खरचं बांग्लादेशच्या GDP चा ग्रोथ रेट आपल्यापेक्षा जास्त झालाय का..?

मागील ३-४ दिवसांपासून बांग्लादेशने दरडोई उत्पन्नात भारताला मागे टाकले, बांग्लादेशची चांगली कामगिरी अशा आशयाच्या अनेक बातम्या आपण पाहत आहे.

पण खरचं असं झालयं का?

तर लेखाच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगतो की दरडोई उत्पन्न हे एखाद्या अर्थव्यवस्थेची स्थिती जाणून घेण्याचे एकमेव साधन नसते. तर अनेक साधनांपैकी एक असते.

आज बांग्लादेशची अर्थव्यवस्था ही ससा कासवाच्या शर्यतीमधील कासव ठरले आहे. म्हणजे साधारण मागील पाच वर्षांपासून बांग्लादेशच्या अर्थव्यवस्थेच कासव हळू हळू पुढे सरकत होतं. आणि मागच्या चार दिवसांमध्ये ते अचानक भारताच्या शर्यतीमध्ये आले.

आजवर शेजारी असला तरी बांग्लादेशच्या अर्थव्यवस्थेची इतकी जास्त तुलना किंवा उदाहरण भारतात कधीच दिले जात नव्हते.

२०१३ मध्ये भारताचा जीडीपी एक हजार ४४९.६१ डॉलर इतका म्हणजेच बांग्लादेशच्या ९८१.८४ डॉलरपेक्षा ४० टक्के अधिक होता. पण बांग्लादेशच्या जीडीपीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दर वर्षी बांग्लादेशच्या जीडीपीमध्ये ९.१ टक्क्यांनी वाढ होत आहे.

भारताच्या जीडीपीवाढीचा याच काळातील दर ३.२ टक्के इतका आहे. यामुळेच भारत आणि बांग्लादेशमधील जीडीपीमधील तफावत वेगाने कमी झाली आहे.

जेष्ठ अर्थतज्ञ कौशिक बसु म्हणतात,

आयएमएफच्या अंदाजानुसार दरडोई उत्पन्नामध्ये बांग्लादेश २०२१ मध्ये भारताला मागे टाकेल. उद्योन्मुख अर्थव्यवस्था असलेला देश चांगले काम करत आहेत, ही चांगली बातमी आहे. पण भारतासाठी ही आकडेवारी धक्कादायक आहे. पाच वर्षांपूर्वी बांगलादेश भारतापेक्षा २५ टक्के मागे होता. त्यामुळे देशाला आज ठळक वित्तीय/आर्थिक धोरणाची गरज आहे.

पण वर सांगितल्या प्रमाणे ‘दरडोई उत्पन्न’ हे कोणत्याही देशाची आर्थिक परिस्थिती मोजण्याच एकमेव साधन नाही. कारण ‘दरडोई उत्पन्न’ मोजण्यात लोकसंख्या देखील महत्वाची भूमिका बजावते. बांगलादेशची लोकसंख्या सुमारे १६ कोटी आहे.

तर भारताची लोकसंख्या सुमारे १३५ कोटी. म्हणजे बांगलादेशच्या तुलनेत भारताची लोकसंख्या ८.५ पट जास्त आहे. पण मंडळी भारताकडे राबण्यासाठी बांग्लादेशच्या तुलनेत ८.५ पट हात पण जास्त आहेतच.

उत्पादन क्षेत्रात बांग्लादेश वेगाने प्रगती करीत आहे.

वस्त्रोद्योग क्षेत्रात बांगलादेश चीननंतर दुसर्‍या क्रमांकावर आहे. कापड निर्यातीत वर्षाकाठी १५ ते १७ टक्के दराने वाढ होत आहे. आणि हाच त्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. २०१८ च्या जून महिन्यांपर्यंत कपड्यांची निर्यात ३६.७ अब्ज डॉलर्सवर पोचली.

पुढील वर्षी जेव्हा बांग्लादेशने आपला ५० वा वर्धापन दिन साजरा करणार आहे तेव्हा हे उत्पादन पंतप्रधान शेख हसीना यांनी ५० अब्ज डॉलर्सचे पर्यंत नेण्याचे ध्येय ठेवले आहे.

