पुलोदचं मुख्यमंत्रीपद शरद पवारांना नाही तर बापूंना मिळणार होतं..

आणीबाणीनंतरचा काळ होता. इंदिरा गांधी यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. संपूर्ण देशात जनता दलाचे वारे होते. इंदिराजींनी राजकारणात नवख्या असलेल्या संजय गांधी यांचा सल्ला ऐकून देशावर आणीबाणी लादली असे कॉंग्रेसमधल्या जुन्या नेत्यांचे मत होते. या दोन्ही गटात वाद झाल्यामुळे कॉंग्रेस पक्ष फुटला आणि दोन गट तयार झाले.

हे दोन्ही कॉंग्रेस स्वतःला मूळ कॉंग्रेस म्हणवून घ्यायचे. तरी त्यांच्या अध्यक्षांच्या नावावरून ते ते पक्ष ओळखले जायचे. इंदिरा कॉंग्रेस आणि रेड्डी कॉंग्रेस.

१९७८ विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात दोन्ही काँग्रेस स्वतंत्र्यपणे लढल्या. मात्र राष्ट्रीय पातळीवरील जनता दलाच्या लाटेचे पडसाद महाराष्ट्रात देखील पडले होते. त्यांचे सर्वाधिक ९९ आमदार निवडून आले होते. तर रेड्डी कॉंग्रेसचे ६९ आणि इंदिरा कॉंग्रेसचे ६२ आमदार विजयी झाले होते.

कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. अशा त्रिशंकु परिस्थितीमध्ये इंदिरा काँग्रेेेस आणि रेड्डी काँग्रेस यांची आघाडी झाली. रेड्डी कॉंग्रेसकडे मुख्यमंत्रीपद तर इंदिरा कॉंग्रेसकडे उपमुख्यमंत्रीपद अशी विभागणी करण्यात आली. वसंतदादा पाटील पुन्हा मुख्यमंत्री बनले.

आघाडी तर झाली होती पण नासिकराव तिरपुडे सरकारवर आणि मुख्यमंत्र्यांवर सतत टीका करत होते. त्यामुळे इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस यांच्यामधली दरी वाढत होती. त्यामुळे अखेर शरद पवारांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

अखेर १२ जून १९७८ रोजी शरद पवार, सुंदरराव सोळंकी, सुशीलकुमार शिंदे व दत्ता मेघे या चार मंत्र्यांनी राजीनामा दिला. त्यांना ३८ आमदारांचा पाठींबा होता. यशवंतरावांचे कट्टर मित्र व जेष्ठ नेते आबासाहेब कुलकर्णी खेबुडकर व किसन वीर हे त्यांच्या बरोबर होते.

आबासाहेब कुलकर्णी यांनी चंद्रशेखर यांना फोन करून जनता पक्षाच्या पाठिंब्याची व्यवस्था केली.

१९७८ सालच्या जुलै महिन्यात पावसाळी अधिवेशन सुरू असतांना शरद पवार रेड्डी कॉंग्रेसच्या ४० आमदारांना सोबत घेऊन बाहेर पडले.

वसंतदादा पाटलांच सरकार अल्पमतात आले आणि पहिले आघाडी सरकार चार महिन्यात कोसळले.

पवारांनी वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसला अशी चर्चा त्याकाळात झाली.

शरद पवारांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली. जनता पक्षाला सोबत घेतले. आघाडीत शेकाप, कम्युनिस्ट पक्ष सहभागी झाले आणि या आघाडीला पुरोगामी लोकशाही दल म्हणजेच पुलोदचे सरकार म्हणून नाव देण्यात आले.

यानंतर मुख्यमंत्री पदावर चर्चा सुरु झाली. त्यावेळी जनता पक्षाच्या महाराष्ट्र शाखेचे तत्कालिन अध्यक्ष एस. एम. जोशी यांनी ९९ जागा असल्यामुळे जनता पक्षाकडून मुख्यमंत्रिपदासाठी विठ्ठल रामचंद्र उर्फ बापू काळदाते यांचे नाव सुचवले. त्या नावाला शरद पवार आणि यशवंतरावांनीही संमती दर्शविली.

पण जनता पक्षाच्या घडणीत प्रमुख असलेल्या जनसंघाच्या एका ज्येष्ठ नेत्याने बापूंऐवजी उत्तमराव पाटलांना हे पद द्यावयास पाहिजे असा आग्रह धरला; शिवाय बापू खासदार आहेत, आमदार नाहीत हाही मुद्दा उपस्थित करण्यात आला.

बापू काळदाते हे १९५२ पासून समाजवादी पक्षाचे एक प्रचारक होते. तेव्हापासून ते एसएम यांचे पट्टशिष्य होते. पुढे राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून बिहारमधील भूदान चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. यावेळी जयप्रकाश नारायण यांच्याही नजरेत त्यांचे काम आले.

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरु झाल्यानंतर ते जयप्रकाश नारायण यांच्या सांगण्यावरून महाराष्ट्रात परतले. कालांतराने मराठवाड्यात संघटनेचे काम सुरु केले. १९६७ सालची सार्वत्रिक निवडणूक आली. लातूर विधानसभा मतदारसंघातून तत्कालीन सहकारमंत्री केशवराव सोनवणे यांच्याविरुद्ध बापूंनी निवडणूक लढवण्याचे ठरवले. त्यात ते सोनावणे यांचा पराभव करत आमदार झाले. त्यामुळे पक्षातील त्यांच्याविषयीचा आदर आणखी वाढला होते.

आणीबाणीच्या काळात उदयास आलेल्या जनता पक्षातर्फे त्यांनी औरंगाबाद मधून १९७७ची लोकसभेची निवडणूक लढवली आणि जिंकली. पुढे केंद्रात मंत्रिमंडळाची रचना चालू असताना मोरारजींना भेटून ये अशी बापूंना सूचना करण्यात आली होती; पण त्यांनी या गोष्टीला नकार दिला. त्यामुळे मंत्रिपदच काय पण मुख्यमंत्रिपदानेही त्यांना पुढे हुलकावणी दिली.

अखेरीस जनता पक्षात एकमत न झाल्यामुळे एसएम जोशी यांनी सर्व सहमतीचा उमेदवार म्हणून पवारांना पसंती दिली आणि मंत्रिमंडळाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी शरद पवारांच्या गळ्यात पडली. 

१८ जुलै १९७८ साली महाराष्ट्रात पहिल्यांदाच पुलोदच बिगर काँग्रेसी सरकार सत्तेवर आले होते. महाराष्ट्राचे सर्वात तरूण मुख्यमंत्री म्हणून शरद पवार मुख्यमंत्री झाले. तर सुंदरराव सोळंके यांच्याकडे मुख्यमंत्रीपद देण्यात आले. पण १९८० ला पुन्हा सत्तेत आलेल्या इंदिरा गांधी यांनी हे सरकार बरखास्त केले. त्यामुळे पहिले बिगर कॉंग्रेसी सरकार अडीच वर्षच चालले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.