जगप्रसिद्ध बीटल्स बँड कायमचा भारतात आला होता?

एप्रिल १९६५. द बीटल्स हा जगातला आजवरचा सर्वात फेमस बँड आपल्या हेल्प या सिनेमातील गाण्याचं शुटींग करण्यासाठी एका लंडनला आला होता. त्यातील काही सीन एका हॉटेलमध्ये शूट केले जात होते. ते हॉटेल भारतीय होत.

शुटींग सुरु असताना बीटल्सच्या लीड गिटारीस्ट जॉर्ज हॅरिसनला दिसल की गिटार सारखी दिसणाऱ्या एका वाद्यावर संगीत वाजवल जातंय.

जॉर्जने ते लक्ष देऊन ऐकल आणि चौकशी केली की हे नेमक काय वाजतंय. तेव्हा सिनेमाच्या संगीत दिग्दर्शकाने सांगितल हे भारतीय शास्त्रीय संगीतातील सतारवादन आहे. जॉर्ज च्या हृदयाच्या तारा त्या सतारीच्या वादनाने छेडल्या गेल्या होत्या.

हाच तो क्षण होता ज्यामुळे भारतीय संगीताला जागतिक स्तराची खिडकी उघडली जाणार होती.

जॉर्ज हॅरिसनने सगळी माहिती शोधून काढली. सतार वादनातील सर्वोत्कृष्ट गुरु रवीशंकर आहेत अस त्याला कळाल. त्याने लंडनमध्येच एक सतार खरेदी केली होती. रवी शंकर यांच्याकडून सतार शिकण्यासाठी तो भारतात गेला. गुरु शिष्यापेक्षा दोघांच्यात मैत्रीच नात निर्माण झाल.

रवी शंकर यांनी त्याला फक्त सतारच नाही तर संपूर्ण भारतीय संगीत, भारतीय संस्कृती याची ओळख करून दिली.

जॉर्ज भारताच्या इतक्या प्रेमात पडला की त्या काळात त्याने गिटार वादना ऐवजी सतार वाजवायच नक्की केलं होत. काही दिवसांनी त्याने तो प्रयत्न सोडून दिला खरं पण त्यांनी भारतीय संगीताचे फ्युजन आपल्या गाण्यात केल्यामुळे भारतीय संगीताची ओळख जगाला झाली.

हॅरीसनच्याच विदिन यु विदाउट यु या भारतीय संगीत वापरलेल्या गाण्याने सर्व रेकोर्ड ब्रेक केले. 

बीटल्स त्याकाळात जगात सर्वात जास्त ऐकल जाणार बँड होतं. त्यांनी केलेले बंडखोर प्रयोग त्या काळच्या तरुणाईने डोक्यावर घेतले होते. त्यांची स्टाईल त्यांचे कपडे त्यांचं म्युजिक सगळ्याला जगभरातून कॉपी केल जात होतं. हेच बीटल्स भारतीय संगीत ऐकतात हे कळल्यावर सगळ जग भारतीय संगीताच्या मागे लागल.

फॉरेनमध्ये होणाऱ्या भारतीय कलाकारांच्या कार्यक्रमाला तिथल्या लोकांनी सुद्धा उत्सुकतेने उपस्थिती नोंदवायला सुरवात केली. फक्त शास्त्रीय संगीतच नाही तर भारतीय सिनेमातील संगीत देखील ऐकल जाऊ लागल. भारताबरोबरच पाकिस्तानच्या कलाकारांचे दिवस बदलले. हे सगळ घडल जॉर्ज हॅरीसन मुळे.

या जॉर्ज हॅरीसनने हिंदू धर्म स्वीकारला होता. याच काळात त्याची ओळख काही भारतीय योगींशी झाली. आपल्या बायकोला घेऊन तो हरिद्वार वगैरे तीर्थक्षेत्रात फिरला. हिमालयात जाऊन आला. तिकडे तिथल्या बाबांनी दिलेली जडीबुटी खाऊन त्याला वेगळीच अनुभूती मिळाली.

रवीशंकर यांनी दिलेली विवेकानंद यांची पुस्तके दौऱ्यात त्याच्या कायम सोबत असायची,

तो काळ म्हणजे बीटल्स प्रसिद्धीच्या शिखरावर होती. ही एवढी महाप्रचंड प्रसिद्धी, पैसा आणि त्याच्या सोबतचे टेन्शन वाद खोटेपणा याचा बीटल्सच्या भिडूना कंटाळा येत चालला होता. यातच जॉर्ज हॅरीसनच ऐकून जॉन लेनन सुद्धा भारताच्या प्रेमात पडला होता. त्यांनी भारतात स्पिरिच्युअल ट्रीपला जायचं ठरवल. बाकीचे दोघे सुद्धा तयार झाले.

