युवानेता व्हायचं असेल ते हे वाचा. नसेल व्हायचं तरी वाचा पैसे पडत नाहीत.

यंदाच्या निवडणुकीत सर्वात जास्त किंमत असलेल तिकीट भाजपचं आहे. त्यानंतर सेना. कायपण म्हणा, तुम्ही कुठल्यापण गटाचे असा पण यंदा भाजपला किंमत आहे हे मान्य करायलाच लागतय. असो, तर या तिकीटस्पर्धेत किती जणांना AB फॉर्म मिळतील काही सांगता येणार नाही.

पण, 

यंदा आम्ही तरुणाईला संधी देवू हे वाक्य प्रत्येक पक्षाचं फिक्स असतय. तिकडे पवार साहेब म्हणाले तरुणांना संधी, कॉंग्रेस हायकमांड म्हणाली तरुणांना संधी आणि हिकडे भाजप सेनेवाले पण म्हणालेत निवडून येवू शकतो अशा तरुणांना संधी.

यंदाच्या वर्षी तरुणांना जोरदार संधी आहेत. प्रत्येक ठिकाणी मंदी असली तरी राजकारणात अजून मंदी नाही ही चांगली गोष्ट आहे. असो तर तरुणांच्या संधीसाठी महत्वाची गोष्ट पाहीजे ती म्हणजे तुम्ही युवानेता असणं. आणि तुमच्या या युवानेतेगिरीला बळ देण्यासाठी पाहीजे अभ्यास.

जिथे अभ्यासाचा विषय येतो तिथे बोलभिडू कार्यकर्ते सल्ले द्यायला येतात. त्यातही हे सल्ले फुकटचे असतात. 

असो तर मुळ मुद्याकडे येतो.

युवानेत्याची लक्षणे.

मी शेंगा खाल्या नाहीत मी टरफल उचलणार नाही. लोकमान्य टिळकांचा बाणा. सेम या विरोधात युवाअवस्थेत प्रत्येक युवानेत्याने दुसऱ्यांच्या शेंगाची टरफले उचललेली असतात. दूसऱ्यांची कामे करुन देणे हा युवानेत्याचा पहिला छंद असायला हवा. लग्न, मयती, जावळ, डोहाळे जेवण अशा प्रत्येक ठिकाणी कडक पांढरा स्टार्चचा शर्ट घालून दिसणारा युवक दिसलां की आपण तिथेच तो युवानेता आहे ओळखून जायचं असत.

तो दिसताच त्याला नमस्कार करायचा असतो. जरा ओळख असली तर त्याला “काय सावकार काय चाललय” अस म्हणायचं असतं. तस म्हणलं की युवानेता लगेच म्हणतो, “आम्ही कुठलं सावकार तुम्हीच सावकार”. वास्तविक युवानेत्याला आपले पाय जमीनीवर आहेत हे दाखवायचं असत. आपण मोठ्या मनाने त्याला हा चान्स द्यायचा असतो. तुम्ही असा डॉयलॉग टाकला की हा युवानेता तुम्हाला कधीच विसरत नाही. 

तर मुक्तछंदपणे न लिहता, व्यवस्थित टप्याटप्याने आपण विषयाला हात घालू.

दूसरा मुद्दा युवानेता कसा व्हायचं. 

साधनसामग्री.

एक कोल्हापूरी चप्पल दोन दिवस तेलामध्ये भिजवून ठेवावी. डोळ्यावर रेबॅनचा गॉगल. दाढी मिश्या येत असतील तर उत्तम. पण त्या दिसायला महाराजांसारख्या असाव्यात. अहो महाराजांचे विचार जपता आले नाहीत म्हणून तर युवानेता व्हायचं असत. पांढरा स्टार्चचा शर्ट मस्ट. कितीही कर्ज होवुदे पण एक लक्षात घ्यायला हवं शर्टचा स्टार्च मोडायला नको. पांढरी पॅन्ट गरजेनुसार. आणि वाहन म्हणून बुलेट. इंदौरी सायलेन्सर असेल तर अतिउत्तम.

प्रत्यक्ष कार्यवाही.

पहिल्या टप्यात दिसेल ती कामे करायची असतात. लक्षात ठेवा तुम्ही उगवते युवानेते आहात. अजून युवानेते नावाची पदवी तुम्हाला मिळाली नाही. त्यासाठी आपल्या वयाहून पाच ते दहा वर्ष कमी वयाच्या मुलांचा दादा, भाऊ, साहेब होण्याचा प्रयत्न करायचा असतो. आपल्या वयाच्या मुलांवर पहिल्याच टप्यात इंप्रेशन मरायला गेलात तर पहिल्याच झटक्यात बाद होवून जाल.

तर पहिल्या टप्यात अशी अतिउत्साही शाळा, कॉलेजची मुलं हेरायची. त्यांच्याबरोबर “काय बाळ्या अभ्यास कर” वगैरे टाईप इंप्रेशन टाकायचं. रोजचं बोलणं ठेवून या पोराला आपली गरज वाटली पाहीजे याची जाणिव करुन द्यायची. या पोरांची लफडी सहज ओळखता येतात. काय म्हणते ती? काय लागलं तर सांग. इतकच म्हणायचं आणि अचूक संधीची वाट पहायची.

