सारागढीची लढाई : १० हजार अफगाण विरुद्ध सीख रेजिमेंटचे २१ सैनिक.

मध्यंतरी आलेला केसरी हा सिनेमा अक्षयकुमारचा सर्वात चांगला सिनेमा आहे, अशी कुजबूज ऐकिवात होती. अनेकांनी हा सिनेमा हॉलीवूडच्या 300 ची आठवण करून देणारा आहे अस सांगितलं जात होतं . या सिनेमाच्या ट्रेलरची सुरवातच झाली होती ती,

इक गोरे ने कहां था कि, तूम गुलाम हों.

हिंदूस्तान की मिेट्टी से गुलाम पैंदा होते हैं,

आज जवाब देने का वक्त आ गया हैं… 

या वाक्याने. 

साहजिक प्रश्न पडला असेल हि सारागढी युद्धाची काय भानगड असेल. म्हणजे सिनेमा पाहून देखील अनेकांना हा प्रश्न पडू शकतो, खरच अस शक्य आहे का? इकडे २१ आणि समोर थेट १० हजार. तरिही युद्ध झालं. सारागढी बॅटल इतक प्रसिद्ध असेल तर अजून वाचणात का आलं नव्हतं वगैरे वगैरे.. 

असो, तर आपण नेहमीप्रमाणे थेट मुद्यावर हात घालू, 

केसरीच्या निमित्ताने तुम्हाला आज सारागढी बॅटल बद्दल सांगणार आहोत, 

सारागढी युद्ध झालं ते साल होतं १२ सप्टेंबर १८९७. सारागढी चौकी नावाने सध्याच्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सिमेवर एक चौकी होते. खैबर खिंडीचा जो भाग ओळखला जातो त्या दरम्यान सारागढी नावाची एक इंग्रजांची चौकी होती.

इतिहासाच्या पानांवर इथल्या दोन किल्यांची निर्मीती पंजाबचा राजा रणजीतसिंहाने केलेली. त्या दोन किल्यांची नावे होती, गुलिस्तान आणि लोखार्ड. यांच्या मध्ये सारागढी नावाची चौकी होती. सन १८९७ च्या सुमारास इंग्रजांना कोणत्याही परस्थितीत अफगाणिस्तानवर वर्चस्व मिळवायचं होतं. याच कारणाने ठिकठिकाणी चौक्या उभारुन त्यांची जबाबदारी ब्रिटीश सैन्याकडे अर्थात (ब्रिटीश राजवटीत लढणाऱ्या भारतीयांकडे) देण्यात आली होती. 

सारागढी चौकीची जबाबदारी होती ती ३६ सीख रेजिमेंटचा प्रमुख शिपाई असणाऱ्या ईशर सिंह याच्यावर. केसरी फिल्ममध्ये अक्षय कुमारा ज्याचा रोल करतोय तोच हा ईशर सिंह. ईशर सिंह यांच्याकडे २० शिपायांसोबत या चौकीवर थांबून सुरक्षेची जबाबदारी होती. 

ती तारीख होती १२ सप्टेंबर १८९७ ची. सकाळचे दहा वाजले होते.

किल्यासारख्या असणाऱ्या या सारागढी चौकीच्या बाहेर अफगाणिस्तानच्या ओराक्जई सैन्याने हल्ला करण्याचे नियोजन केले होते. बघता बघता चौकीच्या बाहेर अफगाणि सैन्याची १० हजार सैनिक हजर झाले. आत्मसर्पण करण्यासाठी पुकारा करण्यात आला. 

इकडे ईशरसिंह यांच्याकडे फक्त काही बंदुका आणि २० सैनिक होते. स्वत: ईशरसिंह सैन्यामध्ये हवलदार या पोस्टवर होते. बाकीच्या २० पैकी कोणी आचारी म्हणून काम करत असे तर कोणी तार पाठवण्याच काम करायचां. ईशर सिंह यांनी कॅप्टन हौथटन यांना हि बातमी तारवरुन कळवली. आम्हाला अतिरिक्त सैन्याची गरज असल्याचं सांगण्यात आलं. कॅप्टन होथटन यांची तार आली की, इतक्यात राखीव सैन्य तिथे पोहचू शकणार नाही. तुम्ही आत्मसमर्पण करुन चौकी सोडू शकता. 

