भारतात एक म्हण कायम आहे, “नमक में टाटा और जुतो में बाटा.”

आजही भारताच्या कानाकोपऱ्यात एक म्हण कायम आहे, “नमक में टाटा और जुतो में बाटा.” दोघांचीही विश्वासर्हता म्हणजे डोळे झाकून घ्यावं. मिठाला टाटांनी आणि चपलेला बाटानी ब्रँड बनवल. जस टाटानगर गाव फेमस आहे तसं बाटानगर देखील फेमस आहे. पण बाटा आणि टाटांच काहीही नातं नाही. त्यांचं खरं आडनाव बाटीया. पण ते भारताचे नाहीत.

बाटा आहेत मुळचे युरोपच्या चेक रिपब्लिकचे. गोष्ट आहे १८९४ची.

चेक प्रजासत्ताक तेव्हा ऑस्ट्रो हंगेरी साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता. तिथल्या झिन या गावी हे बाटीया उर्फ बाटा आडनावाचं चर्मकार कुटुंब राहात होतं. पिढ्यानपिढ्या चामड्याची बुटे चपला बनवणे हा त्यांचा उद्योग. पण या कुटुंबात एक उद्योगी पोरगा जन्माला आला, नाव थॉमस. त्याला पारंपारिक टिपिकल कामात रस नव्हता. तो कायम घरात तणतणत असायचा की,

जगात औद्योगिक क्रांती आली आहे, मॉडर्न कारखाने धडधडत आहेत आणि आपण जुन्या पद्धतीने बूट शिवत बसलोय.

अखेर थॉमसने आपल्या लहान भावाला आणि बहिणीला तयार केलं, आई कडून काही पैसे उधार घेतले आणि स्वतःची कंपनी सुरु केली. नाव दिल T. & A. Bata Shoe Companyथॉमस, अॅना व अन्तोनिन या तिघांच्या नावावरून हे नाव ठेवण्यात आलं होतं. बाटांच्या तीनशे वर्षांच्या पिढ्यांचा बूट बनवण्याचा अनुभवाला थॉमसची आधुनिक दृष्टी मिळाली.

पुढच्याच वर्षी त्याने महागड्या चामड्याच्या ऐवजी स्वस्त कॅनव्हासचे शूज बनवायचा प्रयोग केला. तो खूप गाजला. अमेरिकेतून असेंब्ली लाईन मागवून घेतली. धडाक्यात बाटाचे चप्पल बूट बनून बाहेर पडू लागले. दहा कामगार घेऊन सुरु झालेल्या कंपनीमध्ये पाचशे कामगार काम करू लागले. अमेरिकेतून मागवलेल्या मशीन मधून दिवसाकाठी २२००० चप्पल आणि बूट जोड्या बनून बाहेर पडू लागल्या. 

त्यांचं डिझाईन जुन्या स्टाईलच होतं पण फिनिशिंग आधुनिक आणि नीटनेटक होतं. टिकाऊपणामध्ये बाटाचा नाद पूर्ण जगात कोणी करत नव्हत. याच दरम्यान युरोपमध्ये पहिल्या महायुद्धाला तोंड फुटलं. बाटांच झिन गाव झेकोस्लोव्हेकियामध्ये गेलं. कंपनीला मंदीचा मार बसला.  थॉमस बाटा हार मानणाऱ्यातला नव्हता. त्यांनी बुटांच्या किमती अर्ध्याहून खाली आणल्या. त्याची जिद्द बघून कामगारांनी देखील निम्म्या पगारात काम करायचं ठरवलं. थॉमस त्यांचे उपकार विसरला नाही. त्याने जगात बहुदा पहिल्यांदा कामगारांच्या सोबत प्रोफिट शेअरिंग करायचं ठरवलं.

या सगळ्यांच्या मेहनतीचा फायदा झाला. महायुद्धाने बाटाला हात दिला. युरोपमधील प्रत्येक सैनिक युद्धात बाटाचे शूज घालून धावत होता. त्यानंतर आलेल्या महामंदीमध्ये अमेरिकेच्या चप्पल उद्योगाला पार मोडून टाकलं. पण मुसोलिनीने दिलेल्या मोठ्या ऑर्डरमुळे बाटाचा फायदा झाला.

त्यांनी युरोपच्या बाहेर सुद्धा आपल्या फॅक्ट्री सुरु केल्या. यातलीच एक होती भारतात कोलकत्याजवळ. साल होत १९३१. तिथे इंग्रज अधिकारी, ब्रिटीश आर्मीतले जवान यांच्या बरोबर भारतीयांना देखील हे चप्पल बूट आवडले. तोवर बाटाचा निर्माता थॉमस याचा मात्र एका विमान अपघातात मृत्यू झाला होता. त्याच्या नंतर कंपनीचा मालक झालेल्या सावत्र भाऊ जान भारतात बाटाचं एक अख्ख गाव वसवलं. त्याला नाव देण्यात आलं होतं बाटानगर!

बाटानी जगभरात साम्राज्य पसरवलं . त्यांनी आपले स्टोअर्स, कारखाने सुरु केलेच पण बाटानगर प्रमाणे छोटी छोटी औद्योगिक गावेसुद्धा वसवली. बाटाच आणखी एक वैशिष्ट्य पहिल्या  थॉमस बाटांपासून सुरू झालं होतं ते म्हणजे बुटांच्या किंमती कधीही राउंडफिगर मध्ये न ठेवणे. म्हणजे काय तर जे बूट ८०० रुपये किंमतीच आहे त्याला ७९९मध्ये विकायचं. लोकांना वाटताना किंमत कमी वाटते. बाटाची ही शहाणपट्टी अजूनही सुरु आहे. पण आयडिया चांगली चालली.

साधारण १९३८ला दुसर महायुद्ध सुरु झालं. हिटलरचा आधीपासूनच झेकोस्लोव्हेकिया वर डोळा होता. त्याच्या नाझी सैनिकांनी हा देश गिळंकृत केला. एवढच काय तर बाटा कंपनी देखील ताब्यात घेतली. बाटा कुटुंबीयांनी देखील देश सोडला. काही जन अमेरिका तर काही जन कॅनडा ब्राझीलमध्ये गेले. तिथला बिझनेस सांभाळू लागले. झेकोस्लोव्हेकिया पासून चेक प्रजासत्ताक स्वतंत्र झाला तरी तिथल्या कम्युनिस्ट सरकारने बाटांना कंपनीमध्ये घुसू न देता कारखान्याचे राष्ट्रीयीकरण केले.

आज  थॉमस यांचे नातू बाटाचे चेअरमन आहेत. कंपनीच हेड क्वार्टर स्वित्झर्लंडमध्ये आहे पण सर्वात मोठा कारखाना भारतात आहे. लोक वर्षानुवर्षे बाटाचे चप्पल बूट वापरतात आणि अभिमानाने ते सांगतात. भारतापासून अमेरिकेपर्यंत सगळी कडे कानाकोपऱ्यात बाटाची दुकाने पसरली आहेत. 

४९९, ७९९ किंमतीचा चापटरपणा सगळ्यांना कळतोय हे बाटांना देखील ठाऊक आहे पण सव्वाशे वर्षाचा वारसा ते सोडत नाहीत. वेगळेपणा आणि टिकाऊपणा हीच बाटाची ओळख आहे आणि ते ती कायम जपतील.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.