अर्थव्यवस्थेची घडी कशी बसवावी हे मराठा महाराणीने अख्ख्या देशाला शिकवलं

आपला भारत घडवण्यात मराठी माणसांची फार मोठी आणि मोलाची भूमिका आहे. महाबली शहाजीराजे, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रेरणेतून स्वराज्य उभं राहिलं. स्वराज्याची परंपरा पुढंही चालत राहिली. मराठ्यांच्या सरदारांनी स्वराज्याच्या सीमा भारतभरात अनेक ठिकाणी पसरवल्या आणि देशाच्या उभारणीत मोलाचं योगदान दिलं. केवळ शस्त्र आणि अस्त्रच नाही, तर एका मराठी महाराणीनं अनेक वर्षांपूर्वी सगळ्या देशाला अर्थव्यवस्था कशी चालायची याचा आदर्श घालून दिला होता.

त्या होत्या ग्वाल्हेरच्या महाराणी बायजाबाई शिंदे.

मूळच्या कागलच्या घाटगे घराण्यातल्या. त्यांच्या वडिलांचे नाव सखाराम घाटगे सर्जेराव ही त्यांना पदवी होती. बायजाबाई यांना राजकारभारापासून ते घोडसवारी पर्यंत प्रत्येक गोष्टीच प्रशिक्षण दिलं होतं. बायजाबाई तलवारबाजी मध्ये देखील निपुण होत्या. दिसायला त्या प्रचंड देखण्या होत्या. कित्येक इतिहासकारांनी ‘दक्षिणची सौंदर्यलतिका’ अशी संज्ञा दिली आहे. 

सर्जेराव घाटगे हे कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचे मानकरी होते. तेव्हा पेशवाईच्या गादीवर दुसरे बाजीराव बसले होते. पराक्रमी घाटगेंना कोल्हापूर गादीपासून सातारच्या बाजूने वळवण्यासाठी म्हणून त्यांनी बायजाबाई यांचं महादजी शिंदेंच्या वारसदाराशी म्हणजे दौलतराव शिंदेंशी लग्नाचा घाट घातला.

सुरवातीला सर्जेराव घटगे या लग्नासाठी तयार नव्हते. पण बाजीराव पेशव्यांनी बऱ्याच कष्टाने त्यांचे मन वळवले.  हे लग्न पुणे मुक्कामी इ.स. १७९८ च्या मार्च महिन्यांत मोठया थाटाने झाले.

लग्न झाल्यानंतर दौलतराव शिंदेंच्या प्रत्येक मोहिमेत बायजाबाई देखील आघाडीवर राहू लागल्या. त्यांच्या पराक्रमामुळे खुश झालेले दौलतराव महाराज राज्यकारभारात देखील आपल्या या लाडक्या पत्नीचा सल्ला घेऊ लागले. बायजाबाई यांच्या प्रभावामुळेच दौलतरावांनी आपले सासरे सर्जेराव घाटगे यांना शिंदेशाहीचा दिवाण म्हणून नेमले.

सर्जेराव घाटगे आणि बायजाबाई शिंदे हे प्रखर राष्ट्राभिमानी होते. त्यांनी दौलतराव शिंदेंना ब्रिटिश सत्तेच्या विरुद्ध बंद पुकारण्यास प्रेरित केले. त्यांच्या प्रभावाखाली येऊनच शिंदेंच्या फौजा ब्रिटिशांशी भिडल्या. १८०३ साली असाई येथे झालेल्या इंग्रज-मराठा युद्धात दौलतराव शिंदेंच्यासोबत हातात तलवार घेऊन बायजाबाई शिंदे देखील युद्धआघाडीवर उपस्थित होत्या.

मात्र या युद्धात दुर्दैवाने इंग्रज अधिकारी आर्थर वेलस्ली याच्या पराक्रमापुढे मराठी सेनेचा निभाव लागला नाही. पुढे घाटगेंचा शिंदेंच्या राजकारणात वाढलेला प्रभाव कमी करण्यासाठी सर्जेरावांची हत्या करण्यात आली. 

पण त्यांच्या जागी बायजाबाई यांनी आपला धाकटा बंधू हिंदुराव याला शिंदेंचा दिवाण बनवलं.

