बटुकेश्वर दत्त स्वतंत्र भारतात रस्त्यांवर बिस्किट विकत होते.. 

स्वातंत्र आंदोलनाचं कोणतही “मुल्य” नसतं ती “जबाबदारी” होती, म्हणून मी आंदोलनात सहभागी झालो होतो. आपल्या करारी शब्दांनी त्यांनी स्वातंत्रसैनिकांना देवू केलेली पेन्शन नाकारली होती. भगतसिंग फाशी जाताना आपल्या आईला म्हणाले होते, बटुकेश्वर दत्तच्या रुपात मी तुझ्या समोर जिवंत असेल. तो माझा मित्र आहे आणि माझा प्राण देखील. भगतसिंग यांच्या याच शब्दांमुळे बटुकेश्वर दत्त यांचा उल्लेख “दत्त भगत सिंग” असा केला जायचा. पंजाबच्या मातीने भगतसिंग यांच्या पश्चात त्यांच्याकडे दूसरा भगतसिंग म्हणूनच पाहिलं. 

पण, 

इतिहासातले हे पण खूप मोठ्ठे असतात. कधी अन्याय तर कधी शोकांतिका सांगणारा शब्द पण समोर येतो. असाच पण, परंतु मधून व्यक्त होणारी शोकांतिका होती ती बटुकेश्वर दत्त यांची. 

भर तारुण्यात बटुकेश्वर दत्त भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्यासोबत सहभागी झाले. हिंदुस्तान सोशॅलिस्ट रिपब्लिकन आर्मी मार्फत “आझादी कें मतवाले” म्हणून या तरुण पोरांनी आपलं आयुष्य भारताच्या स्वातंत्र्यासाठी अर्पण केलं होतं. बटुकेश्वर दत्त यांचा उल्लेख हुशार आणि डोक्याने काम करणारा मुलगा म्हणून केला जायचा. त्याचमुळे भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांच्यावर असेंम्बलीत बॉम्ब फेकण्याची जबाबदारी आली. 

बहिऱ्या इंग्रज सरकाराच्या कानाखाली स्फोट झाला. बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंग यांनी असेंम्बलीत बॉम्ब फोडला, सैडर्सची हत्या करण्यात आली. पुढे या क्रांन्तीकारकांना अटक करण्यात आली. बटुकेश्वर दत्त, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आणि १८ जण एकाच जेलमध्ये होते. बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंग यांना असेंम्बलीमध्ये बॉम्बस्फोट घडवल्याबद्दल जन्मठेप घोषीत करण्यात आली. त्यानंतर स्पेशल ट्रिब्युन स्थापन करुन लाहोर कॉन्फरेंन्सी आणि सैंडर्स हत्या केल्याबद्दल आरोपपत्र दाखल करण्यात आलं.

हे आरोपपत्र दाखल करताना ब्रिटीश शासनाकडून १८ जणांपैकी फक्त तिघांवरच आरोपपत्र दाखल करण्यात आलं. भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना दोषी मानून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. बटुकेश्वर दत्त यांची जन्मठेपेची शिक्षा कायम होती. 

एका रात्र, त्या रात्री बटुकेश्वर दत्त यांची रवानगी काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी करण्यात येणार होती. देशासाठी जगण्यामरण्याचं स्वप्न पाहणारे भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त त्या रात्री एकत्र होते. वेगळे होताना भगतसिंग यांनी आपल्या डायरीत बटुकेश्वर दत्तची सही घेतली. 

पुढे बटुकेश्वर दत्त अंदमानात काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी गेले. ते तिकडे असताना भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना फासी देण्यात आली. इकडे बटुकेश्वर दत्त काळ्या पाण्याची शिक्षा भोगत राहिले. 

१९३६ साली कॉंग्रेसचे प्रांतिक सरकार स्थापन झाले, राजेंद्र प्रसाद यांनी मार्ग काढून त्यांची रवानगी पटणाच्या जेलमध्ये करावी असं सांगितलं. सरकारमार्फत मागणी मान्य करण्यात आली. बटुकेश्वर दत्त यांची रवानगी पटनाच्या जेलमध्ये करण्यात आली. काही वर्षात बटुकेश्वर दत्त यांची मुक्तता करण्यात आली. पण भगतसिंगचा सहकारी असणारा या तरुण शांत बसणाऱ्यामधला नव्हता. त्यांना चले जाव चळवळीत भाग घेतला. भारताच्या स्वातंत्र आंदोलनात पुन्हा त्याच जोमाने सहभागी झाली. पुढे भारत स्वातंत्र झाला. 

सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे भारत स्वातंत्र झाल्यावर त्यांच्यावर पोलिसांमार्फत लक्ष ठेवण्यात आलं, कारण अस होतं की काही स्वातंत्रसैनिक भारत आणि पाकिस्तान एक करण्यासाठी झटू शकतात. बटुकेश्वर दत्त यांनी स्वातंत्रसैनिक म्हणून मिळणारी पेन्शन घ्यायला देखील नकार दिला ते म्हणाले ते माझं कर्तव्य होतं. कर्तव्याची पेन्शन कशी असू शकेल. 

