जॉर्ज फर्नांडीस यांनी देशभरात बॉम्बस्फोट घडविण्याची योजना आखली होती !

२५ जून १९७५ रोजी इंदिरा गांधींनी देशावर लादलेली आणीबाणी ही भारताच्या आजवरच्या लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात काळीकुट्ट घटना. जून १९७५ ते मार्च १९७७ दरम्यानच्या २१ महिन्यांच्या काळात देशात आणीबाणी लागू होती. देशाची संपूर्ण सत्ता अनियंत्रितपणे पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यांचे चिरंजीव संजय गांधी यांच्या हातात एकवटली गेली होती.

आणीबाणीच्या काळात वृत्तपत्रांची आणि माध्यमांची मोठ्या प्रमाणात मुस्कटदाबी  करण्यात आली होती. सरकारच्या सेन्सॉरशिप शिवाय काहीही प्रकाशित केलं जाऊ शकत नव्हतं. विरोधी पक्षातील बहुतेक महत्वाच्या नेत्यांना अटकेत टाकण्यात आलं होतं तर अनेकजण भूमिगत राहून काम करत होते. इंदिरा गांधींच्या बेबंद हुकुमशाहीला विरोध करण्याचा कसलाही अधिकार कुणाकडेच उरला नव्हता.

अशा या राजकीय दडपशाहीच्या काळात आणीबाणीला विरोध दर्शवण्यासाठी त्यावेळचे ‘गरिबांचे मसीहा’ अशी प्रतिमा असलेले कामगार नेते जॉर्ज फर्नांडीस यांनी आपल्या काही साथीदारांसह मिळून ‘बडोदा डायनामाइट कट’ रचला होता. आणीबाणीच्या काळात हा कट प्रचंड गाजला. या कटाच्या माध्यमातून जॉर्ज फर्नांडीस यांना इंदिरा गांधींच्या मनमानीचा हिंसक पद्धतीने विरोध करून त्यांना धोक्याचा इशारा  द्यायचा होता.

या कटात सामाविष्ट असलेले आणि कट उधळला गेल्यानंतर प्रमुख आरोपी करण्यात आलेले जॉर्ज यांचे एक सहकारी सी.जी.के.रेड्डी यांनी या कटाविषयीचं ‘बडोदा डायनामाइट कॉन्स्पिरसी- द राईट टू रिबेल’ नावाचं पुस्तक लिहिलं होतं. या पुस्तकात कटाविषयी आणि त्यामागच्या भुमिकेविषयी सविस्तरपणे वाचायला मिळतं.

काय होता बडोदा डायनामाइट कट…?

आणीबाणीच्या काळात जॉर्ज फर्नांडीस भूमिगत होते. पण जॉर्ज यांचा एकूणच चळवळ्या इतिहास काही त्यांना शांत बसू देत नव्हता. आणीबाणीच्या विरोधात ठोसपणे काहीतरी केलं पाहिजे ज्यातून इंदिरा गांधींना योग्य तो संदेश जाईल असा त्यांचा विचार होता.

भूमिगत जॉर्ज ज्यावेळी गुजरातेत पोहोचले तोपर्यंत त्यांच्या डोक्यात हिंसक मार्गाने का होईना पण आणीबाणी विरोधातील आवाज बुलंद करायचा हे पक्कं ठरलं होतं. त्यातूनच त्यांनी डायनामाईटच्या सहाय्याने बॉम्बस्फोट घडवून आणून सरकारी कार्यालये, रेल्वेचे रूळ नष्ट करण्याची योजना बनवली. या योजनेसाठी डायनामाईट पुरविण्याची तयारी गुजरातमधील मोठे व्यापारी विरेन शहा यांनी दाखवली होती. जे पुढे जाऊन केंद्रात मंत्री देखील बनले.

खरं तर या कटासाठी देशभरातून डायनामाईट जमवण्यात आलं होतं, परंतु मोठ्या प्रमाणातील डायनामाईट गुजरातमधील बडोद्यातून जमवण्यात आलं होतं. शिवाय हा कट बडोद्यातच शिजला होता. त्यामुळे या कटाला ‘बडोदा डायनामाईट कट’ असं नाव मिळालं.

