“बँड ऑफ ब्रदर्स”
विचार करा दूसऱ्या महायुद्धात लढलेले खरेखुरे सैनिक तुम्हाला त्यांची कथा सांगत आहेत. त्यातूनच सिरीज चालू होते. तुम्ही आत्ता समोर असणारी पात्र आणि सिरीजमधली पात्र याची जुळवाजुळव करु लागता. हळूहळू तुमच्या समोर उभा राहते तो मानवी भावभावनांचा युद्धपट !!!
युरोपसोबतच संपुर्ण जगातल्या प्रत्येक कलाकृतीवर मुळापासून घाव घालणारी गोष्ट म्हणून दूसऱ्या महायुद्धाचा उल्लेख केला जावू शकतो. मात्र याच युद्धाने अनेक कलाकृती अजरामर केल्या. हॉलिवूड चित्रपटांनी तर दूसऱ्या महायुद्धाचा विषय हाताळताना एकाहून एक सरस चित्रपट निर्माण केले.
सेव्हिंग प्रायव्हेट रायन, शिंडलर्स लिस्ट, द पियानिस्ट अशी काही उदाहरणं तर जागतिक महायुद्धावर बनलेले मास्टरपीस म्हणून ओळखले जातात. याच यादित उल्लेख करण्यासारखी सिरीज म्हणजे HBO ने सत्यघटनेवर बनवलेली बँड ऑफ ब्रदर्स.
बँड ऑफ ब्रदर्स बघण्यामागे दोन कारणे आहेत, एक म्हणजे त्यातील विषयाची मांडणी आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे हि सिरीज स्टिव्हन स्पिलबर्ग आणि टॉम हँक्स या दोघांनी मिळून प्रोड्युस केली आहे. ज्या जोडीने आपल्याला सेव्हिंग प्रायव्हेट रायन सारखा चित्रपट दिला आहे त्यांचं पुढचं काम बघायला आतुर असणं स्वाभाविक आहे. १० एपिसोडची हि सिरीज बघितल्यानंतर एका सिरीज ऐवजी १० सिनेमे बघितल्याचा अनुभव आपल्याला मिळतॊ.
बँड ऑफ ब्रदर्स हि कथा आहे अमेरिकन सैन्यातील इजी कंपनीतील प्लाटूनची..
प्रत्येक सदस्याची व्यक्तिगत स्टोरी आहे. कोणत्याही एका प्रसंगात न अडकवता हि सिरीज आपल्याला इजी कंपनीतील सदस्यांचा धाडस, प्रसंगी त्यांचा भित्रेपणा दाखवत राहते. युद्धातील सहकाऱ्यांपेक्षा एक कुटुंब म्हणून वाढत जाणारे संबध यात दिसत राहतात. प्रत्यक्षात युद्धाच्या प्रसंगाहून जास्त आकर्षक वाटतात ते या परस्थितीत निर्माण होणारे मानवी संबंध. या कथेचा कोणी एक हिरो नाही, प्रत्येक एपिसोड प्रमाणे जशी कथा डेव्हलप होत जाते तसा कथेचा फोकस देखील वेगवेगळ्या पात्रांवर फिरत राहतो.
या सिरीजच अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या कथेमध्ये करण्यात आलेलं डिटेलिंग. ही स्टोरी सिरीज स्वरूपात मांडण्यात आल्यानं रिसर्चला भरपूर प्राधान्य देण्यात आलं आहे. स्टोरीमध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटनेपासून ते लोकेशनपर्यंतचा इतका बारीक तपशील मांडला आहे कि, इजी कंपनीचा सगळा प्रवास आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो.
थोडक्यात सांगायचं झालं तर, इजी कंपनीच्या ट्रेनिंगच्या पहिल्या दिवसापासून त्यांच्या शेवटच्या मिशनपर्यंतचा प्रवासात आपण पुर्णपणे गुंतून जातो.
आजवर अनेक युद्धकथा आपल्यासमोर सत्यकथा म्हणून सादर केल्या आहेत पण या सिरीजमधील सत्यकथा मांडत असताना त्याला तितकीच वास्तवाची जाणिव करुन दिली आहे. या युद्धादरम्यान एका पिढीचं झालेलं नुकसान, त्यांच धाडस, सामोरे आलेले प्रसंग हे एकाच वेळी त्यांच्याकडून ऐकणं आणि बघणं हा युनिक अनुभव आहे.