काम पाहिजे असेल तर मला मत द्या, भाषण ऐकायचं असेल तर बापूसाहेबांना गणपतीमध्ये बोलवू…

बापूसाहेब काळदाते म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील गाजलेलं नाव. कट्टर समाजवादी कार्यकर्ता असलेल्या बापूसाहेब काळदाते यांच मुळगाव बीड. मात्र बापूंचे शालेय शिक्षण पंढरपुरात, तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. त्यांच्याजवळ जन्मजात वक्तृत्वाची देणगी होती. साने गुरुजींच्या राष्ट्र सेवा दलात त्यांची समाजकार्याची जडणघडण झाली. एसएम जोशींच्या नेतृत्वाखाली त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीत तुरुंगवास भोगला. एक सच्चा समाजवादी विचारांना पुढे नेणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख कायम राहिली. पुढे पक्षाला गरज होती तेव्हा ते निवडणुकीत देखील उतरले.

१९६७ साली पूर्णपणे अनभिज्ञ असलेल्या लातूर या मतदारसंघात त्यांनी विधानसभा लढवली. मतदारसंघाला अनेक गावांची नावे देखील त्यांना माहित नव्हतं.विरोधात असलेले केशवराव सोनवणे राज्यात मंत्री होते. शिवाय त्यांचा घरचा मतदारसंघ होता. पण बापूसाहेबांनी आपल्या भाषणाच्या जोरावर सोनावणे यांनी त्यांचा पराभव केला. एक जायंट किलर म्हणून ते राज्यभरात गाजले.

विधानसभेत त्यांचा प्रवेश झाला तेव्हा सगळे आमदार केशवरावांना पाडणारा तरुण म्हणून कुतूहलाने पाहत होते. बापूंनी देखील एक कार्यक्षम भाषेवर प्रभुत्व असलेला, विषयांचा अभ्यास केलेला प्रखर टीकाकार पण व्यक्तिगत जीवनात सर्वांचा स्नेही म्हणून सगळ्यांवर आपली छाप पाडली. सत्ताधारी पक्षात देखील त्यांचे चाहते होते.

हा तरुण आमदार भावी मुख्यमंत्री आहे असंच म्हटलं जायचं. विरोधी पक्षाचे नेते म्हणून विधानसभेत त्यांनी केलेल्या भाषणामुळे मुख्यमंत्री वसंतराव नाईकांना देखील त्यांनी अनेकदा अडचणीत आणलं होतं. त्यांचं नाव राज्यभरात गाजलं.

१९७२ साली पुढची विधानसभेची निवडणूक आली. बापूसाहेब काळदाते यांनी लातूरच्या ऐवजी आपल्या घरच्या मतदारसंघात उतरायचं ठरवलं. बीड जिल्ह्यातील केजमध्ये संयुक्त समाजवादी पक्षाकडून त्यांनी फॉर्म भरला. त्यांच्या विरोधात काँग्रेसने तिकीट दिलं बाबुराव आडसकर कोकाटे यांना.

झुपकेदार मिश्या, रांगडं शरीर, गावरान बोलीभाषा. डोक्यावर टोपी. बोलणं चतुराईचं पण मिश्कील, डोळ्यात करारीपणा, कमी शिकलेला पण प्रश्नांची अचूक जाण असणारा, भल्या भल्यांना आडवा करणारा असा अस्सल जातीवंत मराठा गडी म्हणजे बाबुराव अडसकर.

बाबुराव आडसकरांना जनसामान्यांची जाण होती.

तळागाळातले प्रश्न माहीत होते. त्यामुळे दुष्काळात राब राब राबून आडसकरांनी लोकांचे प्रश्न सोडवले होते. अनेकांच्या हाताला दुष्काळात कामं दिली. कित्येकांचे संसार तारले, पोरा-बाळांना जगवलं.

त्याच्या बोलण्यात गावरान गोडवा होता. त्यामुळे जनसामान्यांशी त्यांची नाळ अजूनच घट्ट झाली. पंचायत समितीचा सभापती असतांना केलेल्या कामांचा अनुभव त्यांच्या पाठीशी होता. त्यामुळे १९७२ च्या विधानसभेची काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली.

बापूसाहेबांच्या सभेला हजारोंची गर्दी व्हायची. बैलगाड्या सजवून लोक त्यांचे भाषण ऐकायला यायची.

मात्र त्यामानाने बाबुराव अडसकर हे काही फर्डे वक्ते नव्हते. पण ते पारा-पारावर जात आपल्या अस्सल गावरान रांगडी भाषेतून भाषत ठोकत. ते लोकांना विचारायचे, 

“तुझ्या गावचा रस्ता कोणी केला? म्या केला. तुझ्या गावाला पाणी कोणी दिलं, म्या दिलं.”

पंचायत समितीचे सभापती असल्यामुळे त्यांचं म्हणणं एक अर्थे खरंच होतं. लोक पण चकित होऊन मान डोलवायची. तेव्हा आडसकर म्हणायचे,

“कामाला मत द्यायचे की उत्तम भाषणाला मत द्यायचे? उत्तम भाषण ऐकायचे असल्यास बापूसाहेबांचे भाषण मी गणपती उत्सवात ठेवेन. सबब मला मत द्या!”

बाबुराव आडसकरांच्या या अनोख्या प्रचारामुळे बापूसाहेब काळदाते यांना चांगलंच अडचणीत आणलं. त्यांनी उत्तमोत्तम भाषणे करूनही लोकांनी त्यांना प्रतिसाद दिलाच नाही. आडसकर म्हणायचे,

‘औंदा हाबाडा देणारच, विरोधकांचा टांगा पलटी करायचाच, मतदारसंघाचं टिकूर माझ्या हाती द्या मंग दाखवतो विकास’

खरोखरच लोकांनी मतदारसंघाचं टिकूर आडसकरांच्या हवाली केलं. रांगड्या पंचायत समितीच्या सभापतीने भावी मुख्यमंत्री म्हणवल्या जाणाऱ्या अभ्यासू उमेदवाराचा दुप्पट मतांनी पराभव केला.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.