या भारतीय ट्रीपच्या आधी ते महर्षी महेश योगींचा सेमिनार अटेंड केला. याच सेमिनारमध्ये त्यांच्या मॅनेजरचा मृत्यू झाला होता. पण त्या मृत्यू नंतरही त्यांनी आपला दौरा रद्द केला नाही.

फेब्रुवारी १९६८. हृषीकेशच्या महर्षी महेश योगींच्या आश्रमाला भेट देण्यासाठी ते आपापल्या बायकांना घेऊन भारतात आले. लेनन आणि हॅरीसनसाठी ही छोटी ट्रीप नव्हती तर त्यांना त्यांचं म्युजिकच्या करीयरला कायमचा टाटा बाय बाय करायचा होता. त्यांचं आगमन झाल आणि भारतातल्या मिडियामध्ये प्रचंड खळबळ सुरु झाली.

स्वतः महर्षींच्या मार्गदर्शनाखाली मेडिटेशन सुरु झाल. या सेलिब्रिटी पाहुण्यांना हृषीकेशमध्ये राहण्यासाठी राजवाड्याप्रमाणे सोय करण्यात आली होती मात्र तिथे त्यांच्यावर दारू ड्रगची बंदी घालण्यात आली होती.  

सुरवातीला त्यांना प्रचंड आत्मिक शांतता लाभली. त्यांनी अनेक गाणी देखील लिहिली. मिडीयाचा त्रास वाढल्यावर बीटल्सला काश्मिरमध्ये हलवण्याचा निर्णय महर्षीनी घेतला मात्र त्या पूर्वीच बीटल्सने परत जाण्याचा निर्णय घेतला होता.

बीटल्सने आश्रम का सोडला याबद्दल अनेक मतमतांतरे आहेत. सगळ्यात फेमस स्टोरी आहे की महर्षी महेश योगी यांनी सुपरस्टार अभिनेत्री मिया फेरो हिच्यावर लैंगिक अत्याचार केला. महर्षींचे कारनामे जॉन लेनन आणि जॉर्ज हॅरीसनच्या डोळ्यासमोर घडले अशी वदंता आहे, पण त्याबद्दल काही पुरावे समोर आले नाहीत.

हॅरीसनने सांगितल की त्याला रवी शंकर यांच्या सोबत अल्बम बनवायचा होता म्हणून त्याने आश्रम सोडला.

महर्षी महेश योगींच्या भक्तांच्या मते बीटल्सना ड्रग वापरू दिले नसल्यामुळे लेनन आणि इतर कलाकार चिडले व त्यांनी परत इंग्लंडला जाण्याचा निर्णय घेतला. काही का असेना भारतात त्यांचं मन रमल नाही हे खरे. जेव्हा जॉर्ज आणि लेनन महर्षीना आम्ही परत जातोय हे सांगायला गेले. तेव्हा त्यांनी कारण विचारलं. लेनन ताड करून म्हणाला,

“तुमच्या जवळ दैवी शक्ती आहे ना? मग ओळखा आम्ही परत का जातोय ते !”

बंडखोर जॉन लेननने या चमत्कारिक बाबांच्यावर सेक्सि सेडी हे अफलातून गाणे रचले. 

पुढे काही वर्षात बीटल्सची गँग फुटली. त्यांनी सोलो देखील अनेक जबरदस्त गाणी बनवली. जॉर्ज हॅरीसनचे त्या प्रसंगानंतरही भारतावरील प्रेम कमी झाले नाही. रवी शंकर यांच्या सोबत त्याने अनेक शोज केले. भारतीय संगीताला पुढे आणण्यात जॉर्ज हॅरीसनचा वाटा सिंहाचा आहे.

पुढे त्याचा मृत्यू झाला तेव्हा त्याची अस्थी भारतातच गंगा नदी मध्ये विसर्जित करण्यात आली. आजही या महर्षी महेश योगी यांचा बंड पडलेला आश्रम पर्यटकांना खुला आहे. त्याला लोक बीटल्स आश्रम म्हणून ओळखतात.

हे ही वाच भिडू.