देशात एकीकडे बँका बंद पडत असताना त्यांनी हट्टाने ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ उभी केली

मागील काही दिवसात आलेली आर्थिक मंदी, नोटबंदीचं संकट, लॉकडाऊन यामुळे बँकिंग क्षेत्राला हादरे बसले आहेत. लॉकडाऊनचे तर जगातील बँकावर परिणाम जाणवले. काही भारतीय बँकानीही गटांगळ्या खाल्ल्या.

मात्र या आर्थिक संकटात आपल्या देशात ज्या काही बँका तरल्या आणि नुसत्या तरल्या नाहीत तर त्या मजबूत स्थितीत आहेत, त्यात सर्वात आघाडीची बँक म्हणजे

बँक ऑफ महाराष्ट्र.

बँक ऑफ महाराष्ट्राच्या बाबतीत एक गोष्ट सांगायची म्हंटल तर ही एक अशा काळात स्थापन झालेली बँक आहे, ज्या काळात देशभरात एकीकडे चालू असलेल्या बँका बंद पडत होत्या. ज्या होत्या त्या लयास लागल्या होत्या. पण तशा काळात देखील ११ मराठमोळ्या माणसांनी हट्टाने ही बँक उभी केली होती.

तसं पाहिलं तर बँक ऑफ महाराष्ट्र ही काही पहिली व्यावसायिक बँक होती का? तर नाही. १८०६ मध्ये स्थापन झालेली ऐतिहासिक बँक ऑफ बेंगोल ही देशातील पहिली तर १८४० साली स्थापन झालेली ‘बँक ऑफ बॉम्बे’ ही महाराष्ट्रातील पहिली व्यवसायिक बँक होती.

पुढे मुंबईबाहेर १८८९ साली ‘बँक ऑफ पुना’ ही व्यवसायिक बँक स्थापन झाली, त्यानंतर १८९० साली ‘डेक्कन बँक’ आणि १८९८ साली ‘बॉम्बे बँकिंग कंपनीची’ स्थापना झाली.

मात्र २० व्या शतकाच्या सुरुवातीला पहिले महायुद्ध सुरू झाल्यानंतर जगाला प्रचंड मोठ्य मंदीला सामोरं जावं लागलं. त्यात भारताल्या बॅंकांचं पण मोठं नुकसान झालं. याचा दुरगामी परिणाम झाला आणि तो पुढचे जवळपास २० वर्ष जाणवत होता.

१९१४ ते १९३५ या दरम्यान देशात जवळपास ३८० बँका डबघाईला येवून बंद पडल्या होत्या. विशेष गोष्ट म्हणजे त्यातल्या तब्बल ५४ बँका या बॉम्बे प्रांतामधील होत्या. देशात एकीकडं अशा प्रकारे बँका बंद पडत होत्या. मंदीच सावट हटत नव्हतं.

तर दुसरीकडे या सगळ्या नकारात्मक परिस्थितीत देखील नव उद्योगांना चालना देणारे आणि पत्रकार, समाजसेवक, लेखक असं सगळंच काही असलेले आत्माराम रावजी भट यांना मात्र एक आशेच किरण दिसू लागला होता. ते अर्थव्यवस्थेमध्ये नवीन उद्योग आणि बँकिंग क्षेत्र उदयास येऊ लागले आहेत असा दावा करत होते.

त्यातुनच १९३४ साली भट यांच्या नेतृत्वात पुण्यात ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ (एमसीसी) ची स्थापना करण्यात आली. काहीच दिवसातच त्यांनी लोकमान्य टिळकांच्या आठवणीत प्रकाशित होणाऱ्या केसरी वृत्तपत्राच्या विशेष अंकामधून बॉंम्बे प्रांतात असलेल्या बँकिंग सेवांचा व्यापक आढावा घेण्यास सुरुवात केली.

सहकार चळवळीचे प्रणेते आणि भट यांचे मित्र व्ही. पी. वर्दे यांनी भट यांच्या मनात नेमकं काय चालू आहे हे ओळखलं त्यांनी थेट महाराष्ट्रासाठी स्वतंत्र बँक स्थापनेची गरज का आहे? या विषयावर केसरी वृत्तपत्राच्या विशेष अंकामध्ये लेख लिहिला आणि या विषयावर सार्वजनिक चर्चासत्र देखील सुरु केले.

मात्र वर्दे यांच्या लेखाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही, पण तरी देखील भट यांनी व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील नेत्यांसोबत या विषयावर चर्चा सत्र चालू ठेवले.

फेब्रुवारी १९३५ मध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स कडून ‘पुण्यातील व्यवसाय आणि उद्योग’ हि परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत मराठा चेंबर आणि त्याचे संचालक महाराष्ट्र साठी स्वतंत्र बँक हा मुद्दा उचलून धरतील याची योग्य व्यवस्था भट यांनी करून घेतली.

परिषदेत बोलताना भट यांनी महाराष्ट्रातील व्यापार आणि उद्योगाला भांडवल पुरविण्यासाठी, संयुक्त साठा व्यवसायायिक बँक स्थापन करणे कसे आवश्यक आहे हे समाजावून सांगितले.

त्यामुळेच मराठा चेंबरने या बँकेच्या बाजूने आवश्यक ती सर्व चौकशी करून अशा स्वरुपाच्या अस्थायी बँकेवर योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली आहे. महाराष्ट्रामधील व्यावसायिक संघटना अशा प्रयत्नांना सहकार्य करण्यास उत्सुक आहेत. असे ते म्हणाले. हा विषय ते हट्टाने पुढे नेत होते.

