आणि सयाजी महाराजांनी १०१ सोन्याची नाणी डिपॉजीट भरून बँक सुरु केली

२० जुलै १९०८. बडोदा.

सकाळचे ११ वाजत आले होते. बाजारपेठेतल्या एका छोट्याशा दुकानगाळ्यामध्ये बडोद्यामधली पहिली बँक सुरु होत होती. तिथे सगळ्यांची धावपळ चालली होती. एवढ्यात वर्दी आली,

“महाराज आले, महाराज आले.”

त्या दुकानंगाळ्याच्या समोर एक भला मोठा हत्ती थांबला होता. त्यावरच्या अंबारीतून बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड उतरले. आत पूजा अर्चा सुरु होती. महाराजांनी स्वतःच्या कंबरेला लावलेली थैली काढली. बँकेच्या मनेजरकडे सोपवली. त्या थैलीत १०१ सोन्याच्या नाणी होत्या.

सयाजी महाराजांनी बँक ऑफ बडोदाची पहिलं डिपॉझिट करून बँकेची अधिकृत सुरवात केली होती.

महाराजा सयाजीराव तिसरे हे बडोद्याच्या राजगादीवर १८७५ पासून १९३९ पर्यत बसले. गायकवाड राज घराण्याचे तसे थेट वारस नव्हते, त्यामुळेच सिंहासन त्यांना सहजासहजी मिळालेले नव्हते. विस्तारित गायकवाड घराण्यातील नशिकच्या बुड्क्यात सयाजीराव यांचा जन्म झाला. गायकवाड मुळचे पुण्याचे त्याचे सुरवातीचे आडनाव म्हात्रे असे होते.

मराठा साम्राज्यात तेव्हा पिलाजी राव गायकवाड सेनापती होते. पिलाजी राव गायकवाड यांनी १७२१ ला मुघलांना हरवून बडोदा शहर मराठा साम्राज्याच्या अधिपत्या खाली आणले. त्यानंतर पेशवा बाजीराव पहिले यांनी बडोद्याचे सर्व अधिकार पिलाजी राव यांना देऊन टाकले. तेव्हा पासून गायकवाड घराण्याची सुरवात झाली.

१८७० साली बडोदाच्या तत्कालीन महाराज खंडेराव गायकवाड यांचे निधन झाले. त्यानंतर पाच वर्ष चाललेल्या सत्ता संघर्षात सयाजीराव हे नाट्यमयरित्या बडोद्याचे महाराज झाले. १८ जून १८७५ साली सयाजीराव गादीवर बसले खरे पण वय लहान असल्याने ते सत्ता चालवत नव्हते.

पाच वर्ष त्यांनी टी. माधवराव यांच्या देखरेखीत प्रशासन चालवण्याचे धडे गिरवले. २८ डिसेंबर १८८१ साली अखेर सर्व सत्ता सयाजीराव यांच्या हाती आली. सयाजीराव तरुण होते पाच वर्षात चांगलाच अनुभव त्याच्याकडे आला होता. या नव्या महाराजाला त्याच्या राज्यात अनेक बदल करायचे होते एक आधुनिक, आदर्शवादी राज्य त्याला बनवायचे होते.

कारभार हाती येताच सयाजीराव यांनी तळागाळातील लोकांना वर काढण्यासाठी काम करण्यास सुरवात केली. गरिबांसाठी मोफत शाळा शैक्षणिक संस्था चालू केल्या. न्यायव्यवस्था दुरुस्त केली. शेती आणि सामाजिक विषयातील जाचक नियम बंद करून सर्वाना सोयीस्कर असे नवीन नियम बनवले.

बडोद्यात महाराजांनी बाल विवाह बंद केले, घटस्पोटाचा कायदा आणला. अस्पृश्यता संपुष्टात आणण्यासाठी महाराजांनी प्रयत्न केले. महाराज काळाच्या पुढचा विचार करणारे होते त्यामुळे त्यांनी बहुजनांना संस्कृत शिकण्याची सोय केली त्याच बरोबर ललित कलेला ही महाराजांनी महत्व दिले. महाराजांना कलेची जाण होती त्यांनी भारतीय शास्त्रीय सांगितला त्यांच्या कार्यकाळात अत्यंत महत्व दिले. महाराजांनी रेल्वे, धरण आणि विद्यापीठांची पायाभरणी  केली होती.

 ते देशातील पहिला राज्यकर्ता होते ज्याने प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. देशातील अद्यावत असे ग्रंथालय महाराजांचे होते. आपण गुजरात मधील मराठा राज्यकर्ते आहोत याची महाराजांना जाण होती.त्यामुळे लोकांना आधुनिकते कडे गेऊन गेले पाहिजे पुरोगामी बदल आत्मसात करणारा समाज आपल्याला बनवला पाहिजे हे महाराज जाणून होते.

या सर्व बरोबरच महाराजांनी आणखी एक महत्वाची गोष्ट उभी केली ती म्हणजे बँक ऑफ बडोदा.

