चाळीच्या कब्बड्डी स्पर्धेत स्वतः पोलीस आयुक्त खेळत होते अन बक्षीस मुख्यमंत्री देत होते.

गोष्ट आहे १९७३-७४ सालची. मध्यमुंबईच्या लोकसभा मतदार संघात पोटनिवडणुक होणार होती. काँग्रेसने इथले खासदार रा. धो. भंडारे यांची बिहारचे राज्यपाल म्हणुन नेमणूक केली होती आणि त्यांच्या जागी ऍड.रामराव आदिक यांना तिकीट दिले होते. तर त्यांच्या विरुद्ध होत्या कम्युनिस्ट पक्षाचं रोझ देशपांडे.

मुंबईत गिरणी कामगारांचे आंदोलन तापले होते. त्यांचे नेतृत्व करणाऱ्या कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांची लोकप्रियता तुफान वाढली होती. त्यांची सुपुत्री असलेल्या रोझा देशपांडे या स्वतः निवडणुकीला उभ्या असल्यामुळे कम्युनिस्ट पक्षाच्या येथे विजयाच्या अपेक्षा वाढल्या होत्या.

या भागात शिवसेनेचं जबरदस्त वर्चस्व होतं. शिवसैनिकांची मागणी होती की ही निवडणूक आपण लढवायची. पण वसंतराव नाईक यांनी रामराव आदिक यांना तिकीट देऊन बाळासाहेबांना पेचात पकडले होते.

बाळासाहेब व रामराव आदिक यांच्यात घनिष्ठ मैत्री होती. त्यांनी यापूर्वी शिवसेनेच्या मंचावरून भाषणे देखील केली होती.

वसंतराव नाईक यांच्याशी देखील सेनाप्रमुखांचे चांगले संबंध होते.

शिवसेनेने उमेदवार उभा केला तर त्यामुळे मते विभागली जाऊन रोझा देशपांडे यांनाच मदत होणार म्हणून बाळासाहेबांनी शिवसैनिकांची मागणी असूनही आपला उमेदवार दिला नाही. इथूनच ठिणगी पडायला सुरवात झाली होती. शिवसैनिकांच्यात असंतोष धुमसत होता. वरून आदेश आले होते कि काँग्रेसचा प्रचार करा.

या मतदारसंघात दलित व नवबौद्ध समाजाची देखील लक्षणीय मते होती. आणि हि मते दलित पँथरच्या हातात होती.

त्यावेळेस संपूर्ण भारतात आणि महाराष्ट्रात दलितांवर अत्याचार वाढले होते. त्याविरोधात आरपीआय, काँग्रेस किंवा कुठलाच विरोधी पक्ष ठोस पावले उचलण्यास तयार नव्हता. म्हणून मुंबईतील तरुण बंडखोर मंडळींच्या वर्चस्वाला आव्हान देणाऱ्या चळवळीसारखी महाराष्ट्रात स्वसंरक्षणासाठी आणि ब्राह्मणवादाला शह देण्यासाठी दलित पँथरची स्थापना केली होती.

दलित पँथरच्या पाठिंब्याकडे दोन्ही पक्षांचे लक्ष होते. मात्र आपला निवडणुकीवरचा बहिष्कार लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी दलित पँथरने आझाद मैदानात एक सभा आयोजित केली. मात्र या सभेवर जोरदार दगडफेक झाली. हिंदू देवीदेवतांवर पॅन्थरच्या नेत्यांनी टीका केल्याचे आरोप करण्यात आले. अशाच बातम्या वर्तमानपत्रांमधून पसरवण्यात आल्या.

या बातम्यांमुळे दंगली पेटल्या. विशेषतः वरळी नायगाव परिसरात मोठ्या संख्येने राहणारे शिवसैनिक आणि पँथरचे कार्यकर्ते आमने सामने आले.

वरळी पुढे तीन महिने धगधगत होती. प्रचंड रक्तपात घडला. यात एका कॉन्स्टेबलचा मुलगा देखील मृत्युमुखी पडल्यामुळे पोलीस देखील आक्रमक झाले. पोलिसांनी पँथरवर नक्षलवादी संघटनेचा आरोप केला आणि त्यांचे नेते राजा ढाले राजा ढाले यांनी आपल्या अनुयायांना पोलिसांवर हल्ला करण्यासाठी चिथावणी दिल्याचा सांगितलं गेलं.

पँथरच्या मोर्चांवर पॉलिसी लाठीचार्ज झाला. त्यांनी उत्तरादाखल दगडफेक केली, शिवसेना आणि पोलीस दल काँग्रेसच्या इशाऱ्यावर दलितांवर अत्याचार करत आहे असं चित्र उभं करण्यात आलं.

निवडणूक झाली, रामराव आदिक यांचा धक्कादायक पराभव करत रोझा देशपांडे निवडून देखील आल्या. मात्र वरळीमध्ये दंगलीच्या लाटा उसळत राहिल्या होत्या. एकमेकांची डोकी फोडणाऱ्या तरुणांना आवरणे कठीण बनले होते.

पोलीस दलाबद्दल उभा राहात असलेला हा गैरसमज दूर करण्याची आवश्यकता मुंबईचे तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त सूर्यकांत जोग यांना जाणवली.

या दंगलीचे मुख्यकेंद्र होते वरळीमधील बीडीडी चाळ. बंद पडत असलेल्या गिरणी, वाढती महागाई व बेरोजगारी,भ्रष्टाचार यामुळे पिचलेला तरुण गुन्हेगारीच्या मार्गावर लागत होता. असंतोषाचा भडाग्नी हातात दगड घेऊन शांत केला जात होता.

सूर्यकांत जोग यांनी ही स्फोटक परिस्थिती अत्यन्त कौशल्याने हाताळली. ते स्वतः खेळाडू होते, या तरुणांची ऊर्जा सकारात्मक कामात वापरायचं ठरवलं.  

बीडीडी चाळीतील दंगल तर त्यांनी चोवीस तासांत आटोक्यात आणली आणि पुढच्या ४८ तासांत दंगल झालेल्या बीडीडी चाळीतील मैदानातच तरुणांचे कबड्डीचे सामने जोगसाहेबांनी आयोजित केले.

सूर्यकांत जोग हे जुन्या काळातील हुतूतू खेळाडू होते, त्यांनी क्रिकेटमधील रणजी स्पर्धेत देखील एक चांगला खेळाडू म्हणून नाव कमावलं होतं. आपला क्रीडाक्षेत्रातला अनुभव त्यांनी या बीडीडीच्या दंगलीला शांत करण्यासाठी वापरला. ते स्वतः कबड्डी स्पर्धेत एक खेळाडू म्हणून सहभाग झाले.

पोलीस आयुक्त स्वतः मैदानात उतरत आहेत हे पाहून दोन्ही गटाचे तरुण स्पर्धेत उतरले. पोलिसांच्याबद्दलचा अविश्वास देखील कमी झाला. दंगलीचे वातावरण पूर्ण निवळले. 

इतकेच नव्हते तर सूर्यकांत जोग यांनी या कबड्डी स्पर्धांच्या बक्षीस समारंभासाठी महाराष्ट्राचे त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना आणलं.

एका चाळीच्या कबड्डी स्पर्धेत मुंबईचा पोलीस आयुक्त खेळतोय, बक्षीस समारंभासाठी थेट मुख्यमंत्री येतात हे आक्रीत त्या काळी घडलं होतं हे नक्की.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.