पुढे दौलतराव १८२७ साली मरण पावले. तेव्हा बायजाबाई यांनी गादीस वारस दत्तक न घेता, सर्व कारभार आपल्या हातांत घेतला. परंतु संस्थानच्या गादीचा धनी करण्याकरिता दत्तक पुत्र घ्यावा
अशी सर्व नागरिक जनांची इच्छा होती, व तशी इच्छा ब्रिटिश रेसिडेंट ह्यानेंही व्यक्त केली होती. नागरिकांच्या इच्छेवरून त्यांनी शिंदे घराण्यापैकी पाटलोजी म्हणून जे पुरूष होते, त्याचा पुत्र
मुकुटराव हा बारा वर्षांचा असता दत्तक घेतला. त्याला नाव दिले जनकोजी.
महादजींच्या काळात शिंदेशाहीने संपूर्ण भारतावर राज्य केलं होतं. प्रचंड दौलत कमावली होती. दूरदृष्टीच्या महादजींनी हि संपत्ती ग्वाल्हेरच्या किल्ल्याच्या तळघरात ठिकठिकाणी पुरून ठेवली होती. याला गंगाजळी असे म्हणत. पुढील काळात निधी लागेल त्याप्रमाणे येथील पैसा राज्यकारभारासाठी काढून घेतला जात असे.

एकंदरीत ग्वाल्हेर संस्थान हे देशातील सर्वात श्रीमंत राज्यांपैकी एक होते.

बायजाबाई यांनी राज्याची आर्थिक घडी व्यवस्थित बसवली. त्या राज्यकारभार, युद्धनीतिशास्त्रात निपुण होत्या त्याप्रमाणेच त्यांचे अर्थशास्त्राचे ज्ञान देखील वाखाणण्याजोगे होते. दौलतराव शिंदे हयात असल्याच्या काळापासून त्यांनी बँकिंग क्षेत्रात रस घेतला होता.
इंग्रजानी भारतात प्रवेश केल्यापासून व्यापारात प्रचंड वाढ झाली होती. अफूच्या व्यापाराने भारतात मोठ्या प्रमाणात पैसा आणला होता. विशेषतः मध्यभारतात याची शेती वाढली. संपूर्ण जगभरात भारतातली अफू निर्यात होऊ लागली. 
या व्यवहारासाठी अनेक व्यापाऱ्यांना पैशांची आवश्यकता असायची. वेगवेगळ्या संस्थानांचा युद्धाच्या निमित्ताने देखील मोठ्या प्रमाणात पैसे खर्च व्हायचा. बायजाबाई यांनी अशांना  कर्जाऊ रक्कम देण्यास सुरवात केली. उज्जैन हे शहर त्याकाळी भारताच्या आर्थिक घडामोडीचे केंद्र स्थान बनले होते. बायजा बाई या उज्जैन मधल्या नाथजी किशन दास आणि नाथजी भगवान दास या दोन बँकिंग फर्मच्या प्रमुख होत्या. अगदी बनारस येथे देखील त्यांनी आपली बँक सुरु केली होती.

भारताच्या पहिल्या महिला बँकर म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं.

महाराणी बायजाबाई यांच्याकडे खुद्द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी देखील पैसे कर्जाऊ घेत होती. त्यांना दिलेल्या ८० लाखाच्या कर्जाचा  वापर करून बायजाबाई यांनी ब्रिटिश रिजेंटला आपल्या मुठीत ठेवले होते. हे कर्ज फेडण्यासाठी इंग्रजानी इतर सावकारांची मदत घेण्याचा प्रयत्न केला पण बायजाबाईंचा दबाव एवढा मोठा होता की कोणीही हे कर्ज देण्यास पुढे आले नाही. पुढे काही काळाने कंपनीने कसेतरी करून हे कर्ज फेडले मात्र त्यात त्यांना लष्करी आणि आर्थिक मोठी  लागली.

बायजाबाईंच्या राज्यकौशल्याचे वर्णन ब्रिटिश गॅझेटमध्ये देखील केलेले आहे. त्यात लिहिलंय की,

 रिजंटबाई म्हणजेच बायजाबाई अत्यंत नियमितपणे कारभार चालवत असून दिवंगत राजे दौलतरावांपेक्षाही तो चांगला आहे,

मिल्स हिस्ट्रीमध्ये बायजाबाई शिंदे या तेजस्वी, सत्वशील आणि कडक स्वभावाच्या होत्या असं म्हटलं आहे. ब्रिटिश अधिकाऱ्यानी पाठवलेल्या लंडनला पाठवलेल्या पत्रात देखील त्यांचा गौरवास्पद उल्लेख केलेला आढळतो.