कोणताही राजा त्याकाळी बँक वगेरे काढत नसे पण हा सयाजीराव यांची दूरदृष्टी होती की त्यांनी अर्थकारणाला चालना देण्यासाठी बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून शाश्वत दिशेनी पावलं टाकली.

महाराजांच्या डोक्यात बँकेचा विचार येताच त्यांनी गुजरात मधील बड्या व्यावसाईकाना विश्वासात घेतले. त्यात संपतराव गायकवाड , राल्फ व्हाईटन्याक , विठलदास ठाकरसी, तुलसीदास कालीचंद आणि एन.एम.चोक्सी हि सर्व मंडळी होती तत्कालीन गुजरातचे अर्थकारण याच लोकांभोवती फिरत होते त्यामुळे चाणाक्ष महाराजांनी आधी यांना बरोबर घेतले आणि मग २० जुलै १९०८ साली महाराजांनी बँक ऑफ बडोदाची स्थापना केली.

बँकेचे पहिली शाखा मांडवी (बडोदा) मध्ये उघडली गेली. दोनच वर्षात बँकेने दुसरी शाखा अहमदाबाद इथे काढली. त्यानंतर मुंबई ,कलकत्ता आणि दिल्ली इथे बँकेने शाखा काढल्या. बँक खऱ्या अर्थानी वाढली ती दुसर्या महायुद्धानंतर.  १९५३ मधेच बँकेने हिंदी महासागर ओलांडून केनिया आणि युगांडा या देशात रहाणार्या भारतीयांसाठी मोंबासा आणि कम्पाला या दोन्ही ठिकाणी स्वतःच्या शाखा काढल्या.लगेच पुढचाच वर्षी बँकेने केनियाची राजधानी नैरोबी आणि टांझानिया या ठिकाणी हि शाखा काढल्या.

१९५७ मध्ये बँकेने मोठा धाडसी पाउल घेतले ते म्हणजे लंडन मध्ये शाखा काढण्याचा.लंडन त्याकाळी जगाचे आर्थिक केंद्र होते. सन १९५८ मध्ये बँक ऑफ बडोदाने पहिली बँक कलकत्त्यातील ‘हिंद बँक’ अधिग्रहित केली.

१९६१ मध्ये महाराष्ट्रात चांगल जाळं असणारी ‘न्यू सिटीजन बँक ऑफ इंडिया’ ही बँक अधिग्रहित केली. त्याच वर्षी मोरेशियास आणि फिजी या देशांमध्ये बँकेने काम चालू केले. असं करत करत बँकेची भारतात आणि भारता बाहेर घौडदौड चालूच राहिली.

१९ जुलै १९६९ साली इंदिरा गांधी सरकारने बडोदा बँके सह एकूण तेरा मोठ्या बँकांचे राष्ट्रीयकरण केले.

१९७४ मध्ये बँकेने अबू धाबी आणि दुबई मध्ये काम चालू केले आणि मध्य पूर्व मध्ये हि स्वतःचे स्थान बळकट केले. कालानुरूप बँक संधी दिसेल तिथे कामकाज सुरु करू लागली आणि स्वतःचे पंख पसरत राहिली.

साल होते १९९६ बँकेने एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे कॅपिटल मार्केट मध्ये उतरण्याचा आजही भारत सरकार ची ६६ टक्के भागीदारी या बँकेत आहे. जगभरात पसरलेल्या गुजराती व्यापार्यांनी या बँकेला भारता बाहेर वाढवले

१७ सप्टेंबर २०१८ साली सरकारने देना आणि विजया या दोन्ही बँकांना बँक ऑफ बडोदा मध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव मांडला त्याला २ जानेवारी २०१९ अखेर कॅबिनेटने मान्यता दिली. या विलीनीकरणामुळे बँक ऑफ बडोदा स्टेट बँक आणि HDFC नंतरची भारतातली सर्वात मोठी बँक झाली.

महाराज सयाजीराव गायकवाड यांनी लावलेल्या रोपट्याचा आज एक वटवृक्ष झाला आहे, असंच म्हणावे लागेल आज घडीला बँकेच्या एकूण शाखा ९५०० पेक्षा जास्त आहेत. १३४०० ATM आहेत तर एकूण ८५००० लोकं बँकेत काम करतात.  जगभरात आज जवळपास बारा लाख ग्राहक आहेत. बँक आज CSR फंडा मार्फत महाराजांचा सामाजिक कामाचा वारसा ही जपत आहे. CSR अंतर्गत समाजातील दुर्बल घटकांसाठी काम करत आहे,बडोदा अमादमीच्या माध्यमातून अनेक ट्रेनिंग प्रोग्रॅम बँक आयोजित करत असते.

२०१९ च्या फोर्ब्सच्या ग्लोबल २००० बँकांच्या यादीत बँक ऑफ बडोदाचा ११४५ वा नंबर आहे. बँकेची एकूण मालमता आजच्या घडीला तीन खरब रुपयांपेक्षा जास्त (3 trillion rupees) आहे. नुकतीच या बँकेला ११४ वर्ष पूर्ण झाले आहेत.  सयाजीराव गायकवाड यांनी रचलेल्या मजबूत पायावरच बँक ऑफ बडोदा इथवर पोहचू शकली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.