गोल्डमॅन ने एकदा भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती

देशातील संगीत रसिकांसाठी फेब्रुवारी महिना अतिशय दु:खाचा ठरतोय, अलीकडेच लता मंगेशकर यांचे निधन झाले, अन त्यानंतर संगीत जगतातून एक दुःखद बातमी समोर आली ती म्हणजे प्रसिद्ध संगीतकार आणि गायक बप्पी लहिरी यांचे निधन. काल रात्री मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांचे निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते…

बप्पी दा यांचे खरे नाव आलोकेश लाहिरी आहे. मात्र चित्रपटसृष्टीत आल्यानंतर त्यांनी आपले नाव बदलून बप्पी लाहिरी ठेवले 

बॉलीवूड मध्ये पॉप आणून लोकांना वेड लावणारे बप्पी लहिरी. त्यांनी लहानपणापासूनच संगीताची तयारी सुरू केली. तीन वर्षांचे असतांना त्यांनी तबला शिकायला सुरुवात केली. किशोर कुमार हे त्यांचे मामा होते आणि बप्पी यांना संगीत क्षेत्रात आणण्याचे श्रेय त्यांना जाते. बप्पी लहिरी १९ वर्षांचे असतांना ते कोलकात्याहून मुंबईत आले.

१९७३ ची गोष्ट असेल त्यांना पहिली संधी मिळाली ती म्हणजे ‘नन्हा शिकारी’ चित्रपटासाठी संगीत देण्याचे काम मिळाले. त्यांनी आपल्या पालकांकडून संगीताची शिकवण घेतली. त्यांनी अनेकदा बंगाली चित्रपटांमध्ये गाणी गायली होती. त्यांचे वडील अपरेश लाहिरी बंगाली गायक होते आणि आई बासरी संगीतकार होती. मात्र, बप्पी लाहिरीला ओळख मिळाली ती १९७५ मध्ये आलेल्या ‘जख्मी’ या चित्रपटातून. या चित्रपटात त्यांनी रफी ​​आणि किशोर कुमार यांच्यासोबत गाणी गायली होती….आणि तेंव्हापासून गायक म्हणून ते प्रसिद्ध झाले.

त्यांचा आणखी एक लोकप्रिय किस्सा म्हणजे ते मायकल जॅक्सनचे मोठे फॅन होते.  बप्पी लहिरी हे भारतीय संगीत विश्वातील एकमेव संगीतकार आहेत ज्यांना मायकल जॅक्सनने त्याच्या पहिल्या शोमध्ये आमंत्रित केले होते. हा लाइव्ह शो १९९६ मध्ये मुंबईत झाला होता. हिंदी संगीतात पॉप कल्चर आणण्याचे श्रेय त्यांनाच जाते. त्यामुळे त्यांना त्यावेळेस मोठा विरोधही झाला होता.

संगीत, गायन क्षेत्र सोडलं तर एक गोष्ट अनेकांना लक्षात ती म्हणजे बप्पी लहिरी यांनीही राजकारणात नशीब आजमावले होते. 

२०१४ ची गोष्ट आहे जेंव्हा मोदी लाट सक्रिय होती. दरम्यान बप्पी लाहिरी यांनी राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेंव्हा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह होते. भाजपने त्यांना पश्चिम बंगालमधील श्रीरामपूर लोकसभा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी यांच्या विरोधात तिकीट दिले होते. तसेच या रिंगणात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तीर्थकार रॉय हे देखील होते. बप्पी लाहिरी यांनी निवडणूक लढवली. पक्षाला वाटत होतं मोदी लाट आहे, आणि युपीए-२  सरकारच्या विरोधात लोकांमध्ये असलेला असंतोष आणि यात बप्पी लहिरी त्यांच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेमुळे जिंकून येतील.

असं असलं तरी पण बप्पी लाहिरी यांचं अन राजकारणाचं कधी जमलंच नाही.. 

त्यांना या लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता.  त्यांच्या विरोधात असलेले तृणमूल काँग्रेसचे तगडे उमेदवार कल्याण बॅनर्जी यांनी बप्पी लेहरी यांचा पराभव केला होता. कल्याण बॅनर्जी यांना ५ लाख १४ हजार ९३३ मते मिळाली होती. तर बप्पी लाहिरी यांना २ लाख ८७ हजार ७१२ मते मिळाली होती. बप्पी लहिरी हे तिसऱ्या स्थानावर होते. दुसऱ्या स्थानावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तीर्थकार रॉय होते. त्यांना ३ लाख ६२ हजार ४०७ मते मिळाली होती. 

पण २ लाख ८७ हजार मते घेतलेले बप्पी लहिरी हे निवडणुकीत तर उभे राहिले होते पण त्यांना आलेला पराभवानंतर राजकीय क्षेत्रात फार सक्रियता दाखवलीच नाही. त्यानंतर झालं असं कि, पश्चिम बंगाल भाजपच्या समितीमधून २०१७ मध्ये बप्पी लाहिरी यांना वगळण्यात आले होते. 

याचा मोठ्या मानाने स्वीकार करत बप्पी यांनी राजकारणातून काढता पाय घेतला, आपण केवळ राजनाथ सिंह आणि नरेंद्र मोदी यांच्या प्रभावानेच राजकारणात उतरलो होतो. या दोघांबद्दल मनात आदर आहे बप्पी यांनी त्यावेळी सांगितले होते. राजकारणाला वेळ देता नसल्याने आपली प्रायोरिटी तरी म्युझिक इंडस्ट्रीच आहे असं देखील म्हणाले होते.

एक कलाकार राजकारणात रमलाच नाही… 

त्यानंतर त्यांचं बॉलिवूड, संगीत, गायन क्षेत्रात दिलेलं योगदान आपल्याला माहितीच आहे.  एका रिपोर्टनुसार, १९८६ मध्ये त्यांनी ३३ चित्रपटांमध्ये १८० गाणी गायली. त्यांच्या या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झाली आहे. त्यांना चित्रपट निर्मात्याचा जीवनगौरव पुरस्कारही मिळाला आहे…

बप्पी लहिरी जेवढे त्यांच्या संगीत आणि गाण्यांसाठी ओळखले जात होते, तेवढेच त्यांच्या स्टाईलमुळे देखील फेमस होते. त्यांच्या अंगावर भलेमोठे सोन्याचे दागिने असायचे. गळ्यात सोन्याच्या जाड साखळ्या आणि बोटात जाड-जाड अंगठ्या असायच्या. पण सत्य हे आहे की बप्पी लाहिरी यांना सोन्याची खूप आवड होती आणि ते असं म्हणायचे कि, त्यांना सोनं फार लकी ठरते. आणखी एक म्हणजे बप्पी लहिरी हे उन्हाळा असो वा हिवाळा असो सतत सनग्लासेस घालत असत. 

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.