स्वतंत्र भारतात त्यांनी अंजली दत्त सोबत लग्न केलं. भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढलेले बटुकेश्वर दत्त आत्ता सुखी संसाराची स्वप्न पहात होते. पण देशासाठी लढणारा हा क्रांन्तीकारक इथे आपल्या प्रामाणिकपणामुळे चुकला होता. 

बिहारच्या पटनामध्ये त्यांना कोणीच ओळखत नव्हते. पटना शहरात ते रस्त्यांच्या कडेला उभा राहून बिस्किट विकू लागले. बिस्किट विकून मिळणाऱ्या पैशातून त्यांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालू लागला. स्वातंत्र्यासाठी लढणारे सैनिक एकतर सत्तेला चिकटले होते नाहीतर आपल्या लढ्याचे किस्से सांगत सुखाने जगत होते पण बटुकेश्वर दत्त मात्र या काळात चार पैशासाठी लढत राहिले. 

त्यांच्यावर कोणाच लक्ष नव्हतं. बटुकेश्वर दत्त हे नाव देखील लोक स्वतंत्र भारतात विसरुन गेले होते. पण त्यांच्यावर एका माणसाच लक्ष होते. ते म्हणजे राजेंद्र प्रसाद. राजेंद्र प्रसाद यांनी बटुकेश्वर दत्त यांना पटना ते आरा बस चालवण्याचं लायसन्स देण्यात याव अशी शिफारस जिल्हाधिकाऱ्यांना केली. जिल्हाधिकाऱ्यांनी बटुकेश्वर दत्त यांना बोलावून घेतलं. राजेंद्र प्रसाद यांनी तुम्हाला बसच परमिट देण्यासाठी सांगितलं आहे अस सांगितलं आणि त्यांच्याकडे,

“पुरावा म्हणून तुम्ही स्वातंत्रसैनिक असल्याचं प्रमाणपत्र आणण्यासाठी सांगितलं”. 

बटुकेश्वर दत्त यांच्या आयुष्यातली सर्वात मोठ्ठी शोकांतिका होती. भगतसिंग यांचे सहकारी असणारे, काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेल्या क्रांन्तिकारकाकडे पुरावा मागण्यात आला होता. बटुकेश्वर दत्त तिथून निघून आले. राजेंद्र प्रसाद यांनी चौकशी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना पुरावा मागितल्याची घटना समजली. राजेंद्र प्रसादांनी जिल्हाधिकाऱ्यांना बोलावून सुनावलं. तू कोणाला पुरावा मागत होतास ते सांगितलं. जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांना ते बटुकेश्वर दत्त होते समजलं तसं त्याने त्यांच्या घरी जावून त्यांना बसचं लायसन्स देवू केलं. 

पण बटुकेश्वर दत्त यांना याचा काहीच फायदा नव्हता. त्यांना बस चालवता येत नव्हती की त्यांच्याकडे एखादी बस घेण्याएवढे पैसे होते. गरिबीतच त्यांच आयुष्य जाणार होतं. बिस्किट विकायचं बंद करुन त्यांनी एका सिगरेटच्या कंपनीत काम करण्यास सुरवात केली. एका कामगारासारखा हा क्रांन्तीकारक कामावरती जात होता. 

अखेरच्या क्षणी अचानक त्यांना विधानपरिषदेवर घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तो का घेतला ते देखील एक कोडच होतं. पण हि सदस्यता फक्त सहा महिन्यासाठी होती. सहा महिने त्यांना “आमदार” करुन पुन्हा गरिबीत सोडून देण्याच कर्तृत्व आपल्या राज्यकर्त्यांनी दाखवलं होतं. 

अखेरच्या काळात त्यांना टिबीने ग्रासल. हलाखीच्या परस्थितीत बटुकेश्वर दत्त आपल्या आयुष्याचा शेवट पाहू लागले. या काळात त्यांच्या मदतीला कोण आलं माहित आहे का? 

ते आजाराने आणि गरिबीने खितपत पडले असताना त्यांच्या मदतीला आली ती भगतसिंग यांची आई.

भगतसिंग जाताना सांगून गेले होते मी बटुकेश्वरच्या रुपात असेल. बटुकेश्वरला घेवून त्या दिल्लीच्या एम्समध्ये गेल्या. भगतसिंग यांची आई अखेरच्या क्षणी दिल्लीच्या एम्समध्ये चटई टाकून झोपायची. आपल्या मुलाप्रमाणे ती सगळीकडे भटकून बटुकेश्वर दत्त यांच्यासाठी मदत गोळा करत होती. पंजाब सरकार त्यांच्या पाठीशी उभा राहिलेलं. भगतसिंग यांच्यासारखाच अभिमान बटुकेश्वर दत्त यांच्याबद्दल होता. पंजाबच्या जनतेने पैसे गोळा करुन त्यांना शेवटच्या काळात मदत केली. पण वेळ गेली होती २० जुलै १९६४ साली बटुकेश्वर दत्त यांच निधन झालं. 

बटुकेश्वर दत्त यांच निधन झाल्यानंतर मोठ्या अभिमानाने त्यांना भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या समाधीस्थळावर आणण्यात आलं. तिथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले व त्या तीन मित्रांच्या शेजारीच त्यांची समाधी करण्यात आली. त्यांच्या एकुलत्या एका मुलीचं लग्न भगतसिंग यांच्या आईने लावून दिलं. 

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.