स्वत:चा पराभव पाहिलेल्या बंटी पाटलांनी गेल्या ६ वर्षात ४ आमदार निवडून आणलेत

पुणे पदवीधर किंवा शिक्षक मतदारसंघापैकी कोणतीही एक जागा काँग्रेसकडे घ्या निवडून आणण्याची जबाबदारी माझी, विधानपरिषदेत काँग्रेसच संख्याबळ मी वाढवून देतो.

काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांकडे बंटी पाटलांनी जाहिररित्या ही मागणी केली आणि आज  जयंत आसगावकरांना पुणे शिक्षक मतदारसंघातून निवडून आणून आपला शब्द सुद्धा खरा करून दाखवला.

२०१४ च्या विधानसभेत स्वतः निवडून येऊ न शकणारे बंटी पाटील आज ‘ठरवून’ आमदार निवडून आणत आहेत.

त्यांनी पुणे शिक्षक मतदारसंघ जिंकत प.महाराष्ट्रात काँग्रेसला मजबूत केलंच आहे पर्यायाने स्वतःची देखील ताकद वाढवली आहे. 

भारत काँग्रेसमुक्त करायची घोषणा २०१४ साली भाजपने केली होती, २०१४ च्या लोकसभेत भारत कॉंग्रेसमुक्त झाला आणि २०१४ च्याच विधानसभेत कोल्हापूर जिल्हा कॉंग्रेसमुक्त झाला.  १० आमदार असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातून काँग्रेसला एकही आमदार निवडून आणता आला नाही, स्वतः बंटी पाटलांचा देखील घरच्या मतदारसंघात पराभव झाला.

हा पराभव का झाला या मागचा इतिहास सगळ्यांना माहित आहे, पण आज परिस्थिती बदलली आहे. 

राजकारणात स्वतः निवडून येणारा माणूस आमदार-खासदार होतो पण ज्याला नेता व्हायचं असतं त्याने आमदार-खासदार निवडून आणायचे असतात. बंटी पाटलांच्या राजकारणाच्या स्टाईलबद्दल कोल्हापूरचे कार्यकर्ते सांगतात कि निवडणूक जिंकू किंवा हरूदेत निकालाच्या दुसऱ्या दिवशी बंटी पाटील पुन्हा कामाला सुरुवात करतात.

२०१४ ला विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांनी लगेच आवाहन दिलं होत कि, मला आता हरवलं असलं तरी येणारी कोल्हापूर महानगरपालिका मीच जिंकणार. आपला तो शब्द खरा करत कोल्हापूर महानगरपालिकेत आपला महापौर बसवण्यात बंटी पाटील यशस्वी झाले.

२०१५ च्या विधानपरिषदेत महादेव महाडिकांसारख्या अनुभवी नेत्याला हरवून एका वर्षातच स्वतः पुन्हा विधानभवनात गेले. एका बाजूला भाजप, दुसरीकडे महाडिक गटाचा टोकाचा विरोध आणि काँग्रेसमधील अंतर्गत विरोध या सगळ्याचा सामना करत बंटी पाटलांनी आपला गट वाढवायला सुरुवात केली. 

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे ६ , भाजपचे २ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे २ आमदार निवडून आले.

राष्ट्रीय पक्ष असणाऱ्या काँग्रेसला शून्य जागा मिळाल्या.

कोल्हापूर जिल्हा काँग्रेसला नेतृत्व नसणे, प्रत्येक नेत्याचा आपापसातील वाद हे मुद्दे बघता कमीत कमी कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा काँग्रेसला जागा मिळतील याची शक्यता कमी झाली होती.

पण नेमक्या याचवेळी बंटी पाटील ‘नेता’ म्हणून पुढे यायला सुरुवात झाली. स्वतःचा गट बळकट करायला सुरुवात केलीच पण कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपद स्वतःकडे घेऊन पक्षालासुद्धा ताकद दिली. 

२०१९ लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मुन्ना महाडिकांचा पराभव शिवसेना उमेदवाराने केला, आघाडीधर्म मागे ठेवून आपला वैयक्तिक हिशोब पूर्ण करण्यासाठी बंटी पाटलांनी शिवसेनेला मदत केली.

शिवसेनेने लोकसभा बंटी पाटलांच्या मदतीने जिंकली मात्र त्या निकालावेळीच त्यांनी घोषणा केली कि २०१९ विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर शहरातले दोन्ही आमदार काँग्रेसचेच असणार.

कोल्हापूर दक्षिण या आपल्या हक्काच्या मतदारसंघातून त्यांनी आपल्या पुतण्याला विधानसभा निवडणुकीत उभा केले तर कोल्हापूर दक्षिण मधून चंद्रकांत जाधव या कोणतीही काँग्रेसची पार्श्वभूमी नसणाऱ्या कार्यकर्त्याला काँग्रेसचे तिकीट दिले.

भाजप, शिवसेना आणि स्थानिक विरोध यांचा सामना करत बंटी पाटलांनी या दोन्ही जागेवर विजय मिळवून दाखवला.

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघात देखील गेल्या २ विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसचा पराभव केला होता, याठिकाणी सुद्धा लक्ष घालून बंटी पाटलांनी काँग्रेसच्या राजू आवळेंना निवडून येण्यास मदत केली.

करवीर मतदारसंघ सुद्धा २०१९ ला पी.एन.पाटलांनी काँग्रेसला जिंकून दिला. पी.एन.पाटलांचे हे यश मात्र त्यांचे व्यक्तिगत यश ठरते.

जयंत आसगावकरांना पुणे शिक्षक मतदारसंघातून हट्टाने उमेदवारी बंटी पाटलांनी मागून घेतली होती, आपली सर्व ताकद पणाला लावून आज पाच जिल्ह्यातून बंटी पाटलांनी हा उमेदवार निवडून आणला आहे.

बंटी पाटील स्वतः विधानपरिषदेचे आमदार आहेत, २०१९ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला कोल्हापूर जिल्ह्यात ४ जागांवर विजय मिळाला आहे. २०१४ साली जिल्ह्यात ० आमदार असणाऱ्या काँग्रेस पक्षाचे आज ६ आमदार आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेस नेते म्हणून नक्कीच हि आकडेवारी बंटी पाटलांची ताकद वाढवणारी आहे.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.