परदेशात काम करणार्‍या सुमारे २५ लाख बांग्लादेशी लोकांचीही अर्थव्यवस्था वाढविण्यात मोठी भूमिका आहे. त्यांनी परदेशातून पाठवलेल्या पैशात दरवर्षी १८% वाढ होत असून २०१९ मध्ये ही रक्कम १९ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली.

दुसरीकडे, भारतातील उत्पादन क्षेत्रात मागील काही दिवसांमधील सर्वात मोठी घसरण दिसून आली आहे. पहिल्या तिमाहीत उत्पादन क्षेत्राची वाढ -३९. ३ टक्के होती.

हे आणखी सोप करुन आपल्या भाषेत सांगतो.

पुर्वी जर ४ लोकांच्या घरात महिना ५ हजार येत होते. म्हणजे त्यांच दरडोई उत्पन्न १२५० रुपये झाले. तर ८.५ पट जास्त म्हणजे ३४ जणांच्या घरात ८५ हजार येत असतील तर त्यांच दरडोई उत्पन्न २५०० होते. ही झाली बांग्लादेश आणि भारताची ६ वर्षापुर्वीची स्थिती.

आता काय झालयं ?

आता त्याच चार लोकांनी हळू हळू आपल्यातील स्किल वाढवायला सुरुवात केली. आणि त्यामुळे घरात येणारा पगार पण वाढला. त्यामुळे महिना १० हजार यायला लागले. त्यामुळे त्यांच दरडोई उत्पन्न वाढून २५०० हजार झालं. (बांग्लादेशची आजची स्थिती)

त्या तुलनेत ३४ लोकांच्या घरातील काहींनी कामावर जाण बंद केलं, आणखी काही प्रॉब्लेम आले. आणि जे जात होते त्यांचा पगार पण कमी झाला. त्यामुळे महिना ८० हजारच येत आहेत. त्यामुळे दरडोई उत्पन्न पण कमी झाले. ते झालं २३५२ रुपये. (भारताची आजची स्थिती)

त्याच तुलनेत आणखी एक ३७ लोकांच कुटुंब आहे, त्यांचा महिना पगार १.२० लाख आहे. त्यांच्यात कामाला जाणारी संख्या जास्त आहे, कमावणारे हात जास्त आहेत. त्यामुळेच ३४ जणांपेक्षा मोठे कुटुंब असून देखील त्यांचे दरडोई उत्पन्न ३२४० रुपयांच्या आसपास जाते. (चीनची आजची स्थिती)

त्यामुळे देश छोटा असो मोठा. चार जणांचा असो, ३४ जणांचा असो वा ३७ जणांचा. कमावणारे हात कमी असले तरी पगार वाढलाय आणि कमावणारे हात जास्त असून पगार कमी झालाय हे नाकारुन चालणार नाही.

सन २०२० मध्ये बांग्लादेशचा जीडीपी १.८८८ डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे करोनामुळे आर्थिक फटका बसलेल्या भारताचा जीडीपी उणे १०.५ टक्क्यांपर्यंत घसरणार असून ते १.८७७ डॉलरपर्यंत घसरणार असल्याचे सांगितले जात आहे.

पण, भारताची आर्थिक परिस्थिती आता पुढील आर्थिक वर्षात सावरेल असा अंदाज आयएमएफने व्यक्त केला आहे.

त्यामुळे भारताचा जीडीपी बांग्लादेशच्या पुढे जाण्यासाठी सन २०२१ चे आर्थिक वर्षापर्यंत वाट पहावी लागणार आहे. त्यानंतरही अगदी थोड्या फरकानेच भारत बांग्लादेशच्या पुढे असेल.

सन २०२१ मध्ये भारताचा जीडीपी ८.२ टक्क्यांपर्यंत असेल असं सांगितलं जात आहे. तर बांग्लादेशचा जीडीपी ५.४ टक्क्यांपर्यंत असेल. म्हणजेच पुढील आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी हा दोन हजार ३० डॉलर तर बांग्लादेशचा एक हजार ९९० डॉलर इतका असेल. 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.