त्यांच्या या योजनेचा तपशीलवर अभ्यास करण्यासाठी एमसीसीने एका उप-समितीची स्थापना केली ज्यामध्ये व्ही. जी. काळे, डी.के.साठे, एन.जी.पवार, जी.डी.आपटे आणि ए. आर. भट यांचा समावेश होता.

समितीची पहिली बैठक १९ मे १९३५ रोजी केसरी – मराठा कार्यालयाच्या विचारविनिमय कक्षामध्ये पार पडली. यात समितीच्या सदस्यांसह शहरातील बाबासाहेब कामत, एमसीसीसीचे तत्कालीन अध्यक्ष जे. एस. करंदीकर, राजाभाऊ गोडबोले, गोविंदराव पंडित, दामूअण्णा पोतदार, एस.आर.सरदेसाई, बाबुराव गोखले, आणि एन.एन. क्षीरसागर यांनीही चर्चासत्रामध्ये भाग घेतला.

२७ मे १९३५ रोजी केसरी – मराठा कार्यालयाच्या सभेच्या हॉलमध्ये मोठ्या प्रमाणावर हजर असलेल्या सार्वजनिक प्रतिनिधींसह उपसमितीची दुसरी सभा झाली, ज्यामध्ये प्रस्तावित बँकेच्या मंडळावरील संचालकांची संख्या ११ असेल असे ठरवण्यात आले.

तसेच प्रत्येक शेअरची किंमत ५० रुपये आणि संचालक होण्यासाठी प्राथमिक अट म्हणजे किमान ५०० समभाग घेणे आवश्यक अशा काही नियमावली ठरवण्यात आल्या. रघुनाथराव सोहानी यांनी यासंबंधीचा ठराव मंजूर करुन घेतला.

बँकेच्या संस्थापन समयलेख आणि नियमावली यावर १९ प्रवर्तकांनी सही केली.

१६ सप्टेंबर १९३५ च्या शुभ दिवशी बँकेची औपचारिकपणे भारतीय कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणी करण्यात आली.

८ फेब्रुवारीला पुण्यात पहिली शाखा स्थापन करुन प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर बँकेची घौडदौड यशस्वीपणे सुरु झाली. १९३८ ला मुंबईत दुसरी शाखा सुरु करण्यात आली. १९४० ला पुण्यातच तिसरी शाखा उघडली. १९४४ मध्ये शेड्युल्ड बँकेचा दर्जा मिळाला.

अवघ्या १० वर्षात १ कोटींच्या ठेवी बँकेत जमा झाल्या. १९४६ साली म्हैसूरमध्ये महाराष्ट्राच्या बाहेर पहिली शाखा चालू झाली. १९६६ पर्यंत आंध्रप्रदेश, गोवा, मध्यप्रदेश, गुजरात या आणखी चार राज्यांमध्ये बँकेचा विस्तार झाला.

१९६९ मध्ये जेव्हा इंदिरा गांधींनी १४ बँकाच्या राष्ट्रीयकरणाचा निर्णय घेतला त्यात बँक ऑफ महाराष्ट्रचा देखील समावेश होता. १९७४ मध्ये १०० कोटींच्या ठेवी मिळवणाऱ्या काही निवडक बँकापैकी एक बँक ठरली. पुढे अवघ्या ४ वर्षामध्येच ५०० कोटींच्या ठेवीचा टप्पा गाठला. तसेच त्याच वर्षी पुण्यात आज दिसत असलेल्या मुख्य शाखेच्या इमारतीच उद्घाटन करण्यात आलं.

१९७५ ते १९९५ हा बँकेसाठी सुवर्ण काळ होता. या दरम्यान बँकेने आपल्या जवळपास १००० शाखा सुरु करण्याचा विक्रम केला. तसेच ५००० कोटी रुपयांच्या ठेवी असणारी देशातील अग्रगण्य बँक बनली होती. पुढे देखील बँकेने आपला आलेख चढता ठेवला.

२००४ मध्ये बँक शेअर मार्केटला लिस्टेड करण्यात आली. २०१२ पर्यंत १ हजार ६२४ व्या शाखेचे आणि तब्बल १ लाख ५० हजार कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पुर्ण केला.

बँकेचा सध्याचा पसारा जर बघायचा म्हंटलं तर जवळपास दिड कोटी ग्राहकांसह देशातील आघाडीच्या बँकापैकी एक झाली आहे. बँकेच्या आज १ हजार ८७४ शाखा कार्यरत आहेत. तसेच २ लाख ६६ हजार कोटी रुपयांचा व्यवहार करणारी सर्वात मोठी बँक ठरली आहे.

या दरम्यान बँकेला अनेक अडचणींचा सामना करावा लागला असणार यात शंकाच नाही. पण या सगळ्या अडचणींवर मात करत आत्माराम भट यांच्या हट्टातुन आणि काळे-साठे जोडीच्या पुढाकारातुन स्थापन झालेली बँक आज तब्बल ८७ वर्षांनंतर देखील बँक अगदी मजबूत स्थितीमध्ये उभी आहे.

हे ही वाच भिडू 

1 Comment
  1. BOM.must be live as govt.u/t. 1967 my grand father borrows loan for faramwell since we joined BOM.
    OUR pray to god Bank of maharashatra must be live.its fully services faramers economic progress.

Leave A Reply

Your email address will not be published.