तुलसी गबार्ड यांच्यामुळे अमेरिकेतील हिंदू भगवदगीतेवर हात ठेऊन शपथ घेतात

सोशल मीडियावर अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी शेअर केलेला एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यात कमला हॅरिस शपथ देत आहेत तर शेफाली रझादान दुग्गल या शपथ घेत आहेत. शपथविधी दरम्यान शेफाली यांच्या आईने हातात भगवदगीता घेतली आहेत तर शेफाली या डावा हात गीतेवर ठेऊन आणि उजवा हात वर करून शपथ घेताना दिसत आहेत. 

 

शेफाली यांनी भगवद गीतेवर हात ठेऊन शपथ घेतल्यामुळे भारतीयांना या गोष्टीचं आश्चर्य ही वाटलं आणि आनंदही वाटला.

कारण सातासमुद्रापार गेलेल्या हिंदूंनी अमेरिकेत जाऊन भगवदगीतेवर हात ठेऊन शपथ घेणे अनेकांना आश्चर्याचं वाटतंय. नेदरलँडमध्ये अमेरिकेच्या राजदूत म्हणून नियुक्त झालेल्या शेफाली यांनी गीतेवर हात ठेऊन शपथ घेतलीय.

शेफाली या काश्मिरी पंडित वंशाच्या असून त्यांचा जन्म उत्तराखंड राज्यातल्या हरिद्वारमध्ये झालाय.पण लहानपणीच आईवडिलांसोबत त्या अमेरिकेत गेल्या त्यामुळे त्या अमेरिकन नागरिक आहेत. आजपर्यंत अमेरिकेत महत्वाच्या पदावर काम करणाऱ्या शेफाली यांची आता नेदरलँडच्या राजदूत म्हणून नियुक्ती झालीय.  

पण आज शेफाली यांनी गीतेवर हात ठेऊन शपथ घेतल्यामुळे चर्चेत असल्या तरी गीतेवर हात ठेऊन शपथ घेण्याची ही परंपरा भारतीय हिंदूंनी सुरु केलेली नाहीय. 

तर ही परंपरा तुलसी गबार्ड या अमेरिकन हिंदू महिलेने सुरु केलीय.

अमेरिकेच्या हवाई राज्यातून यूएस काँग्रेसमध्ये निवडून गेलेल्या तुलसी गबार्ड या यूएस काँग्रेसमधील पहिल्या हिंदू आहेत. ३ जानेवारी २०१३ सालात तुलसी गबार्ड यांचं हवाई राज्यातील जिल्हा क्र. २ मधून यूएस काँग्रेसवर निवड झाली होती. खासदार पदाची शपथ घेतांना त्यांनी अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भगवदगीतेवर हात ठेवला होता.

तुलसी यांनी भगवदगीतेवर हात ठेऊन शपथ घेण्याचं कारण सुद्धा सांगितलं होतं.  

त्या म्हणाल्या की, “गीता कायम माझी मार्गदर्शक राहिली आहे. या ग्रंथामुळे यश आणि अपयशाच्या परिस्थितीत संतुलित राहण्यासाठी आणि धैर्य कायम ठेवण्यात गीता मला मदत करते. गीतेनेच मला सेवाभावी प्रवृत्तीने देशाची आणि इतरांची सेवा करण्यासाठी मार्गदर्शन केलंय. महात्मा गांधीनी सुद्धा गीतेमुळेच वैयक्तिक स्वार्थाकडे ना बघता स्वतःच्या देशासाठी काम केलं होतं आणि यशाअपयशाला देवाच्या हातात सोडलं होतं.” असं तुलसी यांनी सांगितलं होतं.

तुलसी यांच्या पुढाकारामुळेच अमेरिकेतील हिंदू भगवदगीतेवर हात ठेऊन शपथ घेत आहेत.

