आता हरियाणात ‘गोरख धंदा’ बोलून चालायचं नाही.

काय रे काय, कसला गोरख धंदा चालवलायस…ब्बाब्बोव आता हे बोलून चालायचं नाही.

म्हणजे जर तुम्ही हरियाणात असाल तर, अजिबातच हा शब्द तोंडातनं काढायचा नाही, बरं का. कारण हरियाणा सरकारने ‘गोरख धंधा’ या शब्दाच्या वापरावर बंदी घातली आहे. बुधवारी जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनानुसार मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी गोरखनाथ समाजाच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन यासंदर्भात निर्णय घेतलाय.

त्याच झालंय असं की, या शब्दामुळे संत गोरखनाथांच्या अनुयायांच्या भावना दुखावल्या जातात. त्यामुळे या शब्दाच्या वापरावर बंदी घालण्याची विनंती शिष्टमंडळाने खट्टर यांना केली होती.

त्यावर खट्टर म्हणाले की,

गोरखनाथ हे संत होते. कोणत्याही अधिकृत भाषेत, भाषणात किंवा कोणत्याही संदर्भात या शब्दाच्या वापरामुळे त्यांच्या अनुयायांच्या भावना दुखावतात, म्हणून कोणत्याही संदर्भात या शब्दाच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. त्यासाठी कायदा बनवला जाईल. कायद्याचं पालन न करणाऱ्यास कठोर शिक्षा दिली जाईल.

आत्ता इतका फोकस एका शब्दाभोवती नेमका का बरं ? अस काय आहे या शब्दात?

‘गोरखधंदा’ शब्दाचं मूळ.

गोरखधंदा या शब्दाचं मुळ गोरखनाथ या नाथ संप्रदायाशी आहे. गोरखनाथ यांच्या अनाकलनीय गुढ वागण्यासाठी हा शब्द वापरण्यात आल्याचे पुरावे सादर केले जातात. नाथ संप्रदायातील गुरू गोरखनाथ यांच्या गुरु गोरखनाथ नावातील ‘गोरख’ आणि त्यांच्या अबोध कारनाम्यांसाठी ‘धंदा’ असे हे २ शब्द एकत्रित येऊन ‘गोरखधंदा’ हा शब्द तयार झाला आणि पुढे गूढ कृत्यांसाठी तो वापरण्यात येऊ लागला.

डॉ. पितांबर दत्त बडत्थवाल यांनी गुरु गोरखनाथ यांच्या रचनांचं संकलन आणि संपादन करून ‘गोरख वाणी’ नावाचं पुस्तक प्रकाशित केलं. मानवामधील देवत्वाच्या शोधासाठी गुरु गोरखनाथ यांनी एवढे मार्ग सांगितले की त्यांच्याच भक्तांमध्ये संभ्रमाची अवस्था निर्माण झाली की काय चूक, काय बरोबर..? काय करायचं आणि काय नाही करायचं…?

ही गोष्ट परत अबोधतेकडे घेऊन जाते. अनाकलनीय होऊन जाते.

गोरखपंथीय साधू आपल्या हातातील काठीने जमिनीवर एक चक्र बनवत असत. त्या चक्राच्या बरोबर मधोमध एक छिद्र करण्यात येत असे आणि त्यात माळेइतक्या आकाराचा दोर टाकण्यात येत असे. त्यानंतर छिद्रामध्ये टाकलेली ही दोर एका मंत्राच्या सहाय्याने बाहेर काढण्यात येत असे.

हा प्रकार देखील अतिशय अद्भुत आणि अनाकलनीय होता. म्हणूनच या क्रियेला ‘गोरख धंदा’ किंवा ‘धंधारी’ म्हंटल जायला लागलं. त्यामुळेच अनाकलनीय गोष्टींसाठी ‘गोरख धंदा’ हा शब्द प्रचलित व्हायला लागला.

अनाकलनीय गोष्टींसाठी ‘गोरख धंदा’ शब्द इतका लोकप्रिय झाला की उर्दूत देखील तो त्याच अर्थाने वापरला जायला लागला. उर्दूमध्ये आपल्याला ख्यातकीर्त उर्दू गायक आणि शायर नुसरत फतेह अली खान यांनी आपल्या गायनाने अजरामर केलेली नाज ख्यालवी यांची ‘तुम एक गोरख धंदा हो’ नावाची सुप्रसिद्ध कव्वालीच सापडते.

या कव्वालीमध्ये नाज ख्यालवी यांनी थेट ईश्वरासाठीच ‘गोरख धंदा’ हा शब्द वापरलाय.

कभी यहाँ तुम्हें ढूँढा, कभी वहाँ पहुँचा,
तुम्हारी दीद की खातिर, कहाँ कहाँ पहुँचा,
ग़रीब मिट गए, पामाल हो गए, लेकिन
किसी तलक ना तेरा आज तक निशां पहुँचा,
हो भी नहीं और हर जां हो…
तुम एक गोरखधंधा हो… तुम गोरखधंधा हो…

ईश्वराच्या, अल्लाहच्या, जीजसच्या लीला इतक्या अनाकलनीय आहेत की भक्तांना त्यांचा अंदाजच येत नाही. देवाला शोधण्यासाठी माणूस काय-काय म्हणून नाही करत..? पण माणसाला देव काही मिळत नाही. तो कुठेच नाही आणि त्याचं अस्तित्व सर्वत्रच आहे. असा हा देव, ईश्वर म्हणजे एक अनाकलनीय गूढ आहे. ‘गोरख धंदा’ आहे, असं काहीसं नाज ख्यालवी आपल्या या रचनेत म्हणतात.

साक्षात देवासाठी वापरलेल्या ‘गोरख धंदा’ शब्दाची खट्टर यांना नेमकी अडचण काय..?

माध्यमांमध्ये ‘गोरख धंदा’ हा शब्द नकारात्मक अर्थाने वापरला जातो. त्यामुळे अनेक वाईट कृत्यांसाठी माध्यमे ‘गोरख धंदा’ हाच शब्द वापरतात. खरं तर या गोष्टीशीही कोणाला काहीच देणं-घेणं नाही.

गुरु गोरखनाथ यांना मानणाऱ्या नाथ संप्रदायाचा पश्चिम राजस्थानात हरियाणात मोठ्या प्रमाणावर प्रभाव आहे. विशेष म्हणजे या संप्रदायाचे महंत आहेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.