा लक्षात घेवून बलुच सतत लष्कराच्या छायेत आहे.

नैसर्गिक वायू, तेल, तांबे, सोने अशा साधनसंपत्तीने बलुचिस्तान समृद्ध आहे. पण त्यांच्या खाणींचे काम बहुराष्ट्रीय कंपन्यांकडे असल्यामुळे या साधनसंपत्तीचा वाटा बलुचिस्तानला मिळत नाही. त्यामुळे बलुचिस्तान अजूनही अविकसित आहे.

नैसर्गिक साधनसंपत्ती असूनही बलुचिस्तान पाकिस्तानमधील अत्यंत मागासलेला प्रांत आहे.

बलुचिस्तान समर्थकांचा असा युक्तिवाद आहे की,

पाकिस्तान केवळ पंजाब आणि सिंध प्रांतातच विकसित झाला. त्यातुनच आझाद बलुचिस्तानची मागणी आणि निदर्शकांच्या काही गटांनी दहशतीचा मार्ग स्वीकारला.

पाकिस्तानच्या राजकारणात आणि लष्करात कायमच पंजाबी लोकांचे आणि पंजाब प्रांताचे वर्चस्व राहिले आहे. पाकिस्तान सरकारने जाणीवपूर्वक बलुचिस्तानला प्रतिनिधित्व नाकारले आहे, अशी बलुचिस्तानची तक्रार आहे. आपण मुख्य प्रवाहापासून वेगळे गेलो आहोत, दुर्लक्षित आहोत आणि नाकारले गेलो आहोत, अशी भावना बलुच जनतेच्या मनात आहे.

बलुचिस्तानमधील संघर्ष रोखण्यासाठी पाकिस्तान सरकारने सातत्याने लष्करी बळाचा वापर करते. त्यामुळे बलुचिस्तान आणि पाकिस्तान सरकार यांच्यामध्ये संवादाचा आभाव आहे.

बलुचिस्तान नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असणारा प्रदेश- नैसर्गिक वायूचे साठे बलुचिस्तानमध्ये आहेत. ज्याच्या उपयोगाने पाकिस्तान उर्जेची निर्मिती करते. सुई भागामधून जो गॅस काढला जातो त्याने पाकिस्तानातली घरे उजळतात पण बलुचिस्तानातल्या लोकांपर्यंत हा प्रकाश पोहोचलेला नाही.

अशा या ऐतिहासिक आणि राजकीय संघर्षाच्या चक्रव्युहामध्ये अडकलेल्या बलचिस्तानमध्ये सातत्याने मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याच्या बातम्या येत असतात. वार्ताहरांना देखील तिथे मुक्त प्रवेश नाही. केवळ सैन्याने अधिकृत केलेल्या वार्ताहारांना मर्यादित प्रमाणात प्रवेश मिळतो.

त्यामुळे जिथे आंतराष्ट्रीय पातळीवर संधी मिळेल तिथे बलुचिस्तान आपली मागणी मांडत असतो. न्याय मागत असतो. अत्याचर थांबवून स्वातंत्र्य मागत असतो.

अलिकडेच झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया मधील उपांत्यपूर्व फेरीतील सामना चालू असताना मैदानावरून “जगाने बलुचिस्तानसाठी आवाज उठवला पाहिजे”, “वर्ल्ड मस्ट स्पीक फॉर बलुचिस्तान” असा बॅनर लावलेले एक खाजगी विमान उडविले गेले.

आणि त्यापूर्वीच्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील सामन्याच्यावेळी देखील “बलुचिस्तानला न्याय हवा”- “जस्टीस फॉर बलुचिस्तान” असे बॅनर असलेले विमान उडवले गेले.

सध्या भारताची भुमिका काय ?

इतिहासात आणि सध्याही भारताचा बलुचिस्तानला पुर्ण पाठिंबा आहे.

२०१६ साली पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील अत्याचार जगासमोर मांडून तेथील स्वातंत्र्य चळवळींना मदत करण्याची भूमिका व्यक्त केली होती.

त्याचप्रमाणे मोदींना पाठींबा देणाऱ्या तेथील जनतेचे आभारही मानले होते. म्हणूनच मोदी देखील इंदिरा गांधीप्रमाणे पाकीस्तानचे अजून दोन तुकडे करुन दाखवतील असा आशावाद बोलून दाखवला जातो.

आंतराष्ट्रीय राजकारणात नागरिकांचे जीव जाणं थांबत नाही

जागतिक स्तरावर देखील बलुचिस्तानच्या बाजूने सहानभुती आहे. पण सार्वभौम राष्ट्राच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करण्यास मर्यादा आहेत. मात्र अमेरिका, रशिया यांच्या भुमिका यासंर्भात महत्वाच्या ठरतात. अमेरिकेची काहीशी दोलायमान भुमिका आहे. मात्र आंतरराष्ट्रीय राजकारणामुळे तिथल्या जनतेचे जीव जाणं थांबत नाही हे देखील तितकेच कडवे वास्तव आहे.

बाकी बलुचिस्तानने जसे स्टेडियममध्ये जगासमोर बॅनर झळकवले तशा संसदेत देखील घोषणा दिल्या असल्या तर त्यात जास्त आश्चर्य वाटण्याची गरज नाही. कारण बलुचिस्तान कधीच स्वतःला पाकिस्तानचा भाग मानत नाही.

 

मुझे जंगे – आज़ादी का मज़ा मालूम है,

बलोचों पर ज़ुल्म की इंतेहा मालूम है,

मुझे ज़िंदगी भर पाकिस्तान में जीने की दुआ मत दो,

मुझे पाकिस्तान में इन साठ साल जीने की सज़ा मालूम है…

– कवि हबीब जालिब….

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.