बार्बाडोसचं स्वातंत्र्य म्हणजे वेस्ट इंडिजच्या ऊसपट्टाच्या राजकारणाचा विजय आहे

भारतावर इंग्रजांनी दिडशे वर्ष राज्य केलं,  सगळा देश लुटला हे आपण आजवर इतिहासात वाचतच आलोय. त्याकाळी लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना आजही हिरो मानलं जातंय. पण असाही एक देश आहे जिथला ब्रिटिश राज जवळपास ४०० वर्षांनी राज्य संपलंय आणि या नव्याने स्वतंत्र झालेल्या देशात थेट सिंगर रिहानाला नॅशनल हिरो म्हणून घोषित केलंय.

सर्वात आधी आपण जाणून घेऊ ४०० वर्षांनी ब्रिटिशांपासून स्वतंत्र झालेला देश हा कोणता आहे काय आहे ? 

बार्बाडोस. आपण क्रिकेट मध्ये वेस्ट इंडिज म्हणून ओळखतो त्या कॅरीबियन बेटांपैकी एक.  भारत शोधायला निघालेला कोलंबस रस्ता चुकून इथे पोहचला त्याने इथल्या लोकांना इंडियन्स म्हणून संबोधलं. नंतर त्याचा गैरसमज दूर झाला पण कॅरिबियन बेटावरून गोरे लोक परत गेले नाहीत.या देशांवर युरोपियन्सच राज्य सुरु झालं. 

बार्बाडोस बद्दल सांगायचं झालं तर १६२५ साली पहिलं इंग्रज जहाज इथे आलं त्यांनी पहाणी केली आणि पुढच्या दोन तीन वर्षात बार्बाडोसमध्ये इंग्रजांची वसाहत सुरु झाली.

बार्बाडोसवर मुख्यत्वे करून ब्रिटिशांनी ऊस शेती लावली. साधारण १६४० पासून आजवर या वेस्ट इंडियन बेटावर साखरेचं साम्राज्य आहे. या ऊस शेतीसाठी इंग्रजांनी आपल्या मांडलिक देशातून अनेक गुलाम आणून वसवले. जेलमध्ये असलेल्या आयरिश बंदींना देखील बार्बाडोस मध्ये आणलं. त्यामुळेच या बेटावर वेगवेगळ्या वंशाची लोकं पाहावयास मिळतात.

आता ब्रिटिशांची सत्ता म्हटल्यावर ती अन्यायकारीच होती. बार्बाडोस बेटावर कमीतकमी खर्चात ऊस पिकवायचा व त्यापासून बनलेली साखर जगभरात जास्तीतजास्त किंमतीत विकायची अशी त्यांची स्ट्रॅटेजी होती. असं नाही की बार्बाडोस बेटावर स्वातंत्र्यासाठी प्रयत्न झालेच नाहीत. १८१६ साली झालेली बुसाची क्रांती हे त्याच उदाहरण आहेच पण ब्रिटिशांनी असे अनेक प्रयत्न आपल्याक्रूर शक्तीने दडपून टाकले.

जे स्वातंत्र्यलढ्याला जमलं नाही ते पुढे अमेरिकेच्या महामंदीने करून दाखवलं. १९३०च्या दशकात आलेले हे ग्रेट डिप्रेशन इंग्रजांची वेस्ट इंडिजमधली सत्ता खिळखिळी करून गेले. हळूहळू त्यांनी बार्बाडोसला टप्याटप्प्याने स्वायत्तता देण्यास सुरवात केली.

३० नोव्हेंबर १९६६ ला बार्बाडोसला स्वातंत्र्य देण्यात आलं होतं. मात्र, तो देश अद्याप प्रजासत्ताक झाला नव्हता. १९७९ मध्ये कोक्स कमिशनची स्थापन गणराज्य व्यवस्था निर्माण करण्यासाठी स्थापना करण्यात आली. १९९८ मध्ये संविधानिक समितीनं बार्बाडोसनं प्रजासत्ताक दर्जा स्वीकारावा असं म्हटलं.
२००५मध्ये इंग्लंडच्या  विरोधात बार्बाडोसनं त्रिनिदादमधील कॅरेबियन कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये अपील केलं. बार्बाडोसबाबत लंडनमध्ये असलेल्या प्रिव्यु कौन्सिलला देखील रद्दबातल ठरवलं. मात्र, तरीदेखील ब्रिटनच्या राणीचा बार्बाडोसवरील अंमल काही संपलेला नव्हता.

