फक्त गुरुनं सांगितलं म्हणून, वैजयंतीमालानं मध्यरात्री चित्रपट साईन केला होता

हिंदी सिनेमाच्या दुनियेत दक्षिणेकडून आलेल्या अभिनेत्रींचे एकेकाळी खूप चलती होती. विशेषता पन्नासच्या दशकामध्ये दक्षिणात्य अभिनेत्रींनी हिंदी रुपेरी पडदा गाजवून ठेवला होता. याच दशकाच्या सुरुवातीला वैजयंती माला हिचे हिंदी सिनेमाच्या पडद्यावर आगमन झाले.

‘बहार’ या १९५१ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटापासून तिचे हिंदी सिनेमात आगमन झाले. 

नृत्य हा तिचा सर्वात मोठा प्लस पॉईंट होता. अभिनेत्री म्हणून देखील ती श्रेष्ठ होती पण निर्मात्यांचा ओढा तिच्याकडे एक ‘नृत्य करणारी अभिनेत्री’ म्हणून पाहण्याचा होता. बी आर चोप्रा यांच्या ‘नया दौर’ या चित्रपटासोबतच त्यांचे ‘साधना’ या चित्रपटावर काम चालू होते. 

पंडित मुखराम शर्मा यांच्या कथानकावर अनेक हिंदी सिनेमे तयार झाले. ‘साधना’ या चित्रपटाचे कथानक देखील पंडित मुखराम शर्मा यांचेच होते. त्यांनी बी. आर. चोप्रा यांना हि कथा ऐकवली, आणि यावर एक चांगला चित्रपट तयार होऊ शकतो असे सांगितले. चोप्रांना देखील हि कथा खूप आवडली. यावर चित्रपट बनविण्याचे त्यानी ठरवले.  

पंडित मुखराम शर्मा यांना साधना चित्रपटात भारत भूषण आणि मधुबाला यांनी काम करावे असे वाटत होते. परंतु बी. आर. चोप्रा यांना  या कथानकाला दिलीप कुमार आणि निम्मी हे न्याय देतील असे वाटत होते. 

चोप्रा यांनी पंडित मुखराम शर्मा यांना निम्मीला  भेटण्यासाठी पाठवले आणि स्वतः ते दिलीप कुमार यांना भेटणार होते. निम्मीला चित्रपटाचे कथानक खूप आवडले आणि ती या चित्रपटात काम करायला तयार झाली. परंतु फक्त तिने एक अट घातली. 

दिलीप कुमारला या सिनेमासाठी जितके मानधन मिळणार तितकेच मला मिळायला हवे अशी अट निम्मी यांची होती.

हि अट अर्थातच चोप्रांना आवडली नाही. आणि निम्मीचा पत्ता कट झाला. नंतर मोर्चा वैजयंती मालाकडे वळला. वैजयंतीमालाला जेव्हा हे कथानक ऐकवले, त्यावेळी  तिला ते खूप आवडले आणि या सिनेमात मी नक्की काम करेल असे तिने सांगितले. तसेच या सिनेमासाठी तिने मानधन देखील खूप कमी सांगितले.

चोप्रा यांना खूप आनंद झाला. त्यांनी एग्रीमेंट तयार केले आणि ते साईन करण्यासाठी त्यांनी वैजयंतीमाला बोलावले. त्यावेळी तिने एक अट घातली ती म्हणाली या सिनेमाचे एग्रीमेंट मी माझ्या घरी, माझ्या इष्टदेवतेसमोर रात्री बारा वाजता साईन करेल. ‘असेल तिची श्रध्दा’ म्हणून चोप्रांनी ही अट मान्य केली. 

तिने सांगितलेल्या रात्री बाराच्या आधी ते आणि मुखराम शर्मा एग्रीमेंट ची कॉपी घेऊन तिथे पोहोचले. वैजयंतीमालाने त्यांचे स्वागत केले. स्नान करून ती घराच्या मंदिरात गेली. तिथल्या इष्टदेवतेची यथासांग पूजा केली. आरती केली. आणि एग्रीमेंटची कॉपी देवासमोर ठेवली.

मनोभावे नमस्कार केला आणि नंतरच वैजयंती मालाने एग्रीमेंटवर सही केली!

चोप्रा आणि शर्मा यांना हा सगळा प्रकार नवीन होता. त्यांनी वैजयंतीमालाला याचे कारण विचारले त्यावेळी ती म्हणाली ,”मला हिंदी सिनेमात येऊन सात-आठ वर्षे झाली आहेत. आजवर सर्व निर्मात्यांनी माझ्यातील फक्त नृत्य अभिनेत्रीलाच ओळखले आणि तशाच भूमिका मला ऑफर होत गेल्या.

‘साधना’ या चित्रपटातील हि पहिली भूमिका आहे; ज्यात माझ्यातील अभिनय करणाऱ्या कलागुणांना ओळखून मला ही भूमिका ऑफर केली आहे!  माझ्यासाठी हि खूप मोठी आणि आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळेच या चित्रपटाचे एग्रीमेंट साहिल मी माझ्या गुरूला विचारून त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने साईन केले आहे!”

वैजयंतीमालाने या चित्रपटात अतिशय अप्रतिम भूमिका केली.

एन दत्ता यांनी या चित्रपटाला संगीत दिले होते तर साहिर लुधियानवी यांनी या चित्रपटाची गाणी लिहिली होती. ‘औरत ने जनम दिया मर्दो को मर्दो ने उसे बाजार दिया….’ हे अप्रतिम गाणं या चित्रपटात होते.  सुनील दत्त या सिनेमात तिचा नायक होता. 

वैजयंतीमालाने अतिशय समरसून यातील भूमिका साकार  केली आणि तिला या भूमिकेसाठी त्यावर्षीचे फिल्मफेअर अवॉर्ड देखील मिळाले. 

‘साधना’ या १९५८ साली आलेल्या सिनेमासाठी बी आर चोप्रा यांना (सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक), साहीर लुधियानवी यांना (सर्वोत्कृष्ट गीतकार),लीला चिटणीस यांना (सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री) आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट असे फिल फेअर चे नामांकन मिळाले होते. पंडीत मुखाराम शर्मा यांना सर्वोत्कृष्ट कथानकाचे पारितोषिक मिळाले. 

मध्यरात्री आपल्या इष्ट देवतेसमोर साईन केलेला चित्रपट वैजयंतीमाला ला खूप काही देवून गेला.

  • भिडू धनंजय कुलकर्णी

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.