अखेर प्रत्येक युवानेत्याच्या आयुष्यातला तो क्षण येतो. त्या दिवशी तो “बाळ्या” दादा राडा झालाय म्हणून तुमच्याकडे पळत येतो. या टप्यावर भावनिक व्हायचं नाही. चालत गेलात तर स्टार्चचा शर्ट फाटोस्तोर मार खाल. बुलेट काढायची. त्या मुलाला मागे बसवायचं आणि तालात जायचं. कितीही मोठ्ठी भांडण होवु देत, आपण प्रत्येक माणूस हा मतदार आहे यांची परिपुर्ण जाणिव ठेवायची. “भांडण करणारा युवानेता नसतो”. आपण भांडण मिटवायची असतात. प्रकरण शांत झालं की बाळ्या त्याच्या आठदहा जणांना घेवून येतो. पहिला टप्पा यशस्वी झालेला असतो. 

आत्ता दूसऱ्या टप्यात मोठ्या घोळक्यात शिरायचं.

हक्काची जागा म्हणजे पंचायत समिती, तहसील ऑफिस, पोलीस स्टेशनसारख्या ठिकाणच्या समोरची पानपट्टी. तिथे धडपडणारे अनेक युवानेते असतात. इथं जरा घुटमळल्यासारखं करायचं आणि थेट साहेबांच्या बंगल्यावर जायचं. साहेबांचं तिकडं काही जळू की मरु आपण मात्र बुके घेवून जायचं. बाळ्यासारख्या पोरांना फोटो काढायला लावायचां. आत्ता लक्षात ठेवा पुढची पाच, सहा वर्ष हाच फोटो मोबाईलचा स्क्रिन कवर, wtsapp डिपी आणि हाच फेसबुक डिपी.

साहेबांच्या वाढदिवसाची वाट बघायची.

या दरम्यान पानपट्टीवरच्या गप्पांमध्ये खंड पडून द्यायचा नाही. आत्ता साहेबांचा वाढदिवस आला की पदरचे पैसे द्यायचे आणि साहेबांचे डिजीटल लावायला सांगायचे. मंडळ, सामाजिक ग्रुप, रक्तदान शिबीर, सामाजिक जाणीव असले उपक्रम एका बाजूला घ्यायचे. साहेब स्टेजवर आले की कानात जावून चहा सांगू की कॉफी विचारायचं. तोच फोटो पेपरात टेंभू प्रकल्पावर साहेबांसोबत सविस्तर चर्चा म्हणून छापून आणायचा.

थोडक्यात तुम्ही या टप्यावर स्वत:ला सेट करुन टाकलेलं असत. साधारण या प्रोसेसचा कालावधी ५ ते १० वर्षांचा असतो.

आत्ता दूसरा मुद्दा युवानेता कसा ओळखावा.

युवानेता ओळखण्यासाठी काही खुणा सांगाव्यात इतके वाईट दिवस महाराष्ट्रात तरी आले नाहीत. युवानेते हजारात खर्च करुन गावात शिरण्याच्या अगोदर स्वत:चे डिजीटल लावत असतात तरिही तुम्हाला युवानेता ओळखता येत नसेल तर तुमचं अवघडय राव. गावातला युवानेता सर्वांना माहित असतो. हा पण बाहेरच्या गावात युवानेता कसा ओळखायचा ते आम्ही सांगू शकतो. समजा तुम्ही गोव्याच्या बीचवर आहात. मस्तसमुद्र किनारी पांढरी पॅन्ट, पांढरा स्टार्चचा शर्ट, पायात कोल्हापूरी घालून चालणारा व्यक्ती दिसला तर कोणत्यातरी गावचा युवानेता म्हणून तेढ काय सावकार हिकडं कुठं म्हणा. शंभर टक्के रिझल्ट मिळणार. बाकी जो पुण्याच्या तुळशीबागेतसुद्धा काखा भुगवून चालू शकतो तो खरा युवानेता असतो.

युवानेत्याची लक्षण योग्य वेळीच ओळखणं.

रांझणा सिनेमा पाहिला आहे का? त्यातलं कोणतं पात्र सर्वात जास्त आवडतं. अभय देओल म्हणलां तर आपल्या मनात युवानेता व्हायचं सर्वात छोटं लक्षण असत ते. गणपती मंडळाचं अध्यक्ष व्हावं वाटत असेल, भांडणात पडू वाटत असेल, रक्तदान शिबीरात जावू वाटत असेल, बुलेटचा नाद वाटत असेल, साहेबांच कौतुक वाटत असेल, साहेबांच्या रांगणाऱ्या छोट्या साहेबांना पण सलाम ठोकू वाटत असेल तर ती युवानेता होण्याची लक्षण आहेत. भारी वाटत असेल तर उडी घ्या. सध्याचे युवानेते पन्नाशी होवून रिटायर व्हायला आले असल्यामुळे स्कोप आहेच तसा.

हे ही वाचा. 

2 Comments
  1. newstown says

    Awsome article for yuvanetas

Leave A Reply

Your email address will not be published.