बलुतं हा नेहमी दीपस्तंभ म्हणून समोर उभा असेल.

हा देश नावाचा समाजपुरुष म्हणजे मोठ्या जगड्व्याळ भूमिकांची जंत्री आहे. येथे परंपरा आणि आधुनिकतेचा संघर्ष हजारो वर्षे जुना आहे. त्यात धर्माने जातींवर वर्चस्व सिद्ध करण्याचा व जातीव्यवस्थेने माणसावर अधिराज्य गाजवण्याचा, साधन संपत्तीवरील अधिकारांतून निर्माण केलेल्या शोषणाचा, अत्याचाराचा, मानवी मूल्यांच्या पायमल्लीचा हा पसारा आहे. त्याला आम्ही गोंडसपणे समाज, देश, राष्ट्र वा धर्म इ. कप्प्यांतून आपल्याला मिळणाऱ्या हितानुरूप पाहतो.

हजारो वर्षे या देशात माणसाला माणूस म्हणून न वागवता, त्याला जनावरांपेक्षाही हीन दर्जाची वागणूक देणाऱ्या धर्म – जातीसंस्थेच्या उतरंडीत माणसांच्या अभिव्यक्तीला मर्यादा घातल्या आहेत, ज्याच्या माणूस असण्यावर बंदीचा शिक्का मारला गेला आहे, ज्याच्या जगण्यावरच वर्णवर्चस्व आणि सामाजिक मागासलेपणाचा जन्मजात चटका देण्यात आला आहे…

होय, देशातील अशा जगणे नाकारलेल्या लोकांची ओळख ‘दल्लीद’ या तमिळ शब्दातून पुढे ‘दलित’ या असहनीय वेदनेने व्यापलेल्या समूहवाचक शब्दात बद्ध केली, भाषेने. प्रज्ञासुर्य भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील कोट्यावधी शुद्र, मागासवर्गीय शोषित समाजाला राजनैतिक, सामाजिक आणि सांस्कृतिक स्वातंत्र्याचा अवकाश मिळवून देण्यासाठी आत्मभान, नकार आणि विद्रोहाचा सांस्कृतिक संगर कृतीतून व चळवळीतून उभा केला. डॉ. आंबेडकर यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन सन १९६७ – १९६८ च्या काळात मिलिंद महाविद्यालयात म ना वानखेडे, म भा चिटणीस, गंगाधर पानतावणे यांच्या नेतृत्वात ‘अस्मितादर्श’ हे त्रैमासिक सुरु झाले आणि अनेक दलित लेखक, कवींना वर्षानुवर्षांची कोंडी फोडण्यासाठी, अभिव्यक्त होण्यासाठी हक्काची जागा मिळाली. अनेक दलित लेखक, कवींनी सोसलेल्या जातिव्यवस्थेच्या विखारी चटके आपल्या लेखणीने जागे केले व वेदनेच्या हुंकारातून मोठा साहित्यिक विद्रोह उभा राहिला.

ज्येष्ठ साहित्यिक, कवी आणि निष्ठावंत आंबेडकरी कार्यकर्ते राहिलेल्या दया पवार यांच्या ‘बलुतं १९७८’ ने मराठी साहित्यासृष्टीत मोठी खळबळ निर्माण केली. बलुतंने मराठी साहित्यसृष्टीत खर्या अर्थाने अब्राम्हणी सौंदर्याचा विस्तीर्ण अवकाश खुला केला. या नंतरही अनेक आंबेडकरी लेखकांनी आत्मकथने मराठी वाचकांसमोर आणली. पण बलुतंने या सर्व आत्मकथनांसाठी राजमार्ग मिळवून दिला.

ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे आत्मकथन म्हणजे १९८० च्या दशकात वाचककेन्द्री बहुजन हिताय, बहुजन सुखाय या भूमिकेतून उचललेले महत्वाचे सांस्कृतिक पाउल होते, हे बलुतंला या वर्षी चाळीस वर्षे पूर्ण होत असताना  प्रकाशकांचा आदरपूर्वक उल्लेख करणे आवश्यक आहे. बलुतं प्रकाशित झाले होते, तोपर्यंत स्वतंत्र भारत देशाने तीन मोठी युद्धे, बँकांचे  राष्ट्रीयकरण, राष्ट्रीय आणीबाणी, इंदिरा गांधींच्या पराभवाला पाहिलेले होते. या सर्व धुमश्चक्रीत याच देशातील जातीयव्यवस्था किती निगरगट्ट आणि असंवेदनशील आहे, हे ही कादंबरीचा काळ आणि अवकाश समजून घेताना ध्यानात येते. पण वाचक म्हणून आपण नायकाच्या वेदनेशी नाते सांगण्यापलीकडे काहीही करू शकत नाहीत, ही अगतिकता व हतबलता देखील असते. आपल्या जगण्यावरच जन्मभरासाठी केलेले अनंत वेदनांचे, जातीयतेचे गोंदण किती भयानक आणि वास्तवाचे भेदक चित्र वाचकांसमोर उभे करते. अलुतेदार – बलुतेदार संबंध, वर्तणूक यांविषयी स्पष्ट भाष्य ही कादंबरी करते. वेदना आणि विद्रोह या दोन्हीही भूमिकांचे दर्शन ‘बलुतं’ मध्ये पहावयास मिळते.