पण हवलदार ईशर सिंह यांनी त्यांचा शब्द ऐकला नाही. काहीही झालं तरी लढायचा निर्णय त्यांनी घेतला. आपल्याबरोबर जे लढणार नाहीत त्यांना घुशाल मागे फिरण्यास सांगितलं. पण सोबत असणाऱ्या वीस जणांनी ईशरसिंह यांच्या सोबत लढण्याचा निर्णय घेतला. 

युद्धास सुरवात झाली.

किल्याप्रमाणे रचना असणाऱ्या सारागढी चौकीभोवती अफगाणी सैन्याने कडे निर्माण केले. इकडून बंदुकांच्या फैरी झडू लागल्या. बघता बघता रक्तांचा पाट वाहू लागला. अफगाणी सैन्याचा एकएक करत प्रत्येक सैनिक मागे फिरत होता. चार पाच तास युद्ध सुरू होतं पण अफगाणच्या १० हजार सैनिकांनी ३६ सीख रेजिमेंटच्या २१ सैनिकांना रोखता येत नव्हतं. 

अखेर किल्याची तटबंदी पाडण्यात अफगाणी सैन्य यशस्वी झालं. सैन्य चौकीत घुसले पण २१ सैनिक सारागढी लढवत राहिले. एक एक करत अफगाणी सैनिकांचा खातमा होत होता. आणि त्या एका क्षणी ईशर सिंग यांच्यावर वार करण्यात आला. अस सांगितलं जातं की जवळ जाता येत नव्हतं म्हणून अफगाणी सैन्याने कापडाचे जळते बोळे त्यांच्या अंगावर फेकून मारले. या युद्धात शेवटचा सैनिक मारला गेला तो गुरमुख सिंह. गुरमुख सिंह युद्धाची सगळी हकीकत तार पाठवून कर्नल हौथटन यांना देत होता. शिपायी गुरमुख सिंह शहिद झाले आणि अफगाणी सैन्याने संध्याकाळच्या सुमारास सारागढी चौकी ताब्यात घेतली. 

सारागढी ताब्यात घेतल्यानंतर अफगाणी सैन्याची नजर गुलिस्तान किल्याकडे गेली.

पण १३ सप्टेंबरच्या रात्रीच अतिरिक्त कुमक तिथे पोहचली. त्या फौजेने अफगाणी सैन्याचा पराभव केला. कर्नल होथटन हजर झाल्यानंतर त्यांनी पाहिलं की २१ सैनिकांनी १०,००० सैन्याचा सामना तर केलाच पण या सैनिकांनी सुमारे ६०० अफगाणी सैनिकांना मारलं होतं. 

हवालदार ईशरसिंह आणि त्यांच्यासोबत लढलेल्या २० सैनिकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. आत्ताच्या परमवीर चक्राच्या दर्जाचा समजला जाणारा इंडियन ऑर्डर ऑफ मेरिट नावाचा पुरस्कार या सैनिकांना देण्यात आला. त्याच बरोबर १२ सप्टेंबर हा दिवस सारागढीं डे म्हणून साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले. आजही ब्रिटीश सैन्यामार्फत हा दिवस सारागढी डे म्हणून साजरा करण्यात येत असल्याचं सांगितलं जातं. 

घटनेनंतर काही दिवसातच शीख समाजाकडून त्यांच्या नावाने गुरूद्वारे उभारण्यात आले. पहिला गुरूद्वारा सारागढीच युद्ध ज्या ठिकाणी झालं तिथेच उभारण्यात आला. त्यानंतर अमृतसर येथे गुरूद्वारा सारागढी नावाने दूसरा तर फिरोजपुर येथे तिसरा गुरूद्वारा उभारण्यात आला.

गुरूद्वारा सारागढी येथे या शुरवीर सैनिकांचे नावे लिहण्यात आली आहे, ती खालीलप्रमाणे आहे. ईशर सिंह यांच्यासोबत गुरमुख सिंह, चंदा सिंह, लाल सिंह, जीवन सिंह, बूटा सिंह, जीवन सिंह, नन्द सिंह, राम सिंह, भगवान सिंह, भोला सिंह, दया सिंह, नारायण सिंह, साहिब सिंह, हिरा सिंह, सुन्दर सिंह, उत्तर सिंह, करमुख सिंह, गुरमुख सिंह, भगवान सिंह, राम सिंह.

हे ही वाचा.

Leave A Reply

Your email address will not be published.