बरबड्याच्या भाकरीकडे पाहताच इंदिरा गांधींनी महाराष्ट्राला १० हजार टन धान्य पाठवून दिले.

गोष्ट आहे ७२च्या दुष्काळातली. आजवर पाहिला नाही असा महादुष्काळ अख्ख्या महाराष्ट्रात पडला होता. शेतातली पिके केव्हाच जळून गेली होती. नद्या, नाले, विहिरी ओस पडले होते. गोठ्यातली जनावरे टाचा घासत होती. माणसांना खायला अन्न नव्हते. आभाळ फाटलं होतं.

तेव्हाचे मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक.

दुष्काळाशी सामना करायला त्यांनी पाटबंधारे योजना आणल्या होत्या, रोजगार हमीची कामे सुरू करून लोकांना खायला प्यायला तरी अन्न मिळेल याची व्यवस्था केली होती.

पण राज्याला जगवण्यासाठी उपलब्ध धान्यसाठा पुरणार नव्हता.

मुख्यमंत्री वसंतराव नाईक याच चिंतेत होते. केंद्राकडे मदत मागण्यात आली होती मात्र त्यांचे देखील हात बांधलेले होते.

सगळीकडेच अतिशय भयाण परिस्थिती होती. फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाला या दुष्काळाच्या झळा लागल्या होत्या. पंतप्रधान इंदिरा गांधी देशात अन्नधान्य पुरवायचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर उभं होतं.

नेहमीप्रमाणे नागपूर मध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन भरलं तेव्हा दुष्काळावर खडाजंगी झाली.

कोणत्याही परिस्थितीत धान्य उपलब्ध करून आणणे गरजेचे होते. अशावेळी वसंतराव नाईकांनी आयडिया केली, इंदिराजींच्याकडे अतिरिक्त धान्य मागणी करण्यासाठी महिला आमदारांच शिष्टमंडळ दिल्लीला पाठवलं.

जवळपास २५ महिला आमदारांच्या मध्ये सोलापूरच्या निर्मला ठोकळ या आमदार होत्या. त्यांनी इंदिराजींना देण्यासाठी बरबड्याची भाकरी सोबत घेतली.

बरबड्याची भाकरी का घेतली या मागे देखील एक स्टोरी आहे.

खूप वर्षांपूर्वी महाराष्ट्रात असाच मोठा दुष्काळ पडला होता. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांच्या गाडीच्या ताफ्यात यशवंतराव चव्हाण होते.

टळटळीत वेळ होती. दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करताना नेहरूंनी एकेठिकाणी गाडी थांबवायला सांगितली. तिथे शे दीडशे कामगार दुपारची सुट्टी करून एकत्र जेवण करत होते. यशवंतरावांना घेऊन नेहरुजी तिथे गेले.

तिथल्या जेवणाऱ्याच्या प्रत्येकाच्या हातात कुठली तरी वेगळीच भाकरी दिसत होती.

नेहरूंनी त्यांना हे काय म्हणून विचारले तर बरकड्याची भाकरी अस उत्तर आलं. पंडितजींनी प्रश्नार्थक नजरेने जिल्हाधिकारी झुबेरी यांना विचारलं. तेव्हा त्यांनीं सांगितलं की,

“दुष्काळातही माळरानावर एकप्रकारचे गवत उगवते. त्याला ज्या बिया लागतात त्याला बरबडा असे म्हणतात. त्यापासून दळून केलेली भाकरी म्हणजे बरबड्याची भाकरी.”

पंडितजींनी आश्चर्याने विचारले की इथे स्वस्त
धान्याचे दुकान नाही का? तर जिल्हाधिकारी म्हणाले की स्वस्त धान्याचे दुकान इथून १० मैल दूर आहे आणि शिवाय पैसे नसल्यामुळे पीठ व तेल उपलब्धच होत नाही. तेवढयासाठी इथले लोक ही भाकरी खातात.

ते ऐकून पंडितजी विचारमग्न झाले.

जवळच उभ्या असलेल्या एका मजुराच्या पुरचुंडीतून पंतप्रधानांनी एक भाकर उचलली. स्वतः ती खाल्ली. शिवाय भाकरीचा तुकडा आपल्या खिशात ठेऊन घेतला.

तिथून पुढे करमाळा येथे झालेल्या सभेत नेहरूंनी दुष्काळी कामे करणाऱ्यासाठी योजना ताबडतोब जाहीर केल्या. बरबड्याच्या भाकरीने त्यांच्या मनावर मोठा परिणाम केला होता.

पुढे दिल्लीला परत गेल्यावर त्यांनी या भाकरीबद्दल आपल्या मुलीला म्हणजेच इंदिरा गांधींना सांगितले.

या गोष्टीला जवळपास वीस वर्षे झाली. पुन्हा महाराष्ट्रात हीच परिस्थिती आली होती, लोकांना बरबड्याची भाकरी खाऊन जगावे लागत होते

नेहरूंचा बरबड्याच्या भाकरीसोबतचा हृदयस्पर्शी कथा माहीत असल्यामुळे निर्मलाताईंनी इंदिरा गांधींना भेटण्यासाठी जाताना हीच भाकरी सोबत घेतली. जेव्हा महाराष्ट्राचं शिष्टमंडळ पंतप्रधानांच्या कार्यालयात गेलं, तेव्हा निर्मला ताईंनी आपल्या पर्समधील भाकरीचे तुकडे इंदिराजींच्या समोर ठेवले.

पंतप्रधान इंदिरा गांधींच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. वडिलांनी सांगितलेली भाकरीची कथा त्यांना देखील आठवत होती.

इंदिराजी गहिवरल्या. त्याच मिटिंग मध्ये त्यांनी महाराष्ट्राला अतिरिक्त धान्य पाठवून देण्याचे आश्वासन दिले.

महिला आमदारांच शिष्टमंडळ नागपूरला परते पर्यंत विधानसभेत घोषणा झाली की पंतप्रधानांनी महाराष्ट्रासाठी अतिरिक्त १० हजार टन धान्यसाठा पाठवून दिला आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.