इस्त्रायलच्या पाठ्यपुस्तकात भारतीय सैन्याच्या शौर्याचे धडे आहेत, पण का ?

मध्यंतरी भारताचे पंतप्रधान मोदींचा इस्रायल दौरा झाला होता. या दौऱ्यावेळी तेथील पंतप्रधान नेत्यान्याहू हे सर्व राजशिष्टाचार सोडून विमानतळावर स्वागतासाठी आले होते आणि मोदींच आगमन होताच “आपका स्वागत है मेरे दोस्त” असं हिंदीत म्हणत त्यांना कडकडून मिठी मारली. भारत आणि इस्रायल यांच्या मैत्रीचे नवीन शिखर गाठलं. सध्या सुरु असलेल्या इस्त्रायल व्हर्सेस हमास युद्धात भारतानं इस्त्रायलला पाठिंबा जाहीर केला आहे.

पण शंभर वर्षापूर्वी एका शहरापासून भारत आणि इस्रायलची मैत्री सुरु झाली होती.

हैफा शहर – 

इस्रायल मधलं तिसर सर्वात मोठ शहर. एका बाजूला माउंट कॅरेमल, किशोण नदी तर दुसऱ्या बाजूला भूमध्यसमुद्र. हे शहर युरोप, आशिया, आफ्रिका यांना जोडणाऱ्या सामरिक आणि व्यापारी दृष्ट्या महत्वाच्या पट्यात येते. या शहराचा ज्ञात इतिहास ३००० वर्षे एवढा मोठा आहे. अगदी ख्रिश्चन-मुस्लीम क्रुसेडसची सुद्धा हैफा साक्षी आहे.

पर्शियन साम्राज्य, रोमन साम्राज्य, बायझनटाईन साम्राज्य, अरब आणि अखेर तुर्की ऑटोमन साम्राज्य अशा अनेकानी या शहरावर राज्य केले.

नेपोलियनने सुद्धा काही काळ हे शहर ताब्यात घेतले होते.

१८६८ साली जर्मनी ने हैफा मध्ये ऑटोमन साम्राज्याच्या आशीर्वादाने आपली वसाहत वसवली. तिथून हैफाचा विकास सुरु झाला. त्यांनी आधुनिक पॉवर स्टेशन, कारखाने, रेल्वे सुरु केल्यामुळे हैफाचे वेगाने आधुनिकीकरण झालं. विसाव्या शतकाच्या सुरवातीला हैफा हे औद्योगिक बंदर म्हणून उदयास आलं.

पहिलं महायुद्ध – 

पहिलं महायुद्ध हे ब्रिटन फ्रान्स रशिया या दोस्त राष्ट्र आणि जर्मन साम्राज्य, ऑटोमन साम्राज्य यांच्यात लढले गेले. साहजिकच हैफाचे महत्व वाढले होते.

ब्रिटीशांना कोणत्याही परिस्थितीत हैफा जिंकणे क्रमप्राप्त होते. अन्यथा जर्मनीला आशियात हातपाय पसरवण्याची संधी मिळाली असती.

ब्रिटीश सैन्यातर्फे ही जबाबदारी १५ व्या इम्पेरिअल कॅव्हेलरी डिव्हिजन वर देण्यात आली. जनरल एडमंड अॅलन्बी त्यांच नेतृत्व करत होता. या डिव्हिजन मध्ये समावेश होता तीन भारतीय घोडदलांचा.

म्हैसूर, हैद्राबाद आणि जोधपूर रेजिमेंटची ही घोडदळे त्यांच्या पराक्रमासाठी प्रसिद्ध होती.

२२ सप्टेंबर १९१८ च्या रात्री झालेल्या १३ व्या रॉयल डिविजनच्या ऑटोमन सैन्यासोबत झालेल्या छोटाश्या चकमकी नंतर ब्रिटीशांना वाटले की तुर्कीसैन्याने हैफा सोडून दिले आहे. हवाईदलाने सुद्धा तसाच रिपोर्ट दिला. मात्र २३ तारखेला  भारतीय घोडदळ जेव्हा हैफा जवळ पोहचले तेव्हा त्यांच्यावर मशीनगनचा जोरदार वर्षाव करण्यात आला.

