ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनला घडवण्यात गांगुलीचा आणि पुण्याचा मोठा वाटा आहे…

क्रिकेट हा असा खेळ आहे जिथं तुम्हाला मिळालेल्या संधीचं सोनं करता यायला पाहिजे, जर संधी हुकली तर संघाबाहेर जाण्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नसतो. अनेक खेळाडू पदार्पण करताना बॉलर म्हणून आले नंतर ते पुढे जगातले टॉप बॅट्समन म्हणून पुढे आले.

खेळाडूंना अचूक वेळी ओळखणे आणि संधी देणे हा क्रिकेटचा मोठा गुणधर्म मानला जातो. असाच एक खेळाडू सौरभ गांगुली याने ओळखून पुढे आणला आणि तो खेळाडू पुढे ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू आणि कॅप्टन बनला. आजचा किस्सा त्याच घटनेचा ज्यात क्रिकेटचा दादा असलेला गांगुली एका ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूला मोठं करतो.

२०१० साली ऑस्ट्रेलियन मीडियात सगळीकडे एका २० वर्षाच्या लेगस्पिनरची चर्चा होती. हा स्पिनर शेन वॉर्नचा सुद्धा फेव्हरेट होता. डेब्यू मॅचमध्ये त्याने पाकिस्तानच्या दोन महत्वाच्या फलंदाजांना बाद करून आपली हवा तयार केली होती. तो स्पिनर होता स्टीव्हन स्मिथ. आता स्टीव्हन स्मिथ हा अगोदर काही सामन्यांमध्ये शतक झळकावून आला होता मात्र तो लेगस्पिनर म्हणूनच चर्चेत होता.

हळूहळू वनडे, टेस्ट आणि ट्वेन्टी ट्वेन्टी मध्ये त्याचा डेब्यू झाला खरा पण त्याच करियर काही विशेष चालत नव्हतं. त्याचवेळी आयपीएल मध्ये रॉयल चॅलेंजर्स संघाकडून तो खेळत होता मात्र त्याला संधीच मिळाली नव्हती. कोची टस्कर्स संघाकडून त्याला विकत घेण्यात आले मात्र दुखापतीमुळे तो जास्त काळ खेळू शकला नाही. 

स्मिथच्या आयुष्यात खरा टर्निंग पॉईंट आला तो २०१२ साली. आधीच आयपीएलमध्ये पुणे वॉरियर्स इंडिया हा संघ ठेवायचा कि नाही यावरून रान उठलं होतं, सौरव गांगुली या संघाचा कॅप्टन झाला यातही बऱ्याच गोंधळात गांगुलीची निवड झाली होती. पुण्याच्या संघाने अनेक बडे खेळाडू तेव्हा विकत घेतले होते, मायकेल क्लार्क आणि स्टीव्हन स्मिथ सुद्धा यात होते.

चॅम्पियन्स लीग T-२० मध्ये न्यू साऊथ वेल्स संघासाठी स्टीव्हन स्मिथ खेळायचा, त्याचा खेळ बघून सौरव गांगुलीने मोठ्या आशेने त्याची निवड केली होती. चांगल्या किंमतीत पुणे वॉरियर्स संघाने स्मिथला खरेदी केलं होतं ते हि सौरव गांगुलीच्या सांगण्यावरून. तेव्हा स्मिथ ऑस्ट्रेलियाच्या संघात रेग्युलर खेळत नव्हता मात्र गांगुलीला त्याच्यावर पूर्ण भरोसा होता. 

त्याची बॅटिंगची स्टाईल दादाला आवडलेली होती. आणि त्याकाळात गांगुलीने स्मिथला भरपूर संधी दिल्या. जास्तीत जास्त स्मिथला ग्राउंडवर  येईल यासाठी सौरव गांगुलीने मेहनत घेतली होती.

एका IPL मॅचमध्ये तर गांगुली स्वतःहून खाली बसला आणि त्याने स्मिथला कॅप्टन बनवलं होतं. इथं हे हि लक्षात ठेवायला हवं कि संघात मायकेल क्लार्क सारखा खेळाडू होता जो पुण्याच्या संघाचा व्हाईस कॅप्टन होता तरीही टॅलेंटला महत्व देत गांगुलीने स्मिथला संधी दिली.

गांगुलीच्या विश्वासावर स्मिथ वेळोवेळी खरा उतरत गेला. स्मिथची वाऱ्याच्या वेगाची फिल्डिंग चांगलीच चर्चेत होती. या सीझनमध्ये त्याने ३६२ रन ठोकून स्वतःला सिद्ध केलं होतं. पुढे धोनीच्या नेतृत्वातही स्मिथ चांगला खेळत राहिला. कालांतराने तो पुण्याचा कॅप्टनसुद्धा झाला.

ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन म्हणून संघाला अनेक मॅचेस स्टीव्हन स्मिथने जिंकून दिले. अनेक सामन्यांमध्ये त्याने शतकं, द्विशतकं झळकावले. ऑस्ट्रेलियाच्या आजवरच्या बेस्ट कॅप्टनमध्ये स्मिथचं नाव घेतलं जातं.  

अशा प्रकारे गांगुलीने आणि पुण्याच्या संघाने ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन घडवला होता.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.