हुकला तो संपला म्हणणारी स्क्विड गेम, अबूधाबीत सुरु झालिये

हुकला तो संपला म्हणणारी स्क्विड गेम, अबूधाबीत सुरु झालिये

सध्या नेटफ्लिक्सवरच्या ‘स्क्विड गेम’ सिरीजनं अनेकांना येड लावलंय. या कोरिअन वेबसिरीजमध्ये लहानपणी खेळल्या जाणाऱ्या खेळांना खतरनाक तडका देण्यात आलाय. या खेळांमध्ये सहभागी स्पर्धकानं माघार घेतली किंवा खेळात चुकलात तरी शिक्षा एकच आहे, ती म्हणजे थेट ढगात जाणं.

आता सिरीज ट्रेंडिंगमध्ये आहे म्हणल्यावर, त्याची हवा असणारच. अबूधाबीमधल्या कार्यकर्त्यांनी ही हवा जरा वरच्या लेव्हलला नेलिये. तिथं खऱ्याखुऱ्या स्पर्धकांना घेऊन स्क्विड गेमचं आयोजन करण्यात आलंय. सिरीजमध्ये दाखवले गेलेले खेळ इथेही असतील, फक्त हरलेला खेळाडू ढगात जाणार नाही.

या वेब सिरीजमध्ये एकूण सहा खेळ आहेत. त्यातले रेड लाईट-ग्रीन लाईट, डलगोना कँडी, मार्बल्स आणि ड्कजी हे चार खेळ अबूधाबीतल्या स्पर्धेत खेळवले जातील.

रेड लाईट-ग्रीन लाईट

लहानपणी लपाछपीत १०, २०, ३०, ४०, १०० मोजून आपण उरलेल्या भिडूंना शोधायला जायचो. हे आकडे मोजताना हळूच मागे वळून न पाहणारा कार्यकर्ता शोधून सापडणार नाही. या खेळात असलेल्या बाहुलीनं ग्रीन लाईट म्हणल्यावर स्पर्धक चालू लागतात. मध्येच ही बाहुली रेड लाईट म्हणून थांबते आणि मागे वळते. यानंतर, कुठल्याही स्पर्धकाची हालचाल झाली, तर गोळ्या लागून त्याचा थेट बल्ल्या होतो.

डलगोना कँडी

लॉकडाऊनमध्ये कुकरमधले केक आणि डलगोना कॉफी यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. या सिरीजमध्ये असलेल्या डलगोना कँडी गेमनं आता टिकटॉक आणि इन्स्टाग्रामची स्पेस व्यापली आहे. साखरेचा वापर करून बनवल्या जाणाऱ्या या कँडीत छत्री, चांदणी, फुल असे आकार कोरलेले असतात. सुईचा वापर करून हा आकार कोरण्याचं आणि कँडीपासून वेगळा करण्याचं चॅलेंज खेळाडूंसमोर असतं. हे करताना कँडी तुटली, की डोक्यात गोळी आणि खेळ खलास!

मार्बल्स

थोडक्यात कोरिअन गोट्या. पण आपण लहानपणी खेळलो त्या गोट्यांशी याचा फारसा संबंध नाही. आपल्या प्रतिस्पर्ध्याकडे असलेल्या दहाही गोटी आपल्या ताब्यात घेणं एवढंच लक्ष्य यात असतं. समोरच्याच्या मुठीत असलेल्या गोट्यांची संख्या सम आहे की विषम हे ओळखायचं असतं. बरोबर उत्तर दिलं तर गोट्यांचं इनकमिंग होतं आणि उत्तर चुकलं तर आऊटगोईंग. शेवटी ज्या खेळाडूकडे शून्य गोट्या राहतात, त्याची स्पर्धेतून आणि जगातूनही एक्झिट होते.

ड्कजी

समोरच्या खेळाडूनं केलेल्या कागदाच्या घडीवर आपली कागदी घडी फेकून मारायची. जो खेळाडू प्रतिस्पर्ध्याची घडी पालटतो, त्याला समोरच्याकडून शंभरडॉलर्स रोख मिळतात. जर तो हे शंभर डॉलर्स देऊ शकला नाही, तर कानाखाली आवाज काढला जातो.

अबूधाबीमधल्या स्पर्धेत होणाऱ्या या खेळांमधून हिंसा मायनस केली जाणार आहे.

अबूधाबीत ही स्पर्धा १२ ऑक्टोबरपासून सुरू होईल. यात प्रत्येकी १५ भिडूंच्या दोन टीम्स असतील. बाद झालेले खेळाडू मैदानाबाहेरून स्पर्धा पाहू शकतील. स्पर्धेत थरार अनुभवता येणार असला, तरी उगाच फ्लाईट बुक करायच्या भानगडीत पडू नका. कारण, जिंकलात तरी आर्थिक बक्षिसाचा आकडा रुपये शून्य आहे.

गेल्या १० वर्षांत अनेक निर्मात्यांनी स्क्विड गेम सिरीजच्या कल्पनेला रेड लाईट दाखवली होती. अखेर २०१९ मध्ये नेटफ्लिक्सनं ग्रीन लाईट म्हणलं आणि सिरीजच्या निर्मितीला सुरुवात झाली. खरंतर, या स्टोरीवर पिक्चर बनवणार होते मात्र नेटफ्लिक्सनं ‘व्हय पुढं’ म्हणल्यावर निर्मात्यांनी स्टोरीत आणखी मसाला टाकत पूर्ण सिरीजच बनवली. पहिल्या सिझनला मिळालेली लोकप्रियता पाहता सिरीजचा दुसरा सिझनही येणार असल्याची चर्चा आहे.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.