दगडू मारुती पवार हा या कादंबरीचा नायक. हेच दया पवार यांचे नाव. वयाच्या विविध टप्प्यातील लेखकाच्या या आठवणी आहेत. मुखपृष्ठावर एक कावळा चोचीमध्ये पकडलेला दगड एका मडक्यामध्ये टाकतानाचे चित्र आहे. कावळ्याच्या या प्रयत्नातून मडक्याच्या तळाशी असलेले पाणी दगड टाकून वर येईल, ही पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहताक्षणी वाचकाच्या मनात येत असावे. पुस्तक वाचताना लक्षात येते, हा दगड म्हणजे विद्रोहाचा दगड, कावळा म्हणजे माणूस म्हणून जगणे नाकारलेला दलित नायक आणि फुटलेले मडके म्हणजे विद्रोहाने तुटलेली – फुटलेली, उध्वस्त झालेली जातीव्यवस्था. या कादंबरीतील या आठवणी म्हणजे वाचकाला हादरवून टाकणारे, आपल्याच अवतीभोवती असलेले पण अज्ञात असलेले भयाण वास्तव.

कादंबरीचा नायक असलेला दगडू म्हणजे गावगाड्यात वाढलेला, अस्पृश्येतेचे, हीन वागणूकीचे चटके जन्मभर भोगावे लागणारा, सांस्कृतिक शोषणाचे ‘बलुतं’ मिळालेला असा पण हे चित्र बदलू पाहणारा, शिक्षणाने ‘माणूस’ बनलेला व भोगलेल्या यातनांचा लेखाजोखा वाचकांसमोर मांडणारा, बदलाची वाट चालणारा हा नायक म्हणजे येथील व्यवस्था परिवर्तनाच्या लढाईतील बिनीचा शिलेदार… परिवर्तनाचा वाटसरू.

एकीकडे दैन्य, दु:ख आणि अस्पृश्यतेच्या इंगळ्या डसत होत्या, तर दुसरीकडे त्यातून बाहेर येण्याचा मार्ग शोधण्याची धडपड, या वेदना समजून घेण्याची माणुसकी जन्म घेताना दिसते. उदाहरणार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाणाची आठवण एका प्रकरणात येते. ती आठवण, तो प्रसंग कुणीही संवेदनशील माणूस गलबलून जाईल, असाच उतरवला आहे. या महापरिनिर्वाणाला जाण्यासाठी सरकारी खात्यात नोकरी करणारा नायक सुट्टी मिळावी म्हणून धडपडतो. ऑफिसात वरिष्टांकडून मिळणारी अपमानास्पद व तुच्छतेची वागणूक, अंत्यसंस्कार करण्यासाठी निघालेले दु:खी, धाय मोकलून रडणारे लाखो लोकांचे लोंढे आणि या गर्दीत सहभागी असलेला नायक, त्याची होणारी घालमेल… बलुतंने माणूसपणासाठीची तगमग विश्वव्यापी केली आहे. हे अब्राम्हणी सौंदर्य शेकडो वर्षांच्या अपार वेदनेच्या वेलीवर उमललेले आहे.

आज बलुतंकडे पाहताना लक्षात येते, बलुतं नंतर अनेक दलित आत्मकथने आली, ती गाजलीही. पण बलुतंने मराठी साहित्यविश्व बदलले. अनेकांना आत्मकथने लेखनाची प्रेरणा बलुतंने दिली. याहीपुढे जाऊन बलुतंने मराठी साहित्याला जगाच्या नकाशावर आत्मभान दिले आहे. हिंदी, इंग्रजी, फ्रेंच, जर्मनी आदी भाषांमध्ये अनुवाद झालेली ही साहित्यकृती म्हणजे एक प्रकारे भारतीय समाजव्यवस्थेचा आरसाच आहे. यात जसे दैन्य, दु:ख आहे, तसेच सौंदर्य आहे, सत्य आहे आणि नव उन्मेषाचा जागर आहे.

बलुतं साहित्यविश्वातील परिवर्तनाचा उत्थानबिंदू ठरली आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठीच्या, आंदोलनांच्या वर्तमानात बलुतं हे नव्या पिढीला घरातील सर्वात ज्येष्ठ आजोबा आठवणी सांगतात तशी बोलती होत, संयतपणे बदलाची वाट चालण्याचा प्रेमळ आग्रह करत व ही वाट विस्तारण्याची प्रेरणा देत राहते. उदारीकरणाच्या पंचविशीत यंदा बलुतंची चाळीशी साजरी होतेय हा मोठा आनंद आणि माणूसपणाच्या लढाईला बळ देणारी घटना आहे. २१ व्या शतकासाठी आता नवा गावगाडा समजून घेताना, साहित्यिक समाजशास्त्रीय बैठकीत नोंदवताना व निरीक्षणे मांडताना बलुतं हा नेहमी दीपस्तंभ म्हणून समोर उभा असेल हा विश्वास वाटतो. 

  • हर्षल लोहकरे (9960938917)
Leave A Reply

Your email address will not be published.