लक्षात घ्या त्याला रेड नाही म्हणत…इन्कम टॅक्सच्या सर्व्हे आणि सर्च मध्ये हा फरक असतोय…

ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन म्हणजेच BBC च्या दिल्ली आणि मुंबईतल्या ऑफिसवर आयकर विभागाचे छापे पडल्याच्या बातम्या दुपार पासून आपण वाचतोय. 

आयकर विभागानं आज सकाळी बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबई शहरांमधले कार्यालय सील केलेत, कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांना एका खोलीत एकत्र करण्यात आलं, त्यांचे फोन जप्त करण्यात आले अशा बातम्याही माध्यमांनी दिल्या.

पण बीबीसीने नंतर क्लीअर केलं आहे कि, आयकर विभागाने हा छापा टाकला नसून पाहणी केली आहे.

हा आयटीचा छापा असल्याचे आधी सांगण्यात आले होते, पण नंतर हे ‘सर्वेक्षण’ असल्याचे समोर आले.  पण तरीही द मोदी क्वेशन’ या भारतात बंदी आलेल्या बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीनंतरच ही कारवाई करण्यात आल्यामुळे विरोधकांकडून याबाबत टीका-टिप्पण्या, आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगलंय. पण या राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपल्याला हे माहिती असणं आवश्यक आहे कि, 

सर्व्हे म्हणजेच सर्च ऑपरेशन करण्यात आणि छापा टाकण्यात फरक असतो. तो कसा ते माहिती करून घेऊया,

सर्वात आधी क्लीअर करून घेऊया कि इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये इंग्रजी भाषेत Raid हा शब्द वापरलाच गेला नसून त्या जागी ‘Survey’ आणि ‘Search’ या दोन वेगवेगळ्या शब्दांची व्याख्या करण्यात आली आहे आणि या दोन्ही मध्ये खूप फरक आहे, जो तुम्ही इथे समजू शकता…

  •  इन्कम टॅक्स सर्व्हे म्हणजेच सर्व्हेक्षणाबाबत जाणून घेऊया,

BBC च्या ऑफिसमध्ये जी कारवाई केली गेली ती आयकर कायदा १९६१ च्या विविध तरतुदींनुसार केली गेली. यात कलम १३३ A चा वापर करण्यात आला आहे.  हे कलम आयटी विभागाला त्यांच्या अधिकारक्षेत्रातील संस्था, व्यवसाय, धर्मादाय क्रियाकलापांच्या ठिकाणची छुपी माहिती, कोणतेही अघोषित उत्पन्न, लपवलेली मालमत्ता उघड करण्यासाठी कारवाई करण्याचा आणि त्यासाठी सर्वेक्षण करण्याचा अधिकार देते. 

त्या संस्थेचे खाते किंवा इतर कागदपत्रे, रोख रक्कम, स्टॉक, मौल्यवान वस्तू, इत्यादींची पडताळणी करण्यासाठीचा अधिकार या विभागाला असतो. तोच अधिकार आयकर विभागाने इथे वापरला आहे. १९६४  मध्ये केलेल्या दुरुस्तीद्वारे सर्वेक्षणाची तरतूद कायद्यात समाविष्ट करण्यात आली.

या कारवाईचा संपूर्ण उद्देश माहिती गोळा करणे एवढाच असतो. यात संबंधित व्यक्तीने किंवा त्या संस्थेने त्यांच्या व्यवहारांचे रेकॉर्डस् नियमित केले आहेत की नाही हे पाहण्यासाठी आयकर सर्वेक्षण केलं जातं. 

वित्त विधेयक-२००२ च्या माध्यमातून संशोधन करून यामध्ये आणखी काही दुरुस्ती करण्यात आल्या. या दुरुस्तीनंतर इन्कम टॅक्स ऑफिसर ‘इन्कम टॅक्स सर्व्हे’ दरम्यान संबंधित संस्थेचे काही कागदपत्रे जप्त करू शकतात, मात्र त्यासाठी त्यांना अमुक कागदपत्रे का जप्त करतोय याची माहिती त्या संस्थेला योग्य देणं बंधनकारक असतं.

  • आयटी सर्च म्हणजे काय? 

आयकर कायद्याच्या कलम १३२ मध्ये आयकर सर्चची व्याख्या आहे. करचुकवेगिरीच्या प्रकरणांमध्ये इन्कम टॅक्स ऑफिसर सहसा ‘आयकर छापे’ घालतात. ‘इन्कम टॅक्स रेड’ अंतर्गत एखाद्या व्यक्तीच्या किंवा व्यवसायाच्या इमारतीवर, घरावर किंवा कोणत्याही प्रकारच्या जागेवर कारवाई केली जाऊ शकते. हेच नाही तर या अधिकारानुसार, आयकर छाप्यांमध्ये संबंधित व्यक्तीची, संस्थेची कागदपत्रे, मालमत्ता, दागिने, अघोषित रोकड इत्यादी असं सगळं जप्त करण्याचा अधिकार इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला असतो.

साधारणपणे आपण याला ‘आयटी रेड’ म्हणतो मात्र आयकर कायद्यामध्ये धाड म्हणजेच Raid या शब्दाची व्याख्या कुठेही केलेली नाही त्या ऐवजी या कायद्यात ‘सर्च म्हणजेच शोध’ असा शब्द वापरला गेला आहे.

आयकर विभागाने एखाद्या व्यक्तीला कागदपत्रे सादर करा म्हणून समन्स किंवा नोटीस जारी केली असेल आणि त्या व्यक्तीने त्या नोटीस ला उत्तर देण्याचं टाळाटाळ केलं असेल तर कायद्याच्या अंतर्गत आयकर विभागाला त्या संस्थेवर, त्या व्यक्तीच्या घरावर सर्च ऑपरेशन करण्याचा अधिकार असतो. 

इन्कम टॅक्स विभागातल्या सूत्रांच्या माहितीनुसार, BBC वर आंतरराष्ट्रीय करांत अनियमितता केल्याचा आरोप आहे. आता आयकर विभागाने केलेला सर्व्हे आगामी काळात सर्च मध्ये रूपांतरित होतो कि काय असा सवाल आहे. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.