बिअर्ड ऑईल लावल्यानं खरंच दाढी येते का भिडू?

आता नोव्हेंबर महिन्यात शेकोटी पेटवण्याचे दिवस गेले भिडू. आता जमाना आलाय ‘नो शेव्ह नोव्हेंबर’चा. म्हणजे कसं सगळ्या महिन्यात दाढी आणि मिशीला कात्री लावायची नाही.

पोरींच्या केसांवर होतात तशा कविता कधी पोरांच्या दाढीवर झाल्या नाहीत. पण दाढीवाली पोरं पोरींना आवडतात हे मात्र खरं. त्यामुळं कमी दाढी येणाऱ्या पोरांचं आणि दाढीच न येणाऱ्या पोराचं लय मार्केट डाऊन होतं.

या मार्केट डाऊन होणाऱ्या पोरांचा एकमेव आधार म्हणजे बिअर्ड ऑईल. आता हे बिअर्ड ऑईल लावून खरंच दाढी येते का? हा प्रश्न पडणं साहजिक आहे.

त्याआधी हे सांगतो की, नो शेव्ह नोव्हेंबर काय असतंय-

पूर्ण नोव्हेंबर महिन्यात दाढीला कात्री किंवा ब्लेड लावायचं नाही. याचा मुख्य उद्देश असतोय कॅन्सरबद्दल जनजागृती करण्याचा. वाढलेले दाढी आणि मिशीचे केस कॅन्सर पेशंटसाठी डोनेट करायचे किंवा दाढी न करून वाचवलेले पैसे कॅन्सर उपचारांसाठी द्यायचे.

आता बिअर्ड ऑईलचा विषय-

आधी मला दाढी येत नव्हती, मग मावशी म्हणली हे तेल लाव. आता मी दाढीच्या वेण्या घालू शकतो. ही असली जाहिरात पाहावी लागेल दिवस दूर नाही. सध्याही दाढीवाल्यांचे बिफोर-आफ्टर फोटो फिरत असतातच. तर बिअर्ड ऑईल लावल्यानं दाढी येते असा कंपन्यांचा दावा आहे.

बिअर्ड ऑईलमध्ये काय असतंय?

जोजोबा तेल, अर्गन तेल, खोबरेल तेल, द्राक्ष बियाणं तेल, भांग बियाणं तेल, निलगिरीचं तेल, कांद्याचं तेल अशी अनेक तेलं एकत्र करून बिअर्ड ऑईल बनतं. याच्या किंमती साधारण २००-३०० रुपयापासून सुरू होऊन हजार रुपयापर्यंत जातात.

ते लावून खरंच फायदा होतोय का?

मुद्द्याचा पॉईंट आलेलाय भिडू. आता तुम्हाला अजिबातच दाढी येत नसंल आणि तुम्ही कितीपण ऑईल चोपडलं तरी काही होत नसतंय. ऑईल सोबत ऍक्टीव्हेटर वैगरे लावलं तर जरा जरा कुरण उगवंल. तुम्हाला पॅची दाढी असंल तर मात्र बिअर्ड ऑईलचा फायदा होतो. पण तरीही कबीर सिंग किंवा भल्लालदेवसारखी जंगली दाढी येण्याची शक्यता कमीच.

बिअर्ड ऑईलनं दाढी दाट होते, एकदम क्वालिटी दिसते हे शंभर टक्के खरं. पण त्यासाठी थोडी दाढी असायला लागती. आता हा आमचा पर्सनल अनुभव आहे, तुम्हाला ऑईल विकणाऱ्या कंपनीवर आणि तुमच्या दाढीवर हजार टक्के विश्वास असंल, तर बडी… गो अहेड.

दाढी फक्त तेल लावूनच येते का?

तर नाय. बाहेरून कितीही मटरेल पुरवलं तरी दाढीचा मेन विषय इंटर्नल असतोय. म्हणजे तुमचे जेनेटिक्स, आहार, व्यायाम, हार्मोन्स, आहार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झोप या गोष्टी तुमची दाढी वाढण्यात लय इम्पॉर्टन्ट ठरतात.

गालभर दाढी येत असेल आणि ती वाढवायची असंल, तर बिअर्ड ऑईल घ्यायचा विचार करा. आणि जर दाढी वाढवायची ठरवलंच तर, दाढीकडं जरा लक्ष ठेवा. नायतर डेटवर जाल आणि दाढीत कोंडा, चकली, करंजीचे तुकडे असतील. असं झालं तर, पोरगी दाढीतून हात फिरवणं सोडाच हातात पण हात घ्यायची नाय.

उगा जंगली दाढी वाढवून डुप्लिकेट कबीर सिंग बनायला जाऊ नका, पाहिल्यावर उगं दिल तुटल्याचा फील येतो. आणि हा मेन विषय- फक्त पोरी पटतील म्हणून दाढी वाढवायचा विचार पहिला झटका. कारण खरं प्रेम टपरीवरच्या चहात पण खुश असतंय आणि गुळगुळीत गालांवर पण.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.