‘बलुतं’ जात वास्तवाला भिडत जगण्याची प्रेरणा देतं.

माझ्या हाती ‘बलुतं’ आलं ते मी मुंबई विद्यापीठात शिक्षण घेत असताना. ‘दगडू’ या दुःखाने गदगदलेल्या झाडाचं आत्मकथन वाचताना मी आताच्या पिढीतला असुनही हा सगळा पट स्वतःशी, आजूबाजूच्या समाजाशी आणि माझ्या भवतालाशी जोडून बघू लागलो. दगडू मारुती पवार यांनी भोगलेला आणि लिहिलेला काळ जरी त्या मानाने आधीचा असला तरी, त्याची प्रचिती आजही येतच होती.

एका बाजूला मी ‘बलुतं’ वाचत होतो आणि दुसरीकडे मायानगरी मुंबई जगतही होतो. २१ व्या शतकात मुंबईसारख्या शहरातील विद्यापीठात शिकत असतानाही  दगडूला आपल्या आयुष्यात जे काही अनुभव आले होते, तसेच काहीसे अनुभव बदललेल्या काळाच्या ओघात थोड्या-फार बदललेल्या स्वरुपात मला देखील येत होतेच. या अनुभवांमागचं दुःख, वेदना, घुसमट, भ्रमनिरास,आणि कुचंबणा हे सगळं कमी अधिक प्रमाणात सारखंच होतं. त्यामुळे बलुतं अधिक रिलेट करता येत होतं आणि लढण्याची प्रेरणा देखील देत होतं.

‘बलुतं’ ही वर्षानुवर्षे दलितांच्या आणि वंचितांच्या वाट्याला आलेल्या संघर्षाची कहाणी होती. दगडूच्या वाट्याला आलेले भोग हे समाजात खोलवर रुजलेल्या जातीव्यवस्थेचे प्रोडक्ट होतं. ‘बलुतं’ वाचताना एक विलक्षण आपुलकी दगडू सोबत निर्माण झाली होती. त्याने स्वतःशी साधलेला आर्त संवाद, मनातली मोकळी केलेली घुसमट हे सगळं आपलंच जगणं आहे असं वाटत होतं.

‘बलुतं’ प्रकाशित झालं होतं १९७८ साली, म्हणजेच चाळीस वर्षांपूर्वी. पण अजून देखील ग्रामीण आणि शहरी समाजव्यवस्थेत जातीव्यवस्था अदृश्यपणे कार्यरत असल्याचीच प्रचिती येते. एकविसाव्या शतकात, जागतिकिकरणाच्या युगात आपण कितीही आधुनिकतेच्या आणि प्रगतीशीलतेच्या उर बडवूस्तोर गप्पा हाणल्या तरी आपल्या हा बुडाखालचा हा जातिव्यवस्थेचा अंधार आपल्याला नाकारता येत नाही.

भारतीय समाज व्यवस्थेला काही रूढी-परंपरा-चालीरिती या गोचीडासारख्या चिकटलेल्या आहेत. समाजातील जातीव्यवस्था देखील अशीच सहजासहजी न जाणारी, न सुटणारी. कमी अधिक प्रमाणात सर्वच जाती आणि धर्मामध्ये या वृत्ती आढळून येतात. या व्यवस्थेच्या आधारे कायमच तथाकथित कनिष्ठ वर्गाचं शोषण करता यावं, यासाठीच सवर्ण म्हणवून घेणाऱ्यांकडून ती जोपासली जाते. त्यांतच त्यांचे हितसंबंध गुंतलेले असतात. हे सगळं अगदी स्पष्टपणे कळायला लागलं तेच मुळात ‘बलुतं’ वाचून झाल्यानंतर.

‘बलुतं’मध्ये एक प्रसंग आहे.

तो प्रसंग ज्यावेळी दगडूच्या सहनशीलतेचा बांध फुटतो. दगडूला मिळालेल्या पहिल्या नोकरीच्या  वेळचा. जातव्यवस्थेचे चटके दगडूने ग्रामीण भागात तर सोसलेले असतातच, पण शहरात आल्यानंतर देखील त्याला तोच अनुभव येतो. सहसा सवर्णांमध्ये कुणीच करत नसलेली आणि गावात  आपले लोक करत असलेले काम असलेली नोकरी त्याला करावी लागत असल्याचं त्याला अतिव दुःख होतं आणि चीड निर्माण होते.

दगडूच्या वाट्याला आलेलं  दुःख हे फक्त आर्थिक दारिद्र्याने आलेलं नसतं तर समाजातील जातीय व्यवस्थेने लादलेल्या सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणातून आलेलं असतं. (आजकाल जातव्यवस्थेची झळ न सोसलेले अनेक निर्बुद्ध आर्थिक निकषांवर आरक्षणाची मागणी करतात, त्यावेळी त्यांना या गोष्टीचा सोयीस्कर विसर पडलेला असतो)

एक संवेदनशील मनाच्या, अतिशय संघर्षातून शिक्षण घेतलेल्या तरुणाला समाजाने लादलेल्या या मागासलेपणाचा सामना करत, कुचंबना सहन जगताना काय संघर्ष करावा लागतो आणि या संघर्षादरम्यान त्याची कशी होरपळ होते, हे वाचताना अंगावर काटा उभाराहतो.

‘बलुतं’ प्रकाशित होऊन चाळीस वर्ष झाल्यानंतर, आजच्या परिस्थितीत देखील ‘बलुतं’च्या निमित्ताने  समोर आलेले प्रश्न, दुःख, भोग जर आजही आपल्या समाजात कायम असतील तर ‘बलुतं’च्या चाळीशीच्या निमित्ताने कुठंतरी समाजाने देखील आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे.

निखिल बोर्डे ( nkhlborde04@gmail.com )

Leave A Reply

Your email address will not be published.