मुख्यमंत्री हेलावून गेले, रक्तबंबाळ झालेला कामगार नेता त्यांना निवेदन देत होता.

महाराष्ट्रातील कामगार चळवळीने देशाला अनेक मोठे नेते दिले. यातीलच प्रमुख नाव म्हणजे अर्धेन्दू भूषण बर्धन उर्फ ए.बी.बर्धन. मूळचे बंगालचे पण कर्मभूमी नागपूर. इथल्याच विद्यापीठात  शिकत असताना त्यांना कम्युनिझम ची ओळख झाली, विद्यार्थी चळवळ मग पुढे कामगारांचे प्रश्न मांडता मांडता बर्धन मराठी मातीचे झाले.

१९५७ साली संयुक्त महाराष्ट्र व्हावं  म्हणून जे भलं मोठं आंदोलन उभं राहिलं त्याने संपूर्ण देश हलवून सोडला होता. कधी नव्हे ते काँग्रेसचे मोठे दिग्गज निवडणुकीत  धाराशायी झाले आणि बर्धन सारखे विद्रोही तरुण महाराष्ट्राच्या विधान सभेत पोहचले.

गोष्ट आहे १९६६ सालची.

भारतातली सर्वात जुनी कापड गिरणी  म्हणून ओळखली नागपूरची मॉडेल टेक्स्टाईल मिल येथे कामगारांचं  आंदोलन सुरु होतं. मिल आधीच बंद पडली होती अशातच तिथल्या प्रशासनाने मिल  कामगारांची घरे पाडण्याचा  अन्यायी निर्णय घेतला होता.

एकतर रोजगार नाही. आणि आता घरेही पाडणार. कामगारांनी याच्या विरुद्ध लढा उभा केला. नेतृत्व दिलं बर्धन यांच्याकडे.

अशातच तेव्हाचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे नागपूर दौऱ्यावर आले होते. कामगारांनी आपलं आंदोलन तीव्र केलं. मुख्यमंत्र्याचा ताफा ज्या मार्गाने येणार होता तिथे बर्धन व त्यांचे कामगार साथी उपोषणाला बसले होते. जोरदार घोषणाबाजी सुरु होती.

पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी लाठीमार सुरू केला. सर्वात पुढे उभे असलेल्या बर्धन यांना डोक्यात काठीचा जबर मार बसला.

ते खाली कोसळले. डोक्याला पाच-सहा इंचांची जखम झाली होती. रक्ताची अखंड धार वाहत होती. पण हा कामगारांचा सेनापती डगमगला नाही. अवघ्या दोन मिनिटांत पुन्हा उभे राहिले. डाव्या हाताने आपली वाहणारी जखम त्यांनी दाबून ठेवली.

तेवढ्यात मुख्यमंत्र्यांचं आगमन झालं. वसंत राव नाईक गाडीतून उतरले तर त्यांना समोर कामगारांचा जमाव दिसला. बर्धन घोषणा देत ठामपणे उभे होते. वसंतराव  नाईक त्यांच्या जवळ गेले . बर्धन यांच्या सगळय़ा शर्टावर रक्त सांडले होते. अशाच अवस्थेत त्यांनी मुख्यमंत्र्यांना आपले निवेदन दिले.

वसंतराव नाईक या रक्तबंबाळ झालेल्या जिद्दी माणसाकडे बघतच राहिले. 

त्यांनी निवेदन बाजूला ठेवलं आणि सर्वप्रथम डॉक्टरांना बोलावून घेतलं.

बर्धन यांच्यावर उपचार केले. त्याच ठिकाणी वसंतराव नाईकांनी कामगारांची घरे न पाडण्याचा आदेश प्रशासनाला दिला. कामगारांनी बर्धन यांच्यासोबत राजकरणातही माणुसकी जपणाऱ्या वसंतराव नाईकांचा देखील जयजयकार केला.

पुढे बर्धन राष्ट्रीय राजकारणात गेले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस म्हणून काम केलं. पुढे त्यांच्या कडे अनेक सत्तेची पदे चालून आली पण त्यांनी आपली निष्ठा कधी गहाण ठेवली नाही. जवळपास ७५ वर्षे राजकीय जीवनात काढूनची त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचे धाडस कोणाला झाले नाही. भारतीय डाव्या चळवळीतला निस्पृह पितामह म्हणून त्यांना जगभरात ओळखले गेले.  

जन्माने बंगाली असून कर्माने मराठी असल्याचा अभिमान बर्धन यांनी सोडला नाही.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.