बायजाबाईनी आपली स्वतंत्र चलनव्यवस्था बनवली होती. त्यांनी आजवरच्या युद्धांमध्ये झालेले ग्वाल्हेरचे नुकसान त्यांनी अत्यंत कमी कालावधीमध्ये भरून काढले. हा मिळालेला पैसा जनतेच्या सोयीसुविधांसाठी खर्च केला.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांप्रमाणे देशभरात अनेक ठिकाणी त्यांनी मंदिरे बांधली, धर्मशाळा उभारल्या. 

औरंगजेबाने पाडलेले बनारसचे काशीविश्वेश्वराचे मंदिर अहिल्याबाईंनी पुन्हा उभारले तर त्याचा ज्ञानवापी मंडप बायजाबाईनी बांधला. तिथला शिंदे घाट हा देखील बायजाबाईंच्या काळात साकार झाला. पंढरपूर येथे महाद्वार घाटावर शिंदेसरकारचा मोठा भव्य असा वाडा आहे. या वाड्याच्या आत द्वारकाधिशाचे मंदिर बायजाबाई शिंदे या ग्वाल्हेरच्या राणी साहेब यांनी बांधलेले आहे.

बायजाबाई यांची एकंदर राजकीय कारकीर्द इ.स. १८२७ पासून इ.स.१८३३ पर्यंत सरासरी सहा वर्षेच चालली, परंतु तेवढया अवधीमध्ये त्यांनी मोठया दक्षतेने व शहाणपणाने राज्यकारभार चालविला.

पुढे राज्यांत जनकोजी शिंदे व बायजाबाई यांचा बेबनाव होऊन राज्यांत बंडही झाले. बायजाबाईंना सत्तेतून हटवण्यात आले

पुढे जनकोजी शिंदे यांचा देखील अकाली मृत्यू झाला. निधनासमयी दुर्दैवाने त्यांनाही मुलबाळ नव्हते. त्यामुळे, त्यांची पत्नी ताराबाई शिंदे ह्यांनी हनुमंतराव शिंदे यांचा मुलगा भगीरथराव याला दत्तक घेतले. पुढे हाच जयाजीराव शिंदे या नावाने ओळखला गेला.
यानंतर बायजाबाई ग्वाल्हेर मुकामी जयाजीराव शिंदे यांच्याजवळचं राहिल्या. बायजाबाई या काळातही सक्रीय होत्या, अन त्यांचे भाऊ त्यात त्यांना मदत करत होते.

पुढे जेव्हा १८५७चे युद्ध झाले तेव्हा त्याच्या आधी सहा महिने अगोदर मथुरेला त्यांनी मोठ्या यज्ञाची घोषणा केली गेली. यज्ञात सहभागी होणाऱ्या ब्राम्हणांना सात लाख रुपये दक्षिणा देण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले. या यज्ञाच्या निमित्ताने गोपनीय माहितीची देवाण-घेवाण सुकर झाली.

नेक राजांचे राजगुरू संदेश घेऊन सगळीकडे संचार करू लागले. हा यज्ञ ग्वाल्हेरच्या बायजाबाई शिंदे यांनी आयोजित केला.

१८५७ चे स्वातंत्र्यसमर फसले पण या राणीसाहेबांचा दबदबा सर्वत्र पसरला होता.

ता. २७ जून इ.स. १८६३ रोजी, या महान राज्यकर्त्या बायजाबाई कैलासवासी झाल्या. विद्वानांनी यांच्याबद्दल जे धन्योद्गार काढिले आहेत, ते त्यांची खरी योग्यता व्यक्त करतात. तत्कालीन ‘मुंबई गॅझेट’ पत्रांत बायजाबाईसाहेब संबंधाचे जे मृत्युवृत्त आले त्यांत असे म्हटले होते की,

”बेगम सुमरू, नागपुरची राणी, झांशीची राणी, लाहोरची चंदाराणी आणि भोपाळची बेगम या सुप्रसिध्द स्त्रियांमध्ये ही राज स्त्री ही आपल्या परीने प्रख्यात असून, ह्यांनी अनेक वेळा आपल्या देशाच्या शत्रूशी घोडयावर बसून टक्कर दिली होती.”

हे ही वाच भिडू.
Leave A Reply

Your email address will not be published.