चुकीच्या माहितीमुळे बरेच नुकसान झाले होते. भारतीय सैन्याकडे भाले आणि तलवारी होत्या. त्याच्या सहायाने जर्मन मशीनगनशी सामना करणे अशक्यप्राय गोष्ट होती. तरी शूर भारतीय मागे हटले नाहीत.

चिवट भारतीय जवानांनी हळूहळू हैफाला घेरले.

जोधपुर लान्सर्सना किशोन नदी आणि कॅरेमल टेकड्यांच्या मधून जानारा मार्ग जिंकायची जबाबदारी देण्यात आली होती तर मैसूर लान्सरना शहराच्या पूर्व व पश्चिमेकडून घुसाव्याचे होते. जोधपुर लान्सर्स नी चढाई केली. त्यांच्यावर आभाळातून पाऊस बरसावा तशा गोळ्यांचा वर्षाव झाला. टेकड्यांचा उतार आणि किशोन नदीच दलदल यामुळे सैन्याची कोंडी होत होती तरी त्यांनी चढाई थांबवली नाही. गोळ्यांच्या माऱ्यामध्येही  वेगाने आक्रमण करणारे भारतीय घोडेस्वार ऑटोमन सैन्यासाठी धक्का होता. चिवट भारतीय जवानांनी हळूहळू हैफाला घेरले. जर्मन तोफा आणि मशीनगन्स ताब्यात घेतल्या होत्या. काहीच वेळात ऑटोमन सैन्याने हैफा मधून माघार घेतली.

जोधपुर लान्सर्स नी थाटात हैफा मध्ये प्रवेश केला.

 

Indian lancers in Haifa 1918
जयपूर लान्सर्स चे शूर जवान हैफा शहरात प्रवेश करताना

दोन्ही सैन्यामध्ये फरक होता तो विजीगिषु वृत्तीचा. भारतीयांनी कणखर मानसिकता दाखवली. जोधपुर लान्सर्स नी थाटात हैफा मध्ये प्रवेश केला. साडेतेराशे तुर्की आणि जर्मन युद्धकैदी ताब्यात घेण्यात आले.८ भारतीय जवान याकामी शहीद झाले. दोघांना ऑर्डर ऑफ मेरीट तर तिघांना मिल्ट्री क्रोस देण्यात आले. तरी २१ मे १९१९ ला ब्रिटीश संसदेत अर्ल ऑफ मेयो ने भारतीय सैन्याच्या पराक्रमाला उचित सन्मान मिळाला नाही असे उद्गार काढले होते. आधुनिक मशीनगन विरुद्ध पारंपारिक भालाधारी घोडदळ असे हे विश्वातले हे शेवटचेच युद्ध ठरले. तुर्की कचाट्यातून हैफा ची सुटका झाली. पुढे स्थापन झालेल्या ज्यूंच्या इस्रायलला ब्रिटीशांचा हा विजय आधारभूत ठरला.

या युद्धानंतर हैफाला हजारो वर्षानंतर स्थैर्य मिळाले.

इस्रायली लोक या बद्दल ऋणी आहेत. त्यांनी या युद्धाची आठवण म्हणून हैफा येथे स्मारक उभारले आहे. इस्रायलच्या पाठ्यपुस्तकामध्ये भारतीय सैन्याच्या पराक्रमावर धडे आहेत.

ब्रिटीश सरकारने देखील दिल्लीमध्ये या घटनेच्या स्मरणार्थ म्हैसूर जोधपुर आणि हैद्राबाद घोडदलाच्या स्मरणार्थ तीन मूर्ती स्तंभ उभारला आहे.

पुढे स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू याच तीनमूर्ती भवन बंगल्यात वास्तव्यास होते. नेत्यान्याहू  यांच्या भारतभेटी वेळी येथील चौकाचे नामकरण तीनमुर्ती हैफा चौक असे करण्यात आले.

२३ सप्टेंबरला भारतीय सैन्यातर्फे ” हैफा दिवस ” साजरा करण्यात येतो.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.