दगडूने मला फस्ट्रेशन दिलं नाही तर ध्येयवाद दिला.

मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागात नुकतंच एमेला ॲडमिशन घेतलं होतं. तोपर्यंतचं बहुतेक सगळं आयुष्य तांड्यात गेलेलं. शिक्षणाच्या निमित्ताने थोडाफार शहर -निमशहराचा संपर्क आलेला. तेवढाच काय तो अनुभव. विद्यापीठात दाखल झाल्यानंतर पहिल्यांदा औरंगाबाद सारखं मोठं शहर पाहिलं. गाव खेड्यातल्या कुठल्याही पोरांसारखं सांस्कृतिक,बौध्दिक, भाषिक असे बरेच न्यूनगंड सोबत घेऊन आलेलो. या वातावरणात आपला निभाव लागेल की नाही याबद्दल शंका होती. या सगळ्यात आपण एकटे पडतो की काय असं वाटत असतांनाच एके दिवशी बडवे सर कोसला वाच असं म्हणाले. तोपर्यंत नेमाडेंचं काही वाचलेलं नव्हतं. कोसला वाचायला घेतली. ती काही वाचवत नव्हती. कारण त्यापूर्वी फडके- खांडेकर- अर्नाळकर- बाबा कदम वगैरे लोकं वाचलेली. त्यामुळे विस्कळीत असणारी कोसला आवडली नाही. 

बळेबळे वाचून पूर्ण केली आणि सरांना भेटून आवडली नसल्याचं सांगितलं. सर म्हणाले पुन्हा वाच. दरम्यान एमे पूर्ण झाल्यानंतर जे फस्ट्रेशन आलं त्यात कोसला प्रचंड आवडून गेली. पांडुरंग सांगवीकर माझाच प्रतिनिधी वाटू लागला. माझ्या जाणीवा नेणिवा त्याने व्यापून टाकल्या. त्याचा प्रभाव इतका गहिरा होता की मी त्यातून मिसकॉल ही कादंबरी लिहून काढली. खरेतर हा मानसिक संघर्षाचा काळ होता. डोक्यात एक अनिवार पोकळी तयार झालेली. ती अगतिकता होती की हतबलता होती की औदासिन्य होतं की आणखी काही. नेमकं काही कळत नव्हतं. पण मेंदूवर सतत एक प्रकारचा ताण आलेला असायचा. आपण खेड्यातले आहोत,गरीब शेतकरी आहोत. अभिजनांच्या साहित्यिक राजकारणात आपलं सांस्कृतिक राजकारण रेटणारा आपला मसिहा म्हणजे नेमाडे असं वाटू लागलेलं होतं. 

त्यातच नेटच्या अभ्यासानिमित्त बलुतं वाचण्यात आलं. पहिल्याच वाचनाने मी काही असा अचानक झपाटून गेलो नाही. सलग दोनदा, तीनदा, चारदा वाचलं. सायलेंट पॉयझनसारखं ते मन आणि मेंदूवर हळूहळू कब्जा करत गेलं. शेवटी अक्षरशः मी आतून बाहेरून हलून गेलो. मला माझाच नव्याने साक्षात्कार झाला.  आपण ज्याला साहित्य वगैरे म्हणतो ती जगण्याची इतकी भयंकर गोष्ट असू शकते याची कल्पना नामदेव ढसाळांच्या कवितेने आलेली होतीच. पण बलुतंने ती अधिक ठळक केली. 

दगडू पवार फक्त मला माझा प्रतिनिधी नाही वाटला, तो अखिल शोषित-पिडित जगाचा नायक वाटला. त्या काळात मनावर सिनेमाचं गारूड होतंच होतं. पण तो पिक्चरमधल्या  हिरोसारखा रोमॅन्टिक आणि आकर्षक वाटला नाही. त्याची आपल्यातील अपरिहार्यता एकसारखी जाणवत होती. दगडू पवारच्या विच्छिन्न जगात मी स्वतःसाठी एक सुरक्षित कोपरा शोधत होतो. पण एकही कोपरा शिल्लक नव्हता. ते वयच बेदरकार होतं. इच्छेचे बेलगाम घोडे फुलाफुलांच्या मऊशार आभाळात तरंगून हळूवार खाली उतरायचे तर समोर दगडूची उघडी दुनिया स्वागतासाठी उभी असायची. त्यातल्या शिव्या, स्रिया,मैथून मला माझ्या आसपास दिसू लागायचे.

मी अचानक तरूणाचा प्रौढ बनायचो आणि प्रौढाचा पुन्हा तरूण बनायचो. दगडूचं खेड्यातलं जगणं आणि नंतर मुंबईसारख्या महानगरातलं जगणं हे मला स्वतःकडे अनेकांगानी पाहायाला शिकवत होते.

आपण खेड्यातले आहोत, शेतकरी आहोत हे खरे असले तरी तिथल्या जातिअंतर्गत वर्गव्यवस्थेत आपला वर्ग खालचा आहे. आपण जातीनं लमाण आहेत ही जाणीव बलुतंने मला दिली. गाव खेड्यातला शेतकरी वर्ग शोषित आहे पण या वर्गात आणखी काही वर्ग सामावलेले आहेत आणि ते अधिक शोषित आहेत हे मला नव्याने कळू लागले. 

दगडू रुढार्थाने शेतकरी नाही, पण तो शेतकऱ्यांसहित सर्व शोषित पिडित घटकांचं प्रतिनिधित्व करणारा प्रतिनायक आहे. त्याने माझे बौध्दिक,भाषिक, सांस्कृतीक असे न्यूनगंड नाहीसे केले. तरुणपणात असामान्याची ओढ असली तरी सामान्यपणातही एक नायकत्व दडलेलं असतं. आपण असामान्य नसल्याचं न्यूनगंड उरत नाही. दगडूने मला फस्ट्रेशन दिलं नाही तर धेय्यवाद दिला. हतबल न होता,व्यवस्थेला शरण न जाता जगण्या लढण्याची उर्जा दिली. विचारांची प्रगल्भता दिली. आपण जे काही आहोत त्याचा प्रामाणिकपणे स्विकार करण्याची ताकद दिली. अगतिकतेचं ऊर फोडून करुणेचं एक विशाल आभाळ डोक्यावर दिलं. स्वप्न आणि निराशेच्या झुल्यावरून आत्मशोधाच्या वाटेवर आलो. आज मी जे काही आहे त्यात बलुतंचा मोठा वाटा आहे.  

  • सुदाम राठोड
Leave A Reply

Your email address will not be published.