याच कटान्वये इंदिरा गांधी यांच्या सभेपूर्वी जवळच असलेल्या सरकारी इमारतीच्या टॉयलेटमध्ये बॉम्बस्फोट घडवून सभास्थळी गोंधळ उडवून देण्याचा बेत होता. हा सगळा प्रकार हिंसक ठरणार असला तरी बॉम्बस्फोट घडवून आणताना तो अशाच पद्धतीने घडवून आणायचा की ज्यामुळे कुठलीही जीवितहानी होणार नाही, याची दक्षता कटात सहभागी असणारे सगळेचजण घेणार होते.

अॅडव्होकेट पद्मनाभ शेट्टी यांनी ‘आणीबाणी, बडोदा डायनामाईट षडयंत्र आणि जॉर्ज’ या दीर्घ लेखात या कटाविषयी लिहिलंय. ते स्वतः या कटात सहभागी होते. त्यांनी म्हंटल्याप्रमाणे,

“देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणी डायनामाईट पोहोचले सुद्धा होते. तिथे विश्वासू इच्छुक कार्यकर्त्यांना डायनामाईट वापरण्याबद्दल प्रशिक्षण देण्यात आलं होतं. त्यानंतर देशभरातील महत्वाच्या  महत्वाच्या शहरांतील  रेल्वे स्टेशन, रेल्वेचे पूल, रेल्वे रूळ, मुंबईतील एअर इंडियाची इमारत, ब्लिट्झ साप्ताहिक कार्यालय यांसारख्या ५० ठिकाणी ऑक्टोबर १९७५  ते जून १९७६ याकाळात डायनामाईटचे स्फोट घडवून आणत देशात आणीबाणीविरुद्धचे आंदोलन तीव्र होत आहे, असे दाखवून द्यायचे होते.”

एप्रिल १९७६ साली ज्यांच्यामार्फत डायनामाईट घेण्यात आले होते, त्यांच्याच एका नातेवाईकाने पोलिसांना बातमी दिली आणि बडोदा येथे पहिली अटक झाली. त्यानंतर देशाच्या वेगवेगळ्या ठिकाणी अटकसत्र सुरु झालं आणि शेवटी जून १९७६ साली जॉर्ज यांना कलकत्यामधून पकडण्यात आलं.

जॉर्ज यांना अटक झाली असली तरी मुंबईतील कार्यकर्ते मात्र पोलिसांच्या तावडीत सापडले नव्हते. पद्मनाभ शेट्टी आणि यांनी स्वतः सोमनाथ दिघे यांच्या साथीत आणीबाणीच्या वर्षपूर्तीच्या दिवशी किंग सर्कल, माटुंगा स्टेशनच्या ब्रिजवर स्फोट घडवून आणला होता. त्यावेळी एक दगड थेट माटुंगा पोलीस स्टेशनच्या छतावरून आतमध्ये जाऊन पडला होता. त्यामुळे मुंबई पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन जुलै १९७६ साली मुंबईतील सर्व आरोपींना पकडले.

अटकेनंतर घाबरलेले काही आरोपी माफीचे साक्षीदार म्हणून इतरांविरोधात साक्ष द्यायला तयार झाले. त्यानंतर देशभरातील सर्व आरोपीविरोधात सीबीआयमार्फत दिल्लीत खटले चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. जॉर्ज आणि २४ जणांच्या विरोधात दिल्लीतील तीसहजारी कोर्टात खटला चालवला गेला.

कटामागची जॉर्ज यांची भूमिका

कटाचा उद्देश्य लोकांना कुठलीही हानी पोहचवण हा नव्हता तर हा एकप्रकारे हिंसक मार्गाने इंदिरा गांधींच्या आणीबाणीशी केलेला असहकार होता, असं कटातील सहभागींचं म्हणणं होतं. त्यामुळेच हा कट उघडकीस आल्यानंतर ज्यावेळी जॉर्ज यांच्यासह त्यांच्या २४ सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात सादर केलं त्यावेळी जॉर्ज यांनी न्यायालयासमोर एक निवेदन सादर केलं होतं. त्यात त्यांनी स्पष्टपणे म्हंटलय की,

“हुकूमशाही कधीच कायदेशीर, घटनादत्त आणि नैतिक नसते. कारण हुकूमशाहीत जनतेला त्याविरुद्ध लढण्याचा कायदेशीर व घटनात्मक मार्गच शिल्लक उरलेला नसतो. कुठल्याही हुकुमशहाचा आणि हुकुमशाही व्यवस्थेचा हिंसक मार्गाने प्रतिकार करणे किंवा भेकडपणाने तिच्यापुढे मान झुकवून निमुटपणे अन्याय आणि अत्याचार सहन करणे यांपैकी जर एखाद्या गोष्टीची मला निवड करायची असेल  तर मी हिंसेचा मार्ग निवडायला कधीच मागे-पुढे बघणार नाही आणि जनतेला देखील त्याच मार्गाचा अवलंब करायला सांगेन.”

