बायकोने साठवलेल्या १० हजारांच्या पैशावर सुरू झालेली बॅंक म्हणजे बंधन बॅंक

इतर मोठ्या बँकांप्रमाणे बंधन बँक हि आधीपासूनच मोठी बँक नव्हती. तिने आपला कारभार विस्तारत नेण्याची सुरुवात 2015 नंतरच केली. तिच्या जाहिराती आणि शाखा अशा रस्तोरस्ती नव्हत्या. पण जेवढ्या प्रमाणात ती पसरली होती, तेवढ्या क्षेत्रात तिने विश्वास आणि ग्राहकांशी नात्याची परंपरा निर्माण केली होती.

हाच ध्यास सुरू ठेवत 2015 साली जेव्हा त्यांनी इतर मोठ्या बँकांच्या बरोबरीने स्पर्धा करायला सुरुवात केली, तेव्हा केवळ तीन वर्षांच्या काळात तिचे नाव आज सगळ्यांच्या तोंडी आहे.

भारतामध्ये सर्वात मोठे इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजे आयपीओ उभारताना ज्या बँका यशस्वी झाल्या त्यांमध्ये प्रामुख्याने बंधन बँकेचे नाव घेतले जाते.

एकीकडे भारतातील बँका ढसळत झाल्या आहेत अनेक बॅंकांनी आपली विश्वासार्हता गमावली चाल्ल्या आहेत. सरकारी बँकांना घरघर लागली आहे. बँकांचे एकमेकांमध्ये विलीनीकरण सुरू आहे.

अशा परिस्थितीत बंधन बँकेने भारतीय बँकिंग क्षेत्रात समोर एक आदर्श उभा केला आहे. पण या बँकेची सुरुवात एका साध्या घरातून झाली होती.

अठ्ठावन्न वर्षाचे चंद्रशेखर घोष यांच्या प्रयत्नातून तिची निर्मिती झाली. बंधन बँक फायनान्शिअल सर्व्हिसेस ही संस्था 2001 सालात सुरू झाली. जेव्हा इतर मोठ्या बँका शेतकर्‍यांना आणि महिलांना कर्ज देण्यासाठी उत्सुक नव्हत्या तेव्हा बंधन बँकेने मंजूर भूमिहीन आणि महिला लोकांसाठी मोठ्या प्रमाणात कर्ज देण्यासाठी तरतूद केली.

बँकांकडून मदत न मिळाल्यानंतर लोक सावकारांकडे जातात. त्यांच्याकडून चढ्या दराने व्याजावर पैसे घेतात. आणि परत ह्याचा फेडता न आल्याने कर्जबाजारीपणा या दुष्टचक्रात अडकतात. ही सर्व परिस्थिती घोष यांनी पाहिली होती.

घोष हे यापूर्वी बांगलादेशाची राजधानी ढाका येथील एका संस्थेसाठी काम करत होते. ही संस्था बांगलादेशातील महिलांच्या सबलीकरणासाठी काम करते . तिथे काम ना नफा या तत्त्वावर सुरू होते.

जवळपास दहा वर्षे या संस्थेमध्ये काम करून घोष भारतात परत आले. हे वर्ष होते 1998.

त्यांनी गावातील महिलांसाठी काम करणाऱ्या अजून एका संस्थेमध्ये काम करण्यास सुरुवात केली. तिचे नाव होते विलेज वेल्फेअर सोसायटी. ही संस्था पश्चिम बंगाल मध्ये काम करत होती. लवकरच त्यांच्या लक्षात आले की लहान लहान उद्योजकांना घेऊन त्यांना भांडवल पुरवले की त्या कुटुंबाचे इतर आर्थिक प्रश्न सुटतात. सामान्य माणूस हा लवकर कर्जाच्या कचाट्यातून मुक्त होतो. यामुळे आपल्याला परतावा तर मिळतोच पण त्या कुटुंबालाही मोठा आधार मिळतो.

म्हणूनच त्यांच्या डोक्यात संस्थेचे रुपांतर एका बँकेमध्ये करण्याचा विचार होता.

