बंडातात्या कराडकरांनी एकदा राज्य सरकारने केलेली पद्मश्रीची शिफारस नाकारली होती

सद्या राज्याच्या राजकारणात ज्येष्ठ कीर्तनकार हभप बंडातात्या कराडकर यांच्यावरून बराच वाद पेटला आणि म्हणायला तसा शांत झाला….म्हणजेच म्हणण्यापुरताच शांत झाला असला तरी चर्चा अजून तात्यांचीच आहे. 

बंडातात्या कराडकर यांनी नेत्यांची मुलं दारुच्या आहारी गेल्याचं सांगत काहीजणांची नावंदेखील घेतली. पतंगराव कदम यांच्या मुलाचं निधन कसं झालं होतं विचारा? असंही ते पत्रकारांना म्हणाले होते. तसंच सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांच्या नावाचाही उल्लेख केला. कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारु पित नाही त्याचं नाव सांगा असं आव्हानच त्यांनी पत्रकारांना दिलं होतं. तसंच आपण नावं घेतली आहेत त्यांनी पुरावा मागितलं तर सिद्ध करु शकतो असंही म्हणाले. सुप्रिया सुळेंनी बंडातात्या खोटं बोलत आहेत सांगावं असं आव्हानही त्यांनी दिलं.

मग काय यावरून राजकारणाने असा काही पेट घेतला कि, यात आघाडी सरकारच्या महिला नेत्यांपासून ते विरोधी पक्षातील खासदार नवनीत राणा यांच्यापर्यंत सर्वांनीच बंडातात्यांवर टीकेची झोड उठवली आहे. 

दरम्यान, बंडातात्या कराडकर यांनी सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांना फोन करुन माफी मागितल्याचं सांगितलं जातंय. तसंच आपल्या वक्तव्याचे माध्यमामध्ये जोरदार पडसाद उमटल्यानंतर आपण माफी मागायला तयार आहोत, पण आता हा विषय संपवा, असं बंडातात्या म्हणाले. मी फक्त एवढंच बोललो नाही. मात्र, माध्यमांमध्ये माझं तेवढंच वक्तव्य दाखवण्यात आलं. आपण चुकलो असू तर माफी मागण्यात कमीपणा नसतो, असं म्हणत बंडातात्या यांनी दिलगिरी व्यक्त केलीय.

आत्ताचा विषय बाजूला ठेऊन बंडातात्या कराडकर हे या आधी अनेकदा वादात सापडले आहेत.

मागच्याच वर्षी जुलै मध्ये त्यांना अटक झाली होती. कोरोना प्रतिबंध नियमांना डावलून आणि राज्य सरकारचा आदेश झुगारून पंढरपूरच्या दिशेने पायी निघाले होते त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली होती. वारकरी आळंदी- पंढरपूर चालत येणारच, असा एल्गार बंडातात्यांनी केला होता. 

महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन काळात मंदिरे खुली न केल्यामुळे बंडातात्यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. त्यांनी एक पत्रं लिहून सरकारचा निषेध म्हणून यंदा दिवाळी साजरी करू नका, असं आवाहन केलं होतं.

जेंव्हा आर. आर. पाटील उपमुख्यमंत्री असताना डाऊ या परदेशी कंपनीचा विषय ऐरणीवर आला होता.  मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांकडून आंदोलन झालं होतं.  कराडजवळ पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर टाळ – मृंदगाच्या जयघोषात रास्तारोको करत वाहतूक ठप्प पाडली होती. याचदरम्यान ह.भ.प…बंडातात्या कराडकर यांनी कोणत्याही परस्थितीत आर.आर. आबांना कार्तिकी एकादशीची पूजा करु देणार नसल्याचा इशारा दिला होता. त्यामुळे आर.आर. आबांना पुजेसाठी जाता आलं नव्हतं. त्या ऐवजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी पुजा केली होती. त्यांच्या आंदोलनाला यश येऊन डाऊ कंपनीला काढता पाय घ्यावा लागला होता. 

त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसाठी आंदोलन करण्याचा त्यांनी इशारा दिला होता. यापूर्वी गोहत्या बंदी कायद्यासाठी त्यांनी चक्क मुख्यमंत्र्यांना अडवलं होतं. गो हत्या बंदी कायदा महाराष्ट्रात लागू करण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा रोखण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार होतं आणि पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.

त्यानंतर ते पुन्हा एकदा चर्चेत आलेले बंडातात्या कराडकर कोण आहेत? 

वारकरी सांप्रदायातील ज्येष्ठ महाराज आणि संतवीर म्हणून हभप बंडातात्या कराडकर यांची ओळख आहे. हभप बंडातात्या कराडकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ कीर्तनकार आहेत. तसेच ते समाज प्रबोधनकारही आहेत. 

हभप बंडातात्यांनी १९९६ मध्ये व्यसनमुक्त युवक संघाची स्थापना केली होती. व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांना व्यसनमुक्त करण्यासाठी ही संस्था काम करते. गेल्या २० वर्षांपासून बंडातात्यांचं हे कार्य सुरू आहे. याशिवाय आत्ताच्या युवा पिढीला आपला इतिहास माहिती असावा म्हणून त्यांनी १९९७ पासून त्यांनी एक मोहीम हाती घेतली आहे जी आजतागायत सुरू आहे.  ती मोहीम म्हणजे ते गडकिल्यांवर प्रतापी संस्कार सोहळ्याचे आयोजन करतात. 

याशिवाय त्यांनी राज्यातील पहिली वारकरी शिक्षण देणारी शाळा सुरु केली.

व्यसनमुक्तीच्या कार्याशिवाय त्यांनी गुरुवर्य भगवान मामा कराडकर शिक्षण संस्थेची स्थापना केली. सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये ही संस्था कार्यरत आहे. या शिक्षण संस्थेतून गुरुकूल पद्धतीने शिक्षण दिलं जातं. विशेष म्हणजे राज्यातील पहिली वारकरी शिक्षण देणारी ही शाळा आहे.

त्यांनी तर एकदा पद्मश्रीची शिफारस नाकारली होती.

२०१९ च्या पद्मश्री पुरस्कारासाठी राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यासाठी बंडातात्या कराडकरांकडून त्यांची माहिती मागवली होती. आपण कोणताही पुरस्कार स्वीकारत नाही, स्वीकारणार, असं सांगत त्यांनी स्वत:च्या कार्याची माहिती द्यायला नकार दिला होता. बंडातात्या कराडकर यांची आजवरची वाटचाल पाहता बंडातात्या कराडकर हे एक समाज प्रबोधक म्हणूनच कार्यरत असल्याचे पहावयास मिळतात.

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.