बडोदा डायनामाईट खरंच गरजेचं होतं का..?

जॉर्ज फर्नांडीस यांच्या आयुष्यावरील ‘जॉर्ज: नेता, साथी, मित्र’ या पुस्तकाचे संपादन केलेल्या जेष्ठ पत्रकार जयदेव डोळे यांच्याशी बोलणं झालं. त्यावेळी त्यांनी सांगितलं की आणीबाणीला असलेला विरोध प्रदर्शित करण्यासाठी विरोधकांकडे कुठलाच मार्ग उरलेला नव्हता. अशा परिस्थितीत ज्यावेळी ‘बडोदा डायनामाईट’ची योजना समोर आली त्यावेळी पन्नालाल सुराणा, भाई वैद्य यांसारख्या समाजवादी नेत्यांचा या योजनेस विरोध होता. त्याचं प्रमुख कारण म्हणजे जॉर्ज यांनी स्वीकारलेला हिंसेचा मार्ग.

जॉर्ज फर्नांडीस मात्र आपल्या योजनेवर कायम होते. कारण देशातून आणीबाणी उठवली जाईल आणि इंदिरा गांधी यांची निरंकुश सत्ता संपुष्टात येईल, याविषयी ते साशंक होते. कटाची खूप तयारी करण्यात आली होती. जॉर्ज यांचे बहुतांश मुंबई आणि उत्तर प्रदेशातील कार्यकर्ते हा कट तडीस घेऊन जाणार होते.

“बडोदा डायनामाईट कटामुळे जॉर्जची देशभरात हिरो अशी प्रतिमा निर्माण झाली. परंतु जॉर्जच्या चळवळीतील सहकाऱ्यांना मात्र जॉर्जचा हा मार्ग आवडला नव्हता.  हा कट फसला ते बरंच झालं. नाहीतर जॉर्जला कायमच या आरोपाला तोंड द्यावं लागलं असतं की बघा हे एवढे गांधीवादी-समाजवादी म्हणवून घेतात आणि शेवटी हिंसाच केली”

असं देखील जयदेव डोळे सांगतात.

पुढे खटल्याचं काय झालं..?

जॉर्ज फर्नांडीस आणि विरेन शहा यांच्याव्यतिरिक्त सी.जी.के. रेड्डी, समाजवादी नेते जी.जी. पारीख, गांधीवादी कार्यकर्ते प्रभुदास पटवारी हे देखील या कटाचे प्रमुख सूत्रधार होते. या सर्वांवर दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात खटला सुरु होता. मात्र काही महिन्यानंतरच इंदिरा गांधी यांनी अचानकपणे आणीबाणी उठवली.

आणीबाणी उठविल्यानंतर देश सार्वत्रिक निवडणुकांना समोरा गेला. अटकेत असल्यामुळे १९७७ सालची निवडणूक जॉर्ज यांनी तुरुंगातून लढवली. बिहारमधील मुज्जफ्फरपूर मतदारसंघातून लढत असलेल्या जॉर्ज यांना प्रचारासाठी जामीन नाकारण्यात आला होता. मात्र जॉर्ज त्यावेळी इतके लोकप्रिय होते की मतदारसंघातील जनतेने स्वतःच्या खिश्यातील पैसे खर्च करून जॉर्ज यांची प्रचारमोहीम  राबवली.

निवडणुकांच्या निकालात देशातील जनतेने इंदिरा गांधी यांच्या हुकुमशाहीला मतपेटीतून चोख प्रत्युत्तर देताना इंदिरा गांधींना सत्तेतून खाली खेचलं. संपूर्ण देशभरात काँग्रेसची पीछेहाट झाली आणि मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाचं पहिलं गैरकाँग्रेसी सरकार दिल्लीत सत्तेवर आलं. तुरुंगातून निवडणूक लढवलेले जॉर्ज ३ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने विजयी झाले. सत्तेत आलेल्या जनता पक्षाच्या सरकारने बडोदा डायनामाईट कटातील जॉर्ज यांच्याविरोधातील खटला मागे घेतला आणि जनता पक्षाच्या सरकारमध्ये जॉर्ज फर्नांडीस उद्योगमंत्री झाले.

हे ही वाच भिडू

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.