एकेकाळी बडोदा संस्थानमध्ये दोन बैलांच्या मदतीने रेल्वेगाडी ओढली जायची

गुजरातमधील बडोदा संस्थान हे ब्रिटिश भारतातील एक महत्त्वाचे संस्थान होते. गायकवाड या पराक्रमी मराठा घराण्याचीही राजधानी. या घराण्याने अनेक लोकोत्तर राज्यकर्ते देशाला दिले.

विशेषतः सयाजीराव महाराजांनी बडोदे संस्थानात शिक्षण, राज्यकारभार, ग्रंथालय, वाचनालय, विविध खेळ वगैरे अनेक बाबतींत सुधारणा करून एक आदर्श संस्थानिक म्हणून नाव मिळविले.

इंग्रजी राजसत्तेमध्ये एक स्वाभिमानी व आदर्श संस्थान म्हणून बडोद्याची ख्याती होती.

भारतात रेल्वेचे आगमन झाले १८५३ साली. मुंबई ते ठाणे धावलेल्या या आगगाडीने देशाच्या विकासाचा एक मोठा मार्ग खुला केला. इंग्रजांनी स्वतःच्या फायद्यासाठी म्हणून सर्वत्र रेल्वेमार्ग पसरले.

ज्या संस्थानिकांना रेल्वेचं महत्व पटलं होतं त्यातील पहिलं राज्य होतं गायकवाड यांचं बडोदा.

तत्कालीन महाराज गणपतराव गायकवाड यांनी १८५५ सालीच बडोद्याला रेल्वे आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. सेंट्रल रेल्वेच्या कर्नल जेपी केनडी याला खास निमंत्रण देऊन बोलवण्यात आलं, रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण झाले.

अजून मोठमोठ्या शहरात रेल्वेरुळ पोहचले नव्हते अशा काळी आपल्या राज्यात रेल्वे असावी ही जिद्द गायकवाड यांनी बाळगली होती.

दुर्दैवाने गणपतराव गायकवाड १८५६ मध्ये मरण पावले. त्यानंतर त्यांचे बंधू खंडेराव बडोद्याच्या गादीवर आले. गणपतराव गायकवाड यांचे अधुरे राहिलेलं कार्य त्यांनी आपल्या शिरावर घेतले. गायकवाड्स बरोडा स्टेट रेल्वे या कंपनीची स्थापना केली.

९ जानेवारी १८६१ रोजी बडोद्यामध्ये रेल्वेचे आगमन झाले.

सर्वप्रथम डभोई पासून मियागाम करजण पर्यंतचा १३ किमी लांबीचा लोहमार्ग घातला गेला. हा मार्ग ब्रिटिश भारतातील सर्वप्रथम नॅरोगेज तसेच ब्रिटिश मालकीचा नसलेला लोहमार्ग होता.

गंमत म्हणजे रेल्वेमार्गावर इंजिनाची सोय होण्यापूर्वी दोन बैलांकरवी ही रेल्वेगाडी ओढली जात असे.

पाच डब्यांची प्रवासी व मालवाहतूक करणारी ही रेल्वेगाडी दोन बैल दोन फूट सहा इंचांच्या रेल्वेमार्गावरून सहज ओढत असत. त्यांचा वेग जवळपास २ ते ३ मैल प्रतितास असा होता. पावसाळ्यात रस्ते खराब असल्याने बडोद्याचे शेतकरी कापसाचे भारे प्रत्येकी ३ रुपये या भाड्याने रेल्वेने ने-आण करत होते.

इतकेच नाही तर रेल्वेचे डबे जोडण्यासाठी वा बद्दलण्यासाठी संस्थानच्या हत्तीचा वापर केले जाई.

भारतीय राजाच्या या अस्सल इंडियन जुगाडला इंग्लंडमधील ‘इलस्ट्रेटेड लंडन न्यूज’ या प्रसिद्ध दैनिकाच्या २३ मे १८६२ च्या अंकात उल्लेख करण्यात आला. पाश्चात्य तंत्रज्ञानाला दिलेल्या या भारतीय कल्पकतेच्या मार्गाचे आवर्जून कौतुक करण्यात आले.

पुढील दहा वर्षांत या मार्गावरील रुळ बदलल्यावर  १८७४साली नील्सन ॲंड कंपनीने तयार केलेले पहिले इंजिन या मार्गावर धावले. १८८०नंतर बैलांचा उपयोग थांबून हा मार्ग पूर्णपणे इंजिनांच्या ताब्यात आला.

पुढे महान राज्यकर्ते सयाजीराव महाराज गायकवाड गादीवर आल्यानंतर त्यांच्या काळात जीबीएसआरने आपले लोहमार्गाचे जाळे डभोईला केंद्र करून विस्तारले. अजूनही अस्तित्त्वात असलेले हे लोहमार्गजाळे जगातील सगळ्यात मोठे नॅरोगेज जाळे आहे.

गायकवाड बरोडा स्टेट रेल्वे स्वातंत्र्यानंतर  भारतीय रेल्वेमध्ये विलीन करण्यात आली.

ज मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनची चर्चा सुरू असते तेव्हा बडोदावासीयांना बुलक ट्रेनची आठवण हमखास काढली जाते.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Shivanand Andhale says

    नमस्कार ,
    बोलभिडू हे फेसबुक पेज कोन हातळत याबाबत माझाकडे माहीती नाही. परंतु तुम्ही लिहीलेले भरपुर ब्लाॕग वाचले अभ्यास पुर्ण माहीती देता आपण असेच काम चालू ठेवण्यासाठी आपणास शुभेच्छा !

Leave A Reply

Your email address will not be published.