२००८मध्ये पुन्हा एकदा बार्बाडोसनं देशाला प्रजासत्ताक बनवण्याचा प्रस्ताव मांडला. मात्र, त्याला अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलं होतं. अखेर २०१८ साली पंतप्रधान बनलेल्या मिया एमोर मोटली यांनी जोर वाढवला आणि त्यांच्या सरकारने- बार्बाडोसच्या स्वातंत्र्याच्या ५५ व्या वर्धापनदिनी, म्हणजे ३० नोव्हेंबर २०२१ रोजी राणीचे राष्ट्रप्रमुखपद बरखास्त करून त्याजागी स्थानिक निर्वाचित लोकप्रतिनिधी राष्ट्राध्यक्षपदी नियुक्त केला जाईल, अशी घोषणा केली.

ब्रिटनच्या राणीचा अंमल संपुष्टात आणण्याची प्रक्रिया गेल्या अनेक महिन्यांपासून बार्बाडोसमध्ये सुरू होती. सँड्रा मसॉन यांची महिन्याभरापूर्वी बार्बाडोसच्या हाऊस ऑफ असेम्ब्ली आणि सिनेटनं राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड केली होती.

३० तारखेला सत्तापरिवर्तनाच्या निमित्ताने ब्रिटिश राजसत्तेला अंतिम सलामी देण्यात आली व ब्रिटिश राजकुमार प्रिन्स चार्ल्स यांच्या उपस्थितीत राजघराण्याचा झेंडा उतरवून बार्बाडोसचा नवा ध्वज फडकवण्यात आला आहे

बार्बाडोसमध्ये काय बदलणार ?

बार्बाडोसचा राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, प्रतिज्ञा बदलणार नाही. मात्र, त्यातील ब्रिटनच्या राणीशी संबंधित असणारे रॉयल, क्राऊन असे शब्द वगळले जातील. रॉयल बार्बाडोस पोलीस फोर्समधील रॉयल हा शब्द वगळला जाईल. आता बार्बाडोस पोलीस फोर्स असं नाव राहील.

बार्बाडोसने आपल्या स्वातंत्र्याच्या बरोबर एक देशाच्या दहा नॅशनल हिरोंची घोषणा देखील केली. 

यात बार्बाडोसच्या अनेक महनीय व्यक्तींसोबतच  सुप्रसिद्ध रॉकस्टार गायिका रिहाना हिला देखील बार्बाडोसच्या नव्या राष्ट्राध्यक्षांनी देशाची नॅशनल हिरो म्हणून घोषीत केलं आहे. कलाक्षेत्राशी संबंधित असूनही रिहाना आपल्या रोखठोक राजकीय व सामाजिक मतांसाठी ओळखली होते. भारतात देखील दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला तिने पाठिंबा दिला होता. बार्बाडोसची सुकन्या असलेल्या रिहानाने देशाला जगाच्या पाठीवर ओळख मिळवून दिलीच शिवाय ती करत असलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक म्हणून तिला देशाचा नॅशनल हिरो म्हणून घोषित करण्यात आलं आहे.

या दहा नॅशनल हिरोंपैकी फक्त रिहाना आणि सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सर गॅरी सोबर्स हे दोघेच सध्या हयात आहेत.

वेस्ट इंडिजमध्ये बार्बाडोसच्या स्वातंत्र्याला अतिशय महत्व आहे. महाराष्ट्रात ज्या प्रमाणे साखर सम्राट संपूर्ण राज्याच राजकारण सांभाळतात त्याप्रमाणेच वेस्ट इंडिजमध्ये देखील बार्बाडोसच राजकारण ऊस भोवती फिरत होत. आता त्यांचा विजय झाला आणि खऱ्या अर्थाने उसपट्ट्याचा विजय झाला.

हे ही वाच भिडू 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.