घोष यांचे कुटुंब त्रिपुरा मध्ये राहणारी एक साधी बंगाली फॅमिली होती. त्यांचे वडील मिठाईचे दुकान चालवत असत. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर आपली सर्व पाच लहान भावंडे व आई ची काळजी घेण्याची जबाबदारी येऊन पडली. त्यांनी ढाका विद्यापीठातून संख्याशास्त्र विषयांमध्ये शिक्षण घेतले. विविध संस्थांसाठी ते काम करू लागले. काही वर्षांनंतर जेव्हा ते एका संस्थेकडे सर्वे करण्याचे काम करत होते तेव्हा अशाच एका विधवा झालेल्या तरुण स्त्रीशी यांची बातचीत झाली. तिने घोष यांच्यासाठी चुलीवर थोडासा भात शिजवला होता.

“मला अजूनही स्पष्टपणे आठवते, तिची लहान मुलगी चिखल खेळत होती आणि कदाचित भुकेपोटी तो चिखल आपल्या तोंडात टाकत होती. मी तिच्या आईला समजावून सांगितले की अशाने पोरगी आजारी पडेल. पण तिने माझे काहीच ऐकले नाही.”

तिने आपल्या मुलीला तीन दिवसांपासून मासे आणि भात खाऊ घालण्याचे आश्वासन दिलं होतं. पण ‘माझ्याकडे आता पैसेच नाहीत’ असे ती म्हणत होती.

त्या बाईने घोष यांना विचारलं,

“जेवढे पैसे होते तेवढ्याचा भात घेतला. आता मासे कसे घ्यायचे? तुम्ही तरी मला सांगाल का?”

या आणि अशा अनेक अनुभवांनी त्यांना भंडावून सोडले.

ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण स्वतः काहीतरी केले पाहिजे असं त्यांनी ठरवलं. महिला सबलीकरण केल्याशिवाय खेडेगावांमध्ये बदल घडणे अशक्य आहे हे त्यांनी ओळखलं.

कारण महिला कुटुंब घडवू शकतात पण त्याच घरी बसल्या संपूर्ण कुटुंब आपोआपच देशोधडीला लागते असा त्यांचा अनुभव होता. बांगलादेश असो की भारतात सगळीकडे हीच परिस्थिती होती. याच काळामध्ये त्यांना एक अनोखी गोष्ट समजली.

कोलकात्याचा मार्केटमध्ये फिरताना त्यांना समजले की काही लोक मोटर बाईक वरती व्याज देत आहेत.

त्यांना सावकार पाचशे रुपये उधार देतात . परत करताना मात्र त्यांना पाच रुपये जास्तीचे द्यावे लागतात. वरवर जरी हा आकडा छोटा वाटत असला तरी हे नगण्य कर्ज घेणारी व्यक्ती तब्बल दर साल दर शेकडा सातशे रुपये व्याज भरत असते.

इतक्या प्रचंड दराने व्याज भरण्याची अशी काय गरज या लोकांना वाटत होती, यावर घोष यांनी विचार करणे सुरू केले.

लवकरच त्यांना याचे उत्तर मिळाले. अतिशय कमी वेळामध्ये मिळणारा पैसा आणि कोणतीही कागदपत्रे न दाखवता मिळणारी रक्कम ही या व्यवसायाची बलस्थाने होती.

सामान्य माणसाला ही सोयीची व्यवस्था होती. त्यांना त्यांची कर्ज बसल्याजागी मिळत होती. जर मी एखादी बँक सुरू केली आणि त्यांना पाच रुपये परत मागण्याऐवजी फक्त एकच रुपया परत मागितला तर हे लोक अर्थातच कर्जासाठी माझ्याकडे येणार होते . शिवाय उरलेल्या चार रुपयांचा विनियोग तो माणूस त्याच्या व्यवसायासाठी करणार होता. याने त्याचा फायदा होईल असा विचार घोष यांनी केला. यातूनच त्यांना या बँकेची कल्पना सुचली.

