गांधींना म्हाताऱ्या म्हणणारे बंडातात्या व्यक्तिगत पातळीवर गांधीवादीच आहेत कारण…

‘स्वातंत्र्य हे महामा गांधी यांच्या अहिंसावादामुळे नाही तर क्रांतिकारकांमुळे मिळालं आहे. महात्मा गांधी यांचं हिंदुत्व आणि अहिंसावाद हे दोन्हीही पक्षपातीच आहेत’

असं वादग्रस्त वक्तव्य वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तनकार हभप बंडातात्या कराडकर यांनी केलंय. बोलताना त्यांनी महात्मा गांधी यांचा ‘म्हाताऱ्या’ म्हणत एकेरी उल्लेख केलाय. सहाजिक सोशल मिडीयातून या गोष्टीवर संताप व्यक्त केला जातोय.

भगतसिंहांना आधी स्वातंत्र्य अहिंसक मार्गाने मिळवायचं आहे, पण भगतसिंहांचा हा भ्रमाचा भोपळा तीन वर्षातच फुटला. १९२२ ला एक हत्याकांड झालं, भगतसिंगांना समजलं या म्हाताऱ्याच्या ‘या’ मार्गाने जायचं काही कारण नाही. त्यानंतर भगतसिंग क्रांतीकारक बनले. लोकमान्य टिळकांचं एक वाक्य आहे. या म्हाताऱ्याच्या पद्धतीनं जर स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर एक हजार वर्षे लागतील,

असं कराडकर म्हणाले.

शिवाय कुठंतरी असं सांगितलं जातं की ‘दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल, साबरमती के संत तुने कर किया कमाल.’ असं म्हणणं म्हणजे ज्यांनी स्वातंत्र्यामध्ये आपल्या प्राण्यांच्या आहुत्या दिल्यात, अशा साडे तीनशे लोकांच्या संपूर्ण क्रांतीचा अपमान केल्यासारखं आहे, असंही कराडकर म्हणालेत. त्यांच्या अशा वक्तव्याने ते परत वादात सापडले आहेच. 

मात्र ही काही पहिलीच वेळ नाहीये…

बंडातात्यांची जीभ याआधीही अनेकदा घसरली आहे. त्यांनी काही काळापुर्वीच राज्य सरकारचे वाईन धोरण म्हणजे ‘ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला’, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांना धारेवर धरलं होतं.

तेव्हा नेहमी ज्यांची जीभ घसरते ते असे बंडातात्या कोण आहेत, त्यांचे सामाजिक कार्य हे सगळं जाणून घेणं महत्वाचं आहे. 

बंडातात्यांना मागच्याच वर्षी जुलै मध्ये त्यांना अटक झाली होती. कोरोना प्रतिबंध नियमांना डावलून आणि राज्य सरकारचा आदेश झुगारून पंढरपूरच्या दिशेने पायी निघाले होते त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली होती. वारकरी आळंदी- पंढरपूर चालत येणारच, असा एल्गार बंडातात्यांनी केला होता.

महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन काळात मंदिरे खुली न केल्यामुळे बंडातात्यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. त्यांनी एक पत्रं लिहून सरकारचा निषेध म्हणून यंदा दिवाळी साजरी करू नका, असं आवाहन देखील केलं होतं.

जेंव्हा आर. आर. पाटील उपमुख्यमंत्री होते तेंव्हा डाऊ या परदेशी कंपनीचा विषय ऐरणीवर आला होता. मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांकडून आंदोलन झालं होतं. कराडजवळ पुणे–बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर टाळ–मृंदगाच्या जयघोषात रास्तारोको करत वाहतूक ठप्प पाडली होती. याचदरम्यान ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी कोणत्याही परस्थितीत आर.आर. आबांना कार्तिकी एकादशीची पूजा करु देणार नसल्याचा इशारा दिला होता.

त्यामुळे आर.आर. आबांना पुजेसाठी जाता आलं नव्हतं. त्या ऐवजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी पुजा केली होती. त्यांच्या आंदोलनाला यश येऊन डाऊ कंपनीला काढता पाय घ्यावा लागला होता.

त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यापूर्वी गोहत्या बंदी कायद्यासाठी त्यांनी चक्क मुख्यमंत्र्यांना अडवलं होतं. गो हत्या बंदी कायदा महाराष्ट्रात लागू करण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा रोखण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार होतं आणि पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.

वारकरी सांप्रदायातील ज्येष्ठ महाराज आणि संतवीर म्हणून हभप बंडातात्या कराडकर यांची ओळख आहे.

हभप बंडातात्यांनी १९९६ मध्ये व्यसनमुक्त युवक संघाची स्थापना केली होती. व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांना व्यसनमुक्त करण्यासाठी ही संस्था काम करते. गेल्या अनेक  वर्षांपासून बंडातात्यांचं हे कार्य सुरू आहे. दरवर्षी ३१ डिसेंबर हि संस्था ‘दारू नको दूध प्या’ म्हणून अभियान राबवते….

याशिवाय आत्ताच्या युवा पिढीला आपला इतिहास माहिती असावा म्हणून त्यांनी १९९७ पासून एक मोहीम हाती घेतली आहे जी आजतागायत सुरू आहे. ही मोहीम म्हणजे गडकिल्यांवर प्रतापी संस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते….

विशेष म्हणजे त्यांनी राज्यातील पहिली वारकरी शिक्षण देणारी शाळा सुरु केली.

व्यसनमुक्तीच्या कार्याशिवाय त्यांनी गुरुवर्य भगवान मामा कराडकर शिक्षण संस्थेची स्थापना केली. सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये ही संस्था कार्यरत आहे. या शिक्षण संस्थेतून गुरुकूल पद्धतीने शिक्षण दिलं जातं.

या सगळ्या गोष्टींशिवाय एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे त्यांनी एकदा पद्मश्रीची शिफारस नाकारली होती….

२०१९ च्या पद्मश्री पुरस्कारासाठी राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यासाठी बंडातात्या कराडकर यांच्याकडून त्यांची माहिती मागवली होती. आपण कोणताही पुरस्कार स्वीकारत नाही, स्वीकारणार नाही असं सांगत त्यांनी स्वत:च्या कार्याची माहिती द्यायला नकार दिला होता….

आत्ता ही झाली एक बाजू. बंडातात्या कराड यांची दूसरी बाजू ही गांधीवादीच राहिलेली आहे. महात्मा गांधी च्या प्रमाणे त्यागावर विश्वास ठेवणाऱ्यातले होते तसेच बंडातात्या देखील निरपेक्ष त्यागाचा आयुष्य जगतात अस सांगितलं जातं. त्यांच बॅंकेत खाते नाही, समाजातून देणगी घेवून ते सामाजिक काम करतात व आपल्या प्रत्येक किर्तनानंतर ते या पैशाचा हिशोब देखील देतात अस सांगण्यात येत.

थोडक्यात काय तर बंडातात्या एका अर्थाने गांधीवादी विचारसरणी अंमलात आणतात मात्र जेव्हा विरोधाची चळवळीची वेळ येते तेव्हा मात्र त्यांचा पिंड वेगळाच असतो.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.