तुलसी या भारतीय वंशाच्या नाहीत. त्यांची आई अमेरिकेतील इंडियानामधील आहे तर वडील युरोपियन वंशाचे असून त्यांचा जन्म सामोन बेटांवर झाला होता. तुलसी यांची आई हिंदू आहे त्यानंतर तुलसी यांनी सुद्धा किशोर वयात असतांना हिंदू धर्म स्वीकारला. त्यांनी स्वतःचं नाव हिंदू देवी तुलसी यांच्यावरून घेतलंय. २०१३ मध्ये जेव्हा त्यांनी भागवत गीतेवर हात ठेऊन शपथ घेतल्यामुळे चर्चेत आल्या होत्या.

तुलसी यांच्यानंतर अमेरिकेतील इतर हिंदूंनी सुद्धा या परंपरेचं पालन केलंय. आरव खन्ना, राजा कृष्णामूर्थी या खासदारांनी तसेच राजदूत शेफाली रझादान यांनी सुद्धा आता भगवदगीतेवर हात ठेऊन शपथ घेतलीय.

परंतु अमेरिकेमध्ये गीतेचं महत्व एवढ्यापुरतं मर्यादित नाही. 

२०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा दौरा केला होता. त्या दौऱ्यामध्ये मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बाराक ओबामा यांना भगवदगीतेची प्रत भेट दिलेली होती. तर तुलसी गबार्ड यांनी शपथ घेतांना गीतेच्या ज्या प्रतीवर हात ठेवलं होतं तीच प्रत त्यांनी नरेंद्र मोदींना भेट म्हणून दिलेली होती.

अमेरिकेमध्ये हिंदूंचा वाढता प्रभाव बघून तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बाराक ओबामा यांनी अमेरिकेचा भविष्यातला राष्ट्राध्यक्ष हिंदू धर्मीय असू शकतो असं म्हटलं होतं. जेव्हा भारतीय वंशाच्या कमला हॅरिस अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष झाल्या तेव्हा बाराक ओबामा यांच्या विधानाची चर्चा झाली होती.

परंतु कमला हॅरिस यांनी उपराष्ट्राध्यक्ष म्हणून भगवदगीतेची शपथ घेतली नव्हती.

कमला हॅरिस यांची आणि श्यामला गोपालन या भारतीय वंशाच्या हिंदू होत्या. मात्र कमला हॅरिस या स्वतःला आफ्रिकी अमेरिकन म्हणवतात. तसेच त्यांची हिंदू धर्माऐवजी ख्रिश्चन धर्मावर श्रद्धा आहे. म्हणूनच उपराष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतांना कमला हॅरिस यांनी बायबलच्या दोन प्रतींवर हात ठेवून शपथ घेतली होती.

हे झालं अमेरिकेचं पण अमेरिकेसोबतच इतर देशांमध्ये सुद्धा गीतेवर हात ठेऊन शपथ घेतली जाते.

ब्रिटनमध्ये हिंदू खासदार भगवदगीता हातात घेऊन शपथ घेतात. यात ऋषी सुतक यांनी सुद्धा गीता हातात घेऊन शपथ घेतली होती. २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियातील हिंदू खासदार डॅनियल मोखे यांनी गीता हातात घेऊन शपथ घेतली होती. त्रिनिडॅड आणि टोबॅगो च्या पहिल्या हिंदू पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर यांनी सुद्धा २०१० मध्ये पंतप्रधानपदाची शपथ भगवदगीतेवर हात ठेऊनच घेतली होती.

या सर्व देशांमध्ये जेव्हा जेव्हा लोकप्रतिनिधींनी भगवदगीतेवर हात ठेऊन शपथ घेतलीय तेव्हा तेव्हा प्रतिनिधी चर्चेत आले होते. परंतु अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी स्वतः शपथ दिल्यामुळे शेफाली रझादान दुग्गल या विशेष चर्चेत आल्या आहेत. 

हे ही वाच भिडू 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.