सध्या करत असलेली नोकरी सोडून आपण एक लघुउद्योगांना कर्ज देणारी गैरसरकारी संस्था स्थापन करणार आहोत असं त्यांनी आपल्या बायकोला सांगितलं.

सोन्यासारखी नोकरी सोडून आपला नवरा अशा धोकादायक उद्योगांमध्ये पडणार हे ऐकून त्यांच्या पत्नी नीलिमा यांना धक्का बसला. बरेचसे नातेवाईकही हे ऐकून त्यांना वेड्यात काढू लागले.

त्यांना त्यावेळी महिना पाच हजार रुपये इतका पगार होता. मेव्हन्याने सुद्धा त्यांना असे न करण्यासाठी सल्ला दिला. पण ते आपल्या निर्णयावर कायम राहिले.

प्रत्येकाला वाटत होते की ती या कामात सपशेल फेल होतील. पण त्यांना व त्यांच्या बायकोला योजना यशस्वी होईल यावर ठाम विश्वास होता.

काही दिवसांनी घरात खाण्यापिण्याचेही हाल सुरू झाले. लवकरच त्यांना उमजुन चुकले की गरिबांना कर्जाऊ पैसे देण्यासाठी एखादी संस्था काढायला कुणीही समोर येणार नाही. पण या कामांमध्ये पुढे जाऊन किती फायदा आहे ते त्यांनी ओळखलं होतं. म्हणून ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले.

वेगवेगळ्या बँका आणि अर्थपुरवठा करणाऱ्या संस्था यांच्यामध्ये जाऊन जाऊन ते थकले. कोणतीही संस्था त्यांना एवढे पैसे कर्जाऊ देण्यास तयार नव्हती. शेवटी त्यांनी आपल्या मित्र परिवाराकडून पैसे जमा करणे सुरू केले.

“माझी सुरुवातीचे योजना होती की फक्त दोन लाख रुपये जमवायचे – एक संस्था उभारायची – तिच्या मार्फत गरिबांना पैसे द्यायचा एवढीच होती. आणि हा पैसा गरीब लोकांना वाटल्यानंतर ही त्यातून नफा कमावला जाऊ शकतो हे मला बँकांना दाखवून द्यायचं होतं. पण हीे दोन लाख रुपयांची रक्कम द्यायलाही कुणी तयार नव्हते.”

घोष जुन्या आठवणी सांगतात.

शेवटी काही लोकांकडून मदत घेऊन त्यांनी कसेबसे काही पैसे उभे केले. अजूनही या कामासाठी दहा हजार रुपयांची गरज होती. शेवटी त्यांच्या बायकोने म्हणजे नीलिमा घोष यांनी त्यांना मदत केली.

आपल्याकडे असणारे गुंतवणूक म्हणून ठेवलेले शेवटचे दहा हजार रुपये त्यांनी आपल्या पतीकडे सुपूर्त केले. यातूनच बंधन या संस्थेची सुरुवात झाली.

2001 साली त्यांनी सुरू केलेला हा प्रकल्प याच तुटपुंज्या रकमेवरती सुरू होता. शेवटी सप्टेंबर 2002 मध्ये स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया या संस्थेने त्यांना वीस लाख रुपये कर्जाऊ देऊ केले. पण यासाठी त्यांचे संस्था एनजीओ वरून एनबीएफसी म्हणजे नॉन बँकिंग फिनान्शियल कंपनी म्हणून नोंदणीकृत करणे गरजेचे होते.

हे सर्व सोपस्कार पार पाडून त्यांनी आपली संस्था मोठी करण्यास सुरुवात केली. पण जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी त्याला बँकेचे स्वरूप देण्याची गरज होती.

स्मॉल इज ब्युटीफुल अशी आपल्याकडे म्हण आहे. परंतु घोष यांच्या मतानुसार बिग इज नेसेसरी!

भारतात तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला की तुमच्या संस्थेला आणि पर्यायाने लोकांनाही त्याचा फायदा होतो. म्हणून त्यांनी बंधन या संस्थेला बँकेचे स्वरूप देण्याचे ठरवले.

परंतु यासाठी त्यांच्यासमोर आव्हान होते ते कुशल मनुष्यबळ जमा करण्याचे.

बँकेचे काम पाहण्यासाठी अनेक लोक मोठ्या आकड्याचे पगार घेत. म्हणून घोष यांनी एक शक्कल लढवली. त्यांनी जाहिरात देतानाच पदवी पात्रता आणि मार्गांच्या सगळ्या अटी काढून टाकल्या.

“मला बारावी झालेली आणि तेही काठावर पास झालेली मुले बँकेच्या कामासाठी हवी आहेत. तुमचे वय 23 च्या आसपास असावे. फक्त गरजू लोकांनीच अर्ज करावा”
अशी जाहिरात त्यांनी दिली.

स्वतः वाईट आर्थिक परिस्थितीतून आलेले लोकच खऱ्या अर्थाने तुमच्या कामाला हातभार लावू शकतात हा त्यांचा विश्वास होता. अशी अनेक मुले त्यांना भेटली. या सर्व लोकांच्या मदतीने त्यांनी बंधन बँकेचा कारभार पाहायला सुरुवात केली. आजही हे सगळे लोक त्यांच्याबरोबर आहेत.

याच बारावी शिकलेल्या लोकांच्या भरवश्यावर बंधन बँक मोठी होऊ शकली, असे ते अभिमानाने सांगतात.

या बँकेने प्रामुख्याने महिला उद्योजकांना कर्ज द्यायला सुरुवात केली. भाजी विकणाऱ्या महिला, हातगाडी चालवणाऱ्या महिला असे यांचे सुरुवातीचे ग्राहक होते.

2009 साली संस्थात्मक कार्यवाही पूर्ण करून या बँकेचे स्वरूप बदलत गेले. 2013 मध्ये भारताच्या रिझर्व बँकेने बंधन या संस्थेला देशाच्या इतर भागांमध्येही बँक म्हणून काम करण्यास मान्यता दिली.

ही देशातील पहिली अशी बँक होती जिला लघुउद्योजकांना कर्ज देणार्‍या संस्थेचे पासून बँक बनण्याचा बहुमान मिळाला होता. या स्पर्धेमध्ये त्यांच्याविरुद्ध l&t, बिर्ला, बजाज अशा मोठमोठ्या कंपन्या होत्या.

मात्र रिझर्व बँकेने बंधन बँकेच्या ग्राहकांवर विश्वास टाकला आणि त्यांनाच बँक काढण्याची अनुमती देऊ केली. शेवटचे लायसन्स मिळण्यासाठी जून 2015 उजाडावे लागले.

याच्या दोन महिन्यानंतर बंधन बँकेने आपले काम सुरू केले. आज देशभरात सर्वाधिक वेगाने वाढणारी म्हणून बंधन बँक प्रसिद्ध आहे.

आज देशभरात 800 हून जास्त शाखा आणि 400 पेक्षा जास्त एटीएम मशीन असणारी बंधन बँक वेगाने पुढे जात आहे. एक कोटींपेक्षा जास्त ग्राहक असणारी ही भारतातील अग्रगण्य बँक म्हणून प्रसिद्ध पावली आहे.

आत्तापर्यंत या बँकेने 23 हजार 500 कोटी रुपयांचा अर्थपुरवठा वेगवेगळ्या ग्राहकांना केला आहे. यातील जवळपास नव्वद टक्के लोक हे लघुउद्योजक आहेत.

लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना हात घालून एखादा सामाजिक प्रश्न सोडवताना तुम्ही चांगला व्यवसाय करू शकता हेच बंधन बँकेने सिद्ध केले आहे. येत्या काळात भारताचा मानव विकास निर्देशांक कसा वाढवावा या वरती काम करण्याचा बँकेचा प्रयत्न असेल. या कामातही ही संस्था यशस्वी होईल यात शंका नाही.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Deepak patil says

    Bandhan Bank …I like Ghosh sir

Leave A Reply

Your email address will not be published.