पत्नीचं नाव घेऊन टीका करणाऱ्या विरोधी पक्ष नेत्याची मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली होती..

बापूसाहेब काळदाते म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील गाजलेलं नाव. कट्टर समाजवादी कार्यकर्ता असलेल्या बापूसाहेब काळदाते यांच मुळगाव बीड. मात्र बापूंचे शालेय शिक्षण पंढरपुरात, तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. त्यांच्याजवळ जन्मजात वक्तृत्वाची देणगी होती. साने गुरुजींच्या राष्ट्र सेवा दलात त्यांची समाजकार्याची जडणघडण झाली. एसएम जोशींच्या नेतृत्वाखाली त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीत तुरुंगवास भोगला. एक सच्चा समाजवादी विचारांना पुढे नेणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख कायम राहिली. पुढे पक्षाला गरज होती तेव्हा ते निवडणुकीत देखील उतरले.

१९६७ साली पूर्णपणे अनभिज्ञ असलेल्या लातूर या मतदारसंघात त्यांनी विधानसभा लढवली. तेव्हा मंत्री असलेल्या केशवराव सोनवणे यांचा त्यांच्या घरच्या मतदारसंघात पराभव केला. एक जायंट किलर म्हणून ते राज्यभरात गाजले.

विधानसभेत त्यांचा प्रवेश झाला तेव्हा सगळे आमदार केशवरावांना पाडणारा तरुण म्हणून कुतूहलाने पाहत होते. बापूंनी देखील एक कार्यक्षम भाषेवर प्रभुत्व असलेला, विषयांचा अभ्यास केलेला प्रखर टीकाकार पण व्यक्तिगत जीवनात सर्वांचा स्नेही म्हणून सगळ्यांवर आपली छाप पाडली. सत्ताधारी पक्षात देखील त्यांचे चाहते होते. मात्र एकदा  एक घटना घडली ज्यामुळे बापूसाहेब काळदाते यांचे थेट मुख्यमंत्र्यांशी वादाचा प्रसंग निर्माण झाला होता.

गोष्ट आहे १९६८ सालची. त्याकाळी मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक. शेतकऱ्यांविषयी व शेती विषयी तळमळ असणारा नेता म्हणून वसंतराव नाईकांना ओळखलं जायचं. त्यांची आजवरची कारकीर्द स्वच्छ व निष्कलंक मानली जायची. पण त्याकाळात त्यांच्या बद्दलचा एक वाद मात्र पुढे आला होता व त्यामुळे मुख्यमंत्री अडचणीत आले होते.

 हा वाद होता मुख्यमंत्र्यांनी आपली पत्नी वत्सलाबाई नाईक यांच्या नावावर खरेदी केलेल्या यवतमधल्या जमिनीचा.   

या जमिनीच्या व्यवहारावर शंका उपस्थित करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात समाजवादी पक्षाने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. हे आंदोलन यवत मध्ये त्याच वादग्रस्त जमिनीवर जाऊन होणार होते. या चळवळीचे नेतृत्व आमदार बापू काळदाते यांच्याकडेच सोपवण्यात आले. पक्षाचा कट्टर सैनिक असलेल्या बापूंनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी यवत गाठले.

तिथल्या आठवडी बाजारात बापूंचे नेहमीप्रमाणे जोरदार भाषण झाले. मुख्यमंत्र्यांशी थेट भिडणाऱ्या नेत्याला पाहण्यासाठी हजारो शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. सभेनंतर बापू काळदाते सत्याग्रह करण्यासाठी निघाले. सारी सभा मागे चालू लागली. राज्याच्या राजकारणात हे पहिल्यांदाच घडत होतं. अचानक पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांना अडवलं आणि बापुना अटक केली.

या आंदोलनात बापू काळदाते यांना दोन वेळा अटक झाली. त्यांनी विधानसभेत देखील यावर आवाज उठवला.

विरोधी पक्षांनी वसंतराव नाईक यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. तत्कालीन विरोधी नेत्यांनी विधानसभेत अविश्वास प्रस्तावासंबंधी एक संकेत पाळलेला होता. विरोधी पक्षनेत्याचे विरोधाचे भाषण पहिले असे व सर्वात ज्युनिअर असलेले बापू काळदाते अविश्वासाच्या ठरावाबाबतचे भाषण करणारे शेवटचे वक्ते असत.

या सर्वांच्या भाषणानंतर अविश्वासाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उत्तर देत असत.

समाजवादी चळवळीने मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने जमीन बळकाव प्रश्नावर अविश्वास ठरावाचा प्रस्ताव आला होता. संकेताप्रमाणे अविश्वासाच्या प्रस्तावावर भाषण करण्यासाठी बापू काळदाते शेवटचा वक्ता
म्हणून  बोलायला उभे राहिले. जमीन मालकी हक्काबद्दल सरकार विरुद्ध त्यांची भूमिका होती आणि अटकेत राहून आल्यामुळे त्यांचा जोश अगदी टोकाला पोहचला होता. त्याच भावनेच्या भरात बापूसाहेबांनी  भाषण केलं.

ते म्हणतात सरकार विरोधी भूमिका असल्यामुळे मी माझ्या भाषणाची सुरुवात सिद्धांताप्रमाणे गांभीर्याने करावयास हवी होती. पण ही सुरुवात मी छदमीपणाने केली आणि त्यामध्ये मुख्यमंत्र्यांवर व्यक्तिगत स्वरूपाची टीका माझ्याकडून झाली.

कधी नव्हे ते वसंतराव नाईकांचा देखील संयम ढळला. त्यांनी देखील त्याच तीव्र स्वरूपात काळदातेविरुद्ध टीका केली. काँग्रेसकडे बहुमत असल्यामुळे नेहमीप्रमाणेच अविश्वासाचा प्रस्ताव संमत झाला नाही आणि त्या दिवसाचे सभागृहाचे कामकाज संपले.

बापूसाहेब काळदाते मात्र मनाने अत्यंत अस्वस्थ झाले होते. आपले वर्तन लोकशाहीच्या संकेताविरुद्ध झाले याची त्यांना बोच लागली होती. त्याच विमनस्क अवस्थेत ते आपल्या कार्यालयात बसलेले असतानाच अचानक मुख्यमंत्र्यांचा सेवक त्यांच्याकडे आला आणि मुख्यमंत्री साहेबांनी आपणास बोलाविले असल्याचा निरोप त्यांना दिला.

बापूसाहेब भीतभीतच मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात गेले व ‘ माझ्या हातून चूक झाली अशी
सारवासारव करू लागले. पण तेवढ्यात मुख्यमंत्री म्हणाले,

” तुम्ही या विधानसभेत नवीन आहात. तुमच्या हातून चूक होणे स्वाभाविक आहे. परंतु मीही तुम्हाला बोललो, अनुभवी असतांनाही मी या स्वरूपाची टीका केली याचे वाईट वाटले. हे तुम्हाला सांगावे व जे झाले ते संपले, आपल्यामध्ये स्नेहाचे संबंध कमी होणार नाही याची मी तुम्हाला ग्वाही देतो हे सांगण्यासाठी तुम्हाला बोलाविले. “

बापूसाहेब काळदाते म्हणतात, “लोकशाहीमधील ही मर्यादा आणि ही उदारता यांचे दर्शन या निमित्ताने वसंतराव नाईक याच्यामध्ये दिसन आले आणि आमचा स्नेह त्यांच्या मरणापर